आमचे गाव आमची माणसं ©️
अलबेला शाम
" प्रारंभ, मैत्रीच्या पर्वाचा..!"
==============================
मित्र अन् मैत्री काय असते असं कुणी विचारलं तर अनेकजण आपापल्या परीने आपल्या आयुष्यात भेटलेल्या अनेकांना त्यात शोधत बसतील.आपल्या आयुष्यात भेटलेल्या प्रत्येक मित्राचे अस्तित्व तसे बघितले तर त्या प्रत्येक मित्राच्या भिन्न भिन्न प्रकारच्या स्वभाव वैशिष्ट्यांनी सजलेले असते. कुणाला तो मित्र श्रीकृष्णा - सुदामा सारखा भेटतो, कुणाला तो मित्र राज ठाकरे - बाळा नांदगावकर यांच्या सारखा भेटतो, तर कुणाला तो मित्र थोर लेखक सुहास शिरवळकर सरांच्या दुनियादारी मधील DSP उपाख्य दिगंबर शंकर पाटील उपाख्य दिग्या सारखा भेटतो. दुनियादारी मधील दिग्या जसा डेरींगबाज अन् मनाने निर्मळ ,तसाच आमचा प्रिय शाम..! या सर्व प्रकारच्या स्वभाव गुणांनी युक्त भेटणाऱ्या सर्व मित्रात तेच मित्र प्रत्येक रंगात आपल्या सोबत न्हावून निघतात,ज्यात दुनियादारी मधील दिग्या लपलेला असतो..!
थोर लेखक सुहास शिरवळकर सरांनी ज्या ताकदीने आपल्या दुनियादारी या कादंबरीत दिग्या उभा केला, रेखाटला तोच दिग्या एखाद्याच्या आयुष्यात प्रत्यक्ष भेटला तर अशा माणसाच्या आयुष्याची दुनियादारी नक्कीच प्रगल्भ होते.
थोर लेखक सुहास शिरवळकर सरांचा मानसपुत्र असलेला दिग्या आम्हा काही बालमित्रांना त्यांच्या आयुष्यात लाभला अन् आमची मित्रांची दुनियादारी बहरत गेली.कोण होता तो, ज्यानं आम्हाला निडर व्हायला शिकवलं, रफ अँड टफ व्हायला शिकवलं.! तो होता आम्हा सर्व बालमित्रांच्या गळ्यातील ताईत शामकांत मुरलीधर शेळके..!
शामकांत मुरलीधर शेळके, ज्याला आजही आम्ही नेहमी आमच्या बालमैत्रीच्या नात्यातून ' शाम्या ' म्हणत असतो अन् तो ही आम्हाला आमच्या एकेरी नावाने हाक देत असतो.जसे की, ' नंद्या..! ' अर्थात वेळ काळ प्रसंग पाहून त्यात बदल होतो. शाम अन् माझ्या मैत्रीचा अध्याय तसा सुरू झाला तो आमच्या माध्यमिक शाळेतील वयोगटापासून..! त्याचं कारण आमची एकमेकांची पालखेड येथील घरे दूर होती, त्यामुळं प्राथमिक शाळेतील वयोगटात तो मैत्रीचा बहर,बहरला नाही. जेंव्हा आम्ही इयत्ता आठवी मध्ये प्रवेशित झालो त्यावेळी माझ्या सोबत होते, माझ्या गल्लीतील माझे खूप जिवलग बालमित्र गणेश वाणी अन् विजू गायकवाड..! जसजसा मैत्रीचा पसारा वाढत गेला तसतसे त्यात अजुन हिरे,माणिक मोती सामील होत गेले.इयत्ता आठवी मध्ये प्रवेशित झाल्यावर हा शाम आम्हाला त्याच्याकडे आकर्षित करायला लागला. त्यांचं बोलणे, त्याचा डेरींगबाज स्वभाव, त्याची प्रत्येक खेळातील चपळाई, त्याचा हजरजबाबीपणा इत्यादी गुणांनी आम्ही एकमेकांच्या मैत्रीच्या विश्वात सामील झालो. आमचा हा बालमित्र हजरजबाबीपणा मध्ये इतका तरबेज आहे की, एकदा त्याने कुलूप अन् किल्ली वरून सहजपणे व्यक्त केलेलं वाक्य आम्हा काही बालमित्रांच्या आयुष्यात अजरामर होऊन गेलेलं आहे. कुलूप अन् किल्लीचा विनोद बहुदा फक्त विजू गायकवाड, मी अन् शाम आम्हालाच माहीत असावा..! 😊
तसे बघितले तर आमच्या वर्गात तऱ्हेतऱ्हेचे नमुने होते. , काहीजण तथाकथित सभ्य श्रेणीत मोडणारे होते.अर्थात या संपूर्ण विश्वात, संपूर्ण मानव जातीस सभ्य श्रेणीत मोडणारे कुणीच नाही,कारण प्रत्येकात दादा कोंडके लपलेला असतो या सिद्धांतावर माझा प्रचंड विश्वास आहे. आमची श्री.पारेश्वर माध्यमिक विद्यालय ही शाळा इ. स.१९९२ पर्यंत , सध्याची पालखेड येथील जी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची इमारत आहे तिथं होती.याच इमारती मधील तीन वर्गखोल्या इयत्ता आठवी,नववी अन् दहावी साठी त्यावेळी उसन्या , वापरायला दिलेल्या होत्या.आमचा इयत्ता आठवीचा कोपऱ्यात होता. आमच्या माध्यमिक शाळेतील तुकड्या वाढल्यानंतर काही वर्ग रवींद्रनाथ टागोर यांच्या आयुष्यातील झाडाखाली भरणाऱ्या शांतिनिकेतन सारखा शाळेच्या प्रांगणात असलेल्या कडुलिंबाच्या झाडाखाली भरायचा. त्यामुळं निसर्गातलं निरीक्षण अन् गावाच्या आत बाहेर जाणारी माणसं अधून मधून दिसायची अन् त्यांचं निरीक्षण करून जे भेटेल तेही ज्ञान प्राप्त व्हायचे.
आमचा खूप जिवलग बालमित्र शाम हा वर्गात आमच्या बॅक बँचर असणाऱ्या मोजक्या मित्रांपैकी एक होता.त्यात मी स्वतः, आण्णासाहेब म्हस्के ( ह.मु. औरंगाबाद ), शेख खाजा बागवान ( ह.मु. औरंगाबाद ), भागिनाथ गोरे, संतराम काळे ( खिर्डी ), गणेश निकम ( ह.मु. औरंगाबाद) कंमु बेग मिर्झा ( जळगाव) नंदकिशोर जाधव इत्यादी आम्ही प्रामुख्याने आम्ही मागेच बसायचो. शाळेच्या क्रीडा तासिकेला असणाऱ्या प्रत्येक वेळी हाच शाम पुढाकार घ्यायचा.क्रिकेट हा खेळ याचा जीव की प्राण..! क्रिकेट खेळाचे गारूड एवढे अंगात भिनलेले होते की, अक्षरशः याच प्रिय बालमित्र शामची गाय जळगाव अन् पालखेड सीमेवर असणाऱ्या बोर नदी परिसरात चरायला गेली होती. पावसाचे दिवस असल्याने तेथील गाळात फसली होती. शामला ही बातमी समजली ,तरी पठ्ठ्या एकदा क्रिकेट सामना खेळला अन् मग ती गाय आणायला गेला.अर्थात गायीला सुखरूप घरी घेऊन आला होता. बरेच दिवस ही आम्हाला दंतकथा वाटत होती,पण हे खरं होतं.
याच प्रिय बालमित्र शाम मुळे त्याच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या, त्याच्या सानिध्यात राहणाऱ्या अनेक मित्रांचे आगमन माझ्या आयुष्यात होणार होते.माझा शामशी खूप संपर्क वाढला होता. शामची जी त्याच्या घराच्या परिसरातील मित्रमंडळी होती, ती देखील मैत्रीच्या देवतेने आपल्याला एखादा प्रसाद द्यावा तशीच खूप गोड होती.असणारच,कारण मुळात शाम हाच स्वच्छ मैत्रीच्या नात्यातील कोहिनूर होता..!🌹
वंदे मातरम्..!
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - ०१/०७/२०२२, शुक्रवार
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा