गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

" आता पुन्हा तो " राम राम..!" होणे नाही..! "😔



 


मला प्रवासात भेटलेली माणसं..!


" आता पुन्हा तो " राम राम..!" होणे नाही..! "😔


==================================


मी ज्यावेळी इ. स.१९९५ ला शिक्षक म्हणून वैजापूर तालुक्यात नोकरीला लागलो तेंव्हा असे मनात धरून चाललो होतो की, माझ्या संपूर्ण शिक्षकी आयुष्यातील सेवा ही आमच्याच वैजापूर तालुक्यात विविध गावात जाईल. मात्र जे आपल्या मनात असतं ते बऱ्याचदा होत नाही, अन् असं न होण्यामागे त्या नियतीनेच आपल्याला अजुन इतर विश्वाचा पसारा दाखवायचं नक्की केलेलं असतं..! वैजापूर तालुक्याच्या बाहेर, इ. स.२०११ साली गंगापूर तालुक्यात शिक्षक म्हणून प्रवेश झाला..! गंगापूर तालुका ,तसा आमच्याच वैजापूर तालुक्याचा जुळाभाऊ..! आणखी विशेष म्हणजे  याच गंगापूर तालुक्यात माझे डी एड चे खूप जिवलग मित्र जसे की, दत्ता भाऊ घोगरे, जनार्दन राऊत, दादाभाऊ, सुनील जाधव, भगवान हिवाळे इत्यादी असल्याने आपल्याच तालुक्यात सेवा करायला मिळणार या मानसिकतेत मी होतो..!


मात्र....

शासनाच्या ऑनलाईन बदली धोरणामुळे मला बदली होऊन सिल्लोड तालुका अन् त्यातील अंधारी गाव मिळाले. कधी आयुष्यात सिल्लोड तालुक्यात जाण्याचा प्रसंग आला नाही,आणि अंधारी नावाचे गाव पहिल्यांदाच ऐकले अन् तिथं हजर होण्यासाठी फुलंब्रीच्या पुढे विचारत विचारत गेलो. अंधारी शाळेत उपस्थित होण्याच्या दिवशीच गावाच्या बाहेरील पुलावर एका काहीशा अंध व्यक्तीला मी शाळेचा नेमका पत्ता विचारला,त्यावर त्या व्यक्तीने मला सांगितले की,

" मी शाळेतच चाललो आहे, चला माझ्या सोबत.मी तिथं शिपाई म्हणून आहे, कैलास उबाळे माझं नाव..!" 

हे ऐकल्यावर मला अजुन आधार जाणवला. शाळेत जाऊन हजर झालो.मी लगबगीने बाहेर आलो.उबाळे मामा, बाहेरच उभे होते.मी त्यांना माझा सर्व परिचय दिला.त्यावर त्यांचं एक वाक्य कायमचं मनात घर करून गेलं, अन् ते वाक्य होतं,

" सर, तुम्ही औरंगाबाद, बजाजनगर हून दररोज येणार आहात, तुमच्या  घरी  म्हातारं माणूस ( माझे वडील ) हाये, म्हाताऱ्याची काळजी घ्या..! प्रवासात घाई करू नका, अडीअडचणीत कामं येईल म्हणून एक रजेचा अर्ज माझ्याकडं राहू द्या..! "

या त्यांच्या अतिशय समजूतदार वाक्यांनी मला खूप गहिवरून आलं होतं,पण काही भावना व्यक्त करायच्या नसतात,त्या स्पर्शाच्या जाणिवेतून व्यक्त करायच्या असतात या भावनेतून मी आदरणीय उबाळे मामांच्या खांद्यावर मायेनं हात ठेवला..! कोण,कुठला नंदन ,अन् या निव्वळ अपरिचित गावात हक्काच्या मायेनं बोलणारं पहिलं जर कुणी भेटलं असेल तर ते आदरणीय उबाळे मामाच..! ज्यांना भावनेच्या जाणिवांची जाणीव असते,त्यांच्यासाठी असे प्रसंग चिरकाल स्मरणात राहणारे असतात..! बाकी निष्ठुर मनाला यात काहीही जाणवणार नाही हेही तितकंच खरं..!


मग काय...अंधारी शाळेत उपस्थित झाल्यापासून दररोज आपण एखाद्या देवळात प्रवेश केल्यानंतर जशी पवित्र निनादाची घंटी वाजवतो,अगदी तसेच , शाळेत प्रवेश केल्या केल्या आदरणीय उबाळे मामांना......

" राम, राम मामा..!" अशी साद घातल्यानंतरच माझी दररोजची शिक्षक हजेरी पटावर स्वाक्षरी होऊ लागली..!


मी माझ्या ऑफ पिरियड ला देखील वर्गातच असायचो,तेंव्हा बऱ्याचदा उबाळे मामा,माझ्या वर्गात हळूहळू चालत यायचे अन् मायेनं म्हणायचे...

" सर, आता बस करा, तुम्ही सकाळपासून वर्गातच आहात, जा खाली, आरामशीर बसा आता..!"

उबाळे मामांचे हे हक्काचे प्रेमळ बोलणे ऐकून माझ्या मनातील भावनेचा कोपरा अजुन टवटवीत व्हायचा..! सकाळी शाळेत गेलो की, आदरणीय उबाळे मामा, बऱ्याचदा हक्काने मला, त्यांची शिक्षक हजेरी पटावर त्यांचा हात धरून स्वाक्षरी करायला सांगायचे..! मी ज्यावेळी शाळेत हजर झालो त्यावेळी ,अगदी सुरुवातीला इयत्ता आठवीच्या वर्गात ज्यावेळी उबाळे मामा, विद्यार्थी गोषवारा रजिस्टर घेऊन आले होते,तेंव्हा त्यांनी त्यांच्या भाषेत वर्गातील सर्व विद्यार्थांना सांगितले होते की,

" पोरांनो, जाधव सरला त्रास देऊ नका रे..!"

वाक्य अगदी साधं होतं,पण त्यातील भावार्थ खूप मोठा होता..!


आदरणीय उबाळे मामा, तसे गाण्याच्या बाबतीत देखील रसिक होते,हे त्यांच्या विविध गाण्यांच्या आवडीनिवडी वरून माझ्या लक्षात आले होते.आदरणीय उबाळे मामा यांचं खूप आवडतं गाणं होतं,  ' अशीही बनवाबनवी ' या चित्रपटातील " हृदयी वसंत फुलताना,प्रेमात रंग यावे..!"

केवळ याच गाण्याच्या प्रेमापोटी मामांनी त्यांच्या मोबाईलची रिंग बॅक ट्यून याच गाण्याची ठेवली होती, हे मामांनी मला आवर्जून सांगितलेलं होतं..! आमच्या अंधारी प्रशालेतील सर्व शिक्षकांचे अन् विद्यार्थांचे खूप आवडते होते,आदरणीय उबाळे मामा..!


दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रक्षाबंधन हा एक उत्सव माणसांच्या एकमेकांच्या नात्यात माणुसकीचा, मायेचा, आत्मीयतेचा धागा घट्ट व्हावा म्हणून त्याच पवित्र भावनेने साजरा केला जातो.मी दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी आदरणीय उबाळे मामांना राखी बांधायचो..! त्यावेळी उबाळे मामांना झालेला आनंद ,माझ्या मनाला अतिशय सुखावून जायचा..!


नियती जितकी प्रेमळ असती तितकीच ती निष्ठुर देखील असते.याच निष्ठुर नियतीने काल दिनांक २/९/२०२० रोजी आदरणीय उबाळे मामांना,आपल्यातून हिरावून घेतले..!अंधारी प्रशालेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी एका नात्याला कायमचे पोरके झाले..! आता मी जेंव्हा जेंव्हा अंधारी प्रशालेतील इमारतीत सकाळी सकाळी प्रवेश करील तेंव्हा तेंव्हा आता " राम राम मामा..!" अशी प्रेमळ हाक घालायला उबाळे मामा तिथं नसणार..! आता तिथं फक्त आणि फक्त उबाळे मामांच्या अनेक स्मृती एकवटलेल्या असतील..!त्या प्रत्येक एकवटलेल्या आठवणीत उबाळे मामांच्या  आठवणीतील सहवासाचा  फक्त गहिवर माझ्या सोबत असेल..! मात्र प्रत्यक्ष मधुर सहवासाचा तो उल्हास त्यात नसेल..! 


माझी शिक्षक म्हणून जी काही सेवा सिल्लोड तालुक्यातील अंधारी प्रशालेत होत आहे ती या तालुक्यातील शेवटचीच सेवा राहील,कारण मी कधी ना कधी गंगापूर किंवा वैजापूर तालुक्यात परत जाईल,पण...या अंधारी प्रशालेतील  आदरणीय उबाळे मामांच्या सोबतचा आठवणीतील सुंदर असा गहिवर नक्कीच सोबत घेऊन जाईल..! शेवटी माणसाचं आयुष्य तरी काय असतं हो..? अगदी साधं सोपं म्हणजे, आपल्या आयुष्यातील वाटेवर भेटणाऱ्या विविध प्रवाशांच्या आठवणींचा देव्हारा अन् त्याच देव्हाऱ्यात मांडून ठेवावीत अशी मोजकी पण खूप चांगली भेटलेली प्रेमळ माणसंच, दुसरं काय..! 🙏


आदरणीय स्वर्गीय उबाळे मामांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

तुम्ही सदैव आठवणीत राहशाल, यात तिळमात्र शंका नाही..! आता फक्त माझ्या मनात एकच खंत राहील..

" आता पुन्हा तो " राम राम..!" होणे नाही..! "😔


वंदे मातरम्...!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव 


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक : ३/९/२०२०, गुरुवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा