शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५

कौटुंबिक ज्येष्ठ स्नेही तीर्थस्वरूप भावलाल गोमलाडू ( राजपूत ) सर '



 

मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


' कौटुंबिक ज्येष्ठ स्नेही तीर्थस्वरूप भावलाल गोमलाडू ( राजपूत ) सर '


=====================


आपलं आयुष्य जगत असताना आपल्याला पाठबळ देणारे मन, आपल्याला समजून उमजून घेणारी माणसं लाभली की आयुष्याचा प्रवास बऱ्याच प्रमाणात सुखकर होतो. याच आयुष्याच्या प्रवासात कधी समवयस्क तर कधी ज्येष्ठांचा असा सहवास लाभतो जो विसरणे अशक्य असते.त्यातल्या त्यात ज्येष्ठांच्या सहवासातील जगलेले क्षण, प्रसंग आयुष्याच्या मार्गावर नेहमी मार्गदर्शक ठरत असतात. 


माझ्या आयुष्यातील प्रवासात असेच एक ज्येष्ठाचे सानिध्य लाभले ज्यांचे नाव होते तीर्थस्वरुप भावलाल गोमलाडू सर बेंदवाडीकर..! 


दिनांक १८/८/२०२५, सोमवार रोजी तीर्थस्वरूप गोमलाडू सर यांना देवाज्ञा झाली.माझ्या कुटुंबाकडून प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली..!🙏


आदरणीय भावलाल हिरालाल गोमलाडू सर..!


नेहमी हसमुख अन् वडिलकीच्या नात्याने मार्गदर्शन करणारे माझ्याच कुटुंबातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व..! लासूर स्टेशन येथे आदरणीय गोमलाडू सर अन् आम्ही एकाच परिसरात वास्तव्यास होतो. त्यामुळं आदरणीय गोमलाडू सरांशी माझा नित्याचा सहवास असायचा.जि. प प्रा.शाळा हडस पिंपळगाव ता. वैजापूर येथे सेवेत असताना आदरणीय गोमलाडू सर आमचे मुख्याध्यापक होते. थोडक्यात आदरणीय गोमलाडू सरांचा मला औपचारिक अन् अनौपचारिक आयुष्यातील सहवास लाभला.


इ. स. १९९५ ते साधारणतः इ. स.२००५ दरम्यान जि.प. केंद्रीय शाळा लासुरगाव ता. वैजापूर अंतर्गत जेवढे ज्येष्ठ आदरणीय शिक्षक कार्यरत होते ते सर्वजण औपचारिक नात्यापेक्षा अनौपचारिक नात्यात रमणारे प्रकर्षाने जाणवले. या काळातील कोणत्याही ज्येष्ठ शिक्षकाने आम्हा तत्कालीन नवतरुण शिक्षकांना त्यांचा मुलगा, त्यातल्या त्यात त्यांचा जिवलग मित्र म्हणूनच सानिध्य दिले होते. नात्यांचा भावनिक आधार दिला होता. यात आदरणीय गोमलाडू सरांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ज्याला आजच्या उच्च शिकलेल्या पिढीत कुणीतरी ' जनरेशन गॅप ' असं म्हणतं, तसला काहीही प्रकार तत्कालीन ज्येष्ठ शिक्षकांनी आमच्यात अन् त्यांच्यात कधीच येऊ दिला नव्हता. आदरणीय गोमलाडू सर त्या अनौपचारिक नात्याला गुंफवून ठेवण्यात नेहमी अग्रेसर असायचे.तत्कालीन ज्येष्ठ शिक्षकांनी जरी आम्हा तत्कालीन नवतरुण शिक्षकांना एक मुलगा , त्यातल्या त्यात जिवलग मित्र म्हणून आपलंस केलं होतं, तरी देखील तत्कालीन आम्ही नवतरुण शिक्षक मित्रांनी ज्येष्ठांचा योग्य तो आदरभाव, सन्मान राखला होता. तत्कालीन ज्येष्ठ अन् कनिष्ठ नात्यातील गोडव्याचे ते यशस्वी गमक ठरले.


माझे चुलते स्व.भाऊसाहेब काका रामराव जाधव अन् गोमलाडू सर वर्गमित्र होते.आदरणीय गोमलाडू सरांचे मूळ गाव बेंदवाडी ता. वैजापूर आमच्याच पालखेड गावाच्या शिवालगत असलेलं गाव..! पालखेड , बेंदवाडी अन् परिसरातील तत्कालीन काळातील माध्यमिक वयोगटातील मुले वरील उल्लेखित दोन्ही गावांच्या लगतच असलेल्या परसोडा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत शिक्षण घ्यायला जात असायचे. त्याच शैक्षणिक आयुष्याच्या प्रवासात जि. प. प्रशाला परसोडा ता.वैजापूर या माध्यमिक शाळेत दोघांनीही वर्गमित्र म्हणून शिक्षण घेतले होते.त्या कौटुंबिक नात्याने आदरणीय गोमलाडू सरांचा माझ्यावर विशेष कौटुंबिक स्नेह होता. माध्यमिक शाळेतील शिक्षण काळात माझे स्व.चुलते भाऊसाहेब काकांनी आमचा पिढीजात परंपरागत कुलधर्म ज्योतिषीकडे स्वतः ला माझे चुलत आजोबा स्व.रामराव बाबा देविदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ केला आणि आदरणीय गोमलाडू सरांनी पुढील शिक्षण घेऊन शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले. जो पर्यंत माझे स्व.चुलते तीर्थस्वरूप भाऊसाहेब काका जाधव हयात होते अन् जो पर्यंत स्व.आदरणीय गोमलाडू सर हयात होते तो पर्यंत हे दोन्ही बालमित्र माझ्याजवळ एकमेकांची एकेरी उल्लेख करून अनौपचारिक विचारपूस करत असायचे.बालमित्रांच्या अनौपचारिक नात्यांच्या गप्पांची जी मैफिल रंगते तीच अनौपचारिक नात्याची मैफिल दोघांच्या भेटीत व्हायची.याचा एकदा मला अनुभव आला होता.आदरणीय गोमलाडू सरांना जन्मकुंडली बाबत काम होते. त्यानिमित्त आदरणीय गोमलाडू सर हडस पिंपळगाव येथील शाळा सुटल्यावर पालखेड येथे भाऊसाहेब काका यांच्या घरी आले होते.अर्थात मीही सोबत होतोच..! जन्मकुंडलीचे काम झाल्यावर तास दीड तास दोघांच्या गप्पांच्या मैफिलीचा मीही फक्त श्रवण भक्त होऊन आनंद घेतला होता. एवढं वय होऊन देखील ही दोन्ही ज्येष्ठ आपलं बालपण अन् त्या नात्यातील अनौपचारिक गोडवा विसरली नव्हती; याचं मला अप्रूप वाटलं होतं. वास्तवातील आयुष्य जगलेली, मातीशी नाळ जुळलेली अन् एकमेकांच्या भाव विश्वाला आपल्या वार्धक्यात देखील जपलेली ही पिढी होती. माझे स्व.चुलते भाऊसाहेब काकांना त्यांच्या वार्धक्यात समस्त बेंदवाडीकरांनी जो आधार दिला होता तो त्याचं जाधव कुळातील एक सदस्य म्हणून माझ्याकडुन विसरणे अशक्य आहे. सदैव ऋणात आहेत. आदरणीय स्व.गोमलाडू सरांचे तिघे चिरंजीव प्रिय मित्र सचिन राजपूत,प्रिय मित्र राहुल राजपूत ( सर ) ( ह.मु. छ. संभाजीनगर ), आणि प्रिय मित्र विशाल राजपूत ( ह.मु. लासूर स्टेशन ) यांच्याशी कौटुंबिक नातेसंबंध जुळवून घ्यायला माझ्या कुटुंबाला खूप सोपे गेले.माझे तर या तिघाही भावंडांवर निखळ मैत्रीचे प्रेम आहेच, मात्र आमचा थोरला चिरंजीव नमन अन् सचिन राजपूत याचा थोरला चिरंजीव हर्षद एकमेकांचे अत्यंत जिवलग बालमित्र होते अन् आजही आहेत.आपल्या पूर्वजांचा भावनिक वारसा पुढील नात्यात देखील शोधावा लागतो किंवा आपलं मन अन् भावना निरपेक्ष असेल तर नियती असे नातेसंबंध पुढील पिढीत देखील आपल्या ओंजळीत टाकत असते.


नात्यांच्या देव्हाऱ्यात अनेक नाती माणसाच्या आयुष्यात येत असतात.रक्तातील नाती तर रक्ताने येतच असतात, मात्र प्रेमळ , आपलंसं करणारी अन् निस्वार्थ रक्तविरहित नात्यांचाही आपल्या कौटुंबिक आयुष्याच्या देव्हाऱ्यात पवित्र प्रवेश होत असतो.असेच रक्तविरहित नात्यातील,मात्र रक्ताच्या नात्यासारखेच पवित्र नाते असलेले कौटुंबिक ज्येष्ठ स्नेही तीर्थस्वरूप भावलाल गोमलाडू सर तुम्ही माझ्या कुटुंबाच्या सदैव स्मरणात राहणार आहात.


पुनश्च एकदा माझ्या कुटुंबाकडून स्व.तीर्थस्वरुप भावलाल हिरालाल गोमलाडू राजपूत सरांना भावपूर्ण श्रद्धांजली..!🙏🙏🙏🙏 


ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच भारत मातेच्या चरणी प्रार्थना.🙏


वंदे मातरम् 

लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २२/८/२०२५, शुक्रवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा