आमचे गाव आमची माणसं ©️
अलबेला शाम - भाग क्रमांक: ३
" फुटाण्याच्या चोरीचे आम्ही मुक साक्षीदार..!"
====================================
माध्यमिक शाळेतील वयोगटात आम्ही सर्व बालमित्र स्वर्गसुख अनुभवत होतो. शाम शेळके हा जरी आमच्या पालखेड येथील घरापासून गावातच दूर राहत होता ,तरी आमच्या मधील मैत्रीने ते अंतर कधीच दूर केले होते. मी, विजू गायकवाड अन् गणेश वाणी ज्या अभ्यासाच्या खोलीत अभ्यास करायचो त्या खोलीत आम्ही अन् आमचे बालमित्र अभ्यास झाला की,कधीमधी रात्री जमायचो.
आम्ही इयत्ता दहावीत असताना आमच्या वर्गातील सर्वात शांत अन् समंजस असलेला आमचा प्रिय बालमित्र गणेश वाणी याने एकदा त्याच्या घरून रात्रीच्या वेळी खायला फुटाणे आणले होते.काही फुटाणे खाल्ले अन् उरलेले थोड्यावेळाने खाऊ या हेतूने गणेशने ते फुटाणे आमच्याच अभ्यासाच्या खोलीत गोधडीच्या खाली कोपऱ्यात ठेवून दिले.काही वेळाने साधारणतः रात्री नऊच्या वेळी इतर अभ्यासाच्या खोलीत राहणारे मित्र जसे की, शाम शेळके अन् आण्णासाहेब म्हस्के त्यांचा अभ्यास झाल्यावर गप्पा मारायला आमच्या अभ्यासाच्या खोलीत आले होते.गणेश वाणी याने फुटाणे खायला आणलेले आहेत अन् ते गोधडीच्या खाली ठेवलेले आहेत, हे आण्णासाहेब म्हस्के याला कसे काय माहित झाले ,माहीत नाही,पण आण्णाने हळूच ,गुपचूप फुटण्याची पुडी घेतली अन् मस्तपैकी आमच्या अभासाच्या खोलीच्या समोर असणाऱ्या सुराशे पाटील यांच्या दगडी जोत्यावर खात बसला. शाम शेळके याला , आण्णासाहेब म्हस्के याने गुपचूप अर्थात चोरून घेतलेले फुटाणे खायचे नसल्याने तो सूराशे यांच्या जोत्यावर बाजूला बसला होता. थोड्यावेळाने गणेश वाणी याला , त्याने आणलेल्या फुटाण्याची आठवण आली अन् आता ते फुटाणे खावे या हेतूने त्याने फुटाणे ठेवलेल्या अंथरलेल्या गोधडीच्या खाली हात घातला. मी माझा अभ्यास करत बसलेलो होतो.गणेश अंथरलेल्या गोधडीला पुन्हा पुन्हा वर खाली करून बघू लागला , पण त्याला काही फुटाण्याची पुडी सापडेना.गणेशचे लक्ष आमच्या अभ्यासाच्या खोलीच्या बाहेर गेले.त्याला समोरील दगडी जोत्यावर आण्णासाहेब म्हस्के अन् शाम शेळके हे दोघेजण ऋषिपाठक गुरू यांचा जो वाडा होता त्या बाजूला तोंड करून बसलेले दिसले.
गणेशला पक्का संशय आला होता की, माझे फुटाणे या दोघांनीच लंपास केले आहे.गणेश हळूहळू खोलीच्या बाहेर आला अन् जोत्याच्या दिशेने चालला. मीही त्याच्या मागोमाग चाललो होतो. त्याला तिथं आण्णासाहेब म्हस्के हा मस्तपैकी फुटाणे खाताना दिसला.शाम शेळके बाजूला बसलेला होता.गणेशला कधीच राग येत नव्हता,पण त्याला त्यावेळी इतका राग आला होता की, त्याने मोठ्याने आण्णासाहेब म्हस्के याला बोलायला सुरुवात केली.शाम शेळके नुसता डोळे वटारून पाहत होता.मी अन् शाम शेळके सज्जन असल्याचा आव आणून समजूतदारपणा असल्याची भाषा वापरू लागलो होतो.गुपचूप अन् अचानकपणे गणेशने येऊन आण्णासाहेब म्हस्के वर सुरू केलेल्या शब्दांच्या भडीमाराने आण्णासाहेब म्हस्के पुरता गडबडून गेला होता.आण्णासाहेब म्हस्के याने जे तिथून धूम ठोकली तो सरळ आमच्या घराच्या बाजूला असणाऱ्या बोळीत शिरला अन् गणेश वाणी सरळ पळत जैन गल्लीत आण्णासाहेब म्हस्के याला पकडायला धावत गेला होता. आण्णासाहेब म्हस्के हा बोळीत शिरून नंतर त्याच ठिकाणी असणाऱ्या नळाच्या पाण्याच्या खड्ड्यात लपून बसला होता, हे मी अन् शाम शेळके आम्ही दोघांनी बघितले होते. अंधाराचा फायदा घेऊन आण्णासाहेब म्हस्के हा नळाच्या पाण्याच्या खड्ड्यात लपून बसला होता.गणेशने त्याला गल्लीत शोधले पण म्हस्के काही सापडला नाही.वास्तविक मला अन् शाम शेळके आम्हाला माहीत होते की, ज्या नळाच्या पाण्याच्या खड्ड्यात आण्णासाहेब म्हस्के लपून बसलेला आहे म्हणून..! त्याच खड्ड्याच्या बाजूला उभा राहून गणेश वाणी,सापडत नसलेल्या आण्णासाहेब म्हस्के याला रागारागाने बोलत होता. इकडे मला अन् शाम शेळकेला हसू येत होते. ज्याला गणेश वाणी शोधत होता, तो आण्णासाहेब म्हस्के,गणेश वाणी उभा असलेल्या पाठीमागील खड्ड्यातच होता.पण आम्ही शेवटपर्यंत गणेश वाणी याला सांगितलेच नाही की,तू ज्याला शोधतोय तो तुझ्या पाठीमागेच आहे म्हणून..!
अखेर गणेश वाणी वैतागून अभ्यासाच्या खोलीत आला अन् झोपी गेला.मी अन् शाम शेळके त्या नळाच्या पाण्याच्या खड्ड्याकडे गेलो अन् आण्णासाहेब म्हस्के याला गुपचूप त्याच्या अभ्यासाच्या खोलीकडे जायला सांगितले. शाम शेळके देखील त्याच्या अभ्यासाच्या खोलीकडे निघून गेला अन् मीही आमच्या अभ्यासाच्या खोलीत येऊन झोपी गेलो.
आम्हा बालमित्रांना, आमच्या प्राथमिक अन् माध्यमिक शाळेतील वयोगटात असताना जे आयुष्य लाभले होते ते नियतीने आम्हाला आयुष्यात दिलेले सर्वोत्तम वरदान होते.आम्ही सर्व वर्गमित्रांनी तत्कालीन आयुष्याचा पुरेपूर आनंद घेतला होता.तो गतकाळातील लाभलेला ,मिळालेला आनंद, एकमेकांच्या खोड्या आज आठवल्या की, प्रौढत्वाकडे झुकत चाललेले आमचे शरीर अन् मन अजुन चिरतरुण होत जाते.खंत फक्त याची वाटते की, या सगळ्या आठवणी ज्या बालमित्राच्या साक्षीने झाल्या, तो शाम मुरलीधर शेळके आज हयात नाही..!😔
वंदे मातरम्..!
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - १६/०७/२०२२, शनिवार.
क्रमशः




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा