सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०

" मला,जाहीर होऊन न मिळालेले बक्षीस....! "






** आमचे गाव आमची माणसं..! **

" मला,जाहीर होऊन न मिळालेले बक्षीस....! "
====================================

सध्या पुलवामा येथील हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना अमकी...मदत तमकी मदत बरेच जण जाहीर करत आहेत..!
संबंधित  माणसांचा हा दातृत्वाचा निर्णय अतिशय स्तुत्य आहे..! त्यांना त्याबद्दल त्रिवार वंदन..!
पण..काही ग्रेट दात्रुत्व अन् दान करणारे वगळता यातील काहीजण खरंच अमकी.. अमकी मदत करत असतील का हो...?

याचा एक माझा अनुभव सांगतो..! वास्तविक माझा अनुभव व सध्याच्या सैनिकांच्या कुटुंबियांना मदत देणाऱ्या लोकांच्या भावनेचा व कृतीचा अजिबात संबंध नाही.फक्त एकाच बाबतीत समान संबंध येतो..! अन् तो म्हणजे..दुसऱ्याला मदत करायची हे टाहो फोडून सांगायचे,पण प्रत्यक्षात मात्र काहीच द्यायचे नाही...!

मी  पालखेड ता.वैजापूर येथे श्री पारेश्र्वर विद्यालयात इयत्ता १० वी ला होतो.आमची १० वीची परीक्षा मार्च १९९२ मध्ये होणार होती. तत्पूर्वी आमच्या शाळेत २६ जानेवारी १९९२ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम झाला.त्यात आमच्या पालखेड गावातील एका सद्गृहस्थाने..
" जो कुणी यावर्षी १० वी च्या परीक्षेत पहिला क्रमांक घेईल त्याला काही रुपयांचे बक्षीस देण्यात येईल..!"
असे मोठमोठ्या आवाजात सर्वांसमक्ष जाहीर केले होते.

मग काय...मी ही..खूप अभ्यास करायला लागलो.कारण बक्षीस कसही करून मिळवायचेच असा मनात चंग बांधला होता..! आमच्या अभ्यासाच्या खोलीत मी अन्  माझा खूप जिवलग बालमित्र डॉ.गणेश वाणी आम्ही दोघेच खूप खूप अभ्यास करायचो.मार्च महिन्यात इ.१० वी ची परीक्षा दिली.अभ्यास खूप केला असल्याने सर्व पेपर खूप चांगले  गेले होते.

जेंव्हा आमच्या इ.१० वीच्या परीक्षेचा निकाल लागला..त्यात मी आमच्या श्री पारेश्वर विद्यालयात पहिला क्रमांक पटकावला होता..! मला खूप खूप आनंद झाला होता.माझे त्यावेळी वय पौगंडावस्थेतील असल्याने खूप आतुरता लागली होती..की...कधी. मला त्या... सद्गृहस्थाने  जाहीर केलेले बक्षीस मिळते याचे..!

गावात ते बक्षीस जाहीर करणारे सदगृहस्थ दररोज मला दिसायचे. ते पण मला पाहायचे..!त्यांनाही माहीत होते की, यानेच इ.१० वी मध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे...म्हणून...!
आज...देतील....!
उद्या देतील..!
परवा देतील..!
पण कशाच काय....
त्या न मिळालेल्या बक्षिसाची वाट पाहता..पाहता..माझा डी एड.ला नंबर ही लागला.मी गुरुजी सुध्दा झालो.गुरुजी होऊन तब्बल २४ वर्ष सेवाही झाली..! त्यानंतर पुढील उच्च शिक्षण दोन विद्यापीठात बी.ए. पूर्ण केले, त्यानंतर एम.ए. बी.एड देखील पूर्ण केले,पण...ते  फक्त जाहीर झालेले बक्षीस मला कधीच मिळाले नाही..!

जाऊ द्या..! नका..का..मिळेना..! मी त्या बद्दल कधीच कुणाजवळ विषय काढला नव्हता.त्यांनी जरी  जाहीर करून देखील बक्षीस  मला दिले नाही त्या बद्दल मी नाराज न होता..उलट त्यांनी बक्षीस जाहीर केल्यामुळे मी खूप जिद्दीने अभ्यास केला होता अन् पहिला क्रमांक पटकावला होता..हा सकारात्मक भाव त्यात पहिला..!

फक्त एक सल कायमची माझ्या मनात घर करून बसली की,अजूनही जाती धर्माचा भेदभाव करून अनेक एकलव्यांना एकतर स्पर्धेत उतरू दिल्या जात नाही..! यदा कदाचित एखादा एकलव्य स्पर्धेत यशस्वी झालाच तर त्याला पद्धतशीरपणे खड्या सारखं बाजूला फेकल्या जाते..! आजही समाजात जेंव्हा जाती वरून भेदभाव करणाऱ्या विकृत मानसिकता नजरेत पडल्या की,खूप चीड येते त्यांच्या त्या कृत्यांची..! अजूनही जातीपातीचे बुरुज पूर्णपणे ढासळलेले नाहीत...!

खूप खूप धन्यवाद..मला बक्षीस न देणाऱ्या सद्गृहस्था...!
तुम्ही मला खूप जिद्दीला लावले अन् त्यामुळेच मी इ.१० वी ला श्री. पारेश्वर विद्यालय,पालखेड,ता.वैजापूर  मध्ये पहिला क्रमांक पटकावला होता..!

आजही जेंव्हा..कधी मधी पालखेड येथे जाणे होते,विशेषकरून गावच्या यात्रेला,त्यावेळी ते सद्गृहस्थ नक्की दिसतात.ते पण मला पाहतात अन् मी पण त्यांना पाहतो..! आणि माझ्या मनात आजही तोच प्रश्न कायम आहे..." यांनी असे का केले...होते..? "

ता.क.:  कृपया कुणीही त्या सद्गृहस्थांचे नाव विचारू नये..!नाहीतर उगीचच ते मला त्यावेळी जाहीर केलेले बक्षीस आता माझ्या या प्रौढ वयात मला घरपोच आणून द्यायचे..!

वंदे मातरम्..!

जाहीर झालेले बक्षीस न मिळालेला त्या काळातील पौगंडावस्थेतील एक हळुवार मनाचा विद्यार्थी: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव ©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

 माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक:१७ फेब्रुवारी २०१९ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: १७ फेब्रुवारी २०२०, सोमवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा