शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

बरं झालं मी माणूस नाही..!


 


चिंतन


" बरं झालं मी माणूस नाही..! "

( एका पक्षाचे मनोभाव )


=================================


माणसांच्या गोंगाटात दिवसभर माझा जीव पार घाबरून जातो..! संध्याकाळ केंव्हा होईल अन् त्यानंतर रात्र केंव्हा होईल याच प्रतीक्षेत देखील मी पार थकून जातो..!


अखेर ती रात्र येते अन् मी निवांत होतो, एकांतात बसुन माणसावर आत्मचिंतन करायला..!

या आत्मचिंतनात माझ्या विचाराची अखेर होते, आणि स्वतः शीच व्यक्त होतो...

" बरं झालं मी माणूस नाही..! कारण माणसाने, माणसांची निवातंपणाची क्षेत्रे कधीचीच काबीज केली आहेत, सर्वार्थाने अतिक्रमण करून..! आमच्यात माणसा सारखे नाही होत, याकरिता त्या अदृश्य शक्तीला माझे त्रिवार वंदन..! 


मला पुन्हा उद्याच्या सकाळची भीती वाटते..! सकाळ झाल्यावर पुन्हा तोच गोंगाट, तोच माणूस, पुन्हा पाहायला मिळणार आणि पुन्हा मला एक संपूर्ण दिवस जीव मुठीत धरून काढावा लागणार..! पूर्वी जिथं आम्ही निवांत होतो,आज तिथं देखील आक्रांत होत आहे,विविध प्रसारणांचा..!त्या आक्रांतात, आमचा निसर्गतः लाभलेला  एकांत, माणसामुळे भिवून जातो..! आमच्या त्याच एकांताला गेल्या काही वर्षांपासून माणसाची नजर लागली आहे..! 

 बरं झालं मी माणूस नाही..!


म्हणून मी, याच निवांत रात्रीची दररोज रात्री आतुरतेने वाट पाहत असतो अन् त्यात स्वतःला एकांतात ध्यानस्थ करून घेत असतो..! ज्याला माणसात ' डिप्रेशन ' असं म्हणतात, तसला काही एक प्रकार आमच्यात अजिबात नसतो..! बहुदा ' डिप्रेशन ' ही अखिल माणसाला माणसाने दिलेली सर्वोत्तम देणगी असावी, माणसाचं मन उध्वस्त करणारी..! 

 बरं झालं मी माणूस नाही..!


याच निवांतपणात आम्हाला सापडतो, त्याच नियंत्याचा ,निवांत अमृत सहवास..! दिवसाच्या गोंगाटात तोच अमृत सहवास, पार भेदक स्वरूप धारण करतो अन् पुन्हा एकांतातील ,आम्हाला उध्वस्त करत सुटतो..!

 बरं झालं मी माणूस नाही..!


मी असं ऐकलंय की, कुठेतरी एक माणूस, आमच्यातील एकांतवास प्रभू केदारनाथाच्या सानिध्यात शोधतोय म्हणे..! नियतीने आमच्यातील संवेदना माणसाच्या रुपात कुठे का होईना, कुणाला का होईना देण्याचं नक्की केलेलं दिसतंय..! अशी काही माणसं बघितली, पाहिली की, आमच्याही मनात विचार येतो की....

हे विधात्या, त्या वैराग्य प्राप्त माणसासारखं ,वैराग्य आम्हालाही दे..!


ता.क. - सदरील पक्षी, दररोज रात्री, आमच्या घराच्या गॅलरीत बसायला निवांतपणे येत असतो. आज त्याच पक्षाच्या अंतर्मनातील बहुदा असणारे मनोभाव ,माझ्या लेखणीच्या द्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे..!


वंदे मातरम्...!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक - ४/९/२०२०, शुक्रवार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा