रविवार, २४ जुलै, २०२२

अलबेला शाम - भाग क्रमांक: ४



 


आमचे गाव आमची माणसं ©️


अलबेला शाम - भाग क्रमांक: ४


" अभ्यासिका करिता बल्पची चोरी..!"


===============================


माध्यमिक शाळेतील वयोगटात असताना आमच्या वर्गातील मित्रांचा अभ्यास तर सुरूच होता ,पण त्यासोबत खोड्या देखील सुरू होत्या.अर्थात त्याकाळी होणाऱ्या खोड्या या आमच्या वयोगटाचा अन् गरजेचा जाणवणारा दृश्य परिणाम होता असं आज प्रौढत्वाकडे झुकत चाललेल्या मनाला अन् शरीराला जाणवत राहतं.


अभ्यासाच्या खोल्या एकूण तीन होत्या.मी , गणेश वाणी अन् विजू गायकवाड आमची एक..! विजू गायकवाड हा काही दिवसांनी त्याच्या घरीच अभ्यास करायला गेला होता. दुसरी अभ्यासिका होती शाम शेळके,बाळू कचरू घोडके अन् बाळू माळी यांची..! तिसरी अभ्यासिका होती आण्णासाहेब कारभारी म्हस्के, ज्ञानेश्वर मोकाटे यांची..! अभ्यासिकेत अभ्यास करणारे आम्ही कधीही आमच्या अभ्यासाच्या खोलीत बल्प विकत घेतला नाही.त्यावेळी पिवळ्या रंगाचा प्रकाश पडणारा साठ किंवा शंभर वॅटचा बल्प सर्रास वापरले जायचे. आमची अभ्यासाची खोली,आमच्याच गल्लीत होती.आमच्या अभ्यासाच्या खोलीत असणारा लाईट, खोलीच्या लगतच असणाऱ्या मुलमुले कुटुंबाच्या घरातून भिंतीला छिद्र पाडून घेतलेली होती.एका महिन्यासाठी दरमहा पाच रु. आम्ही मित्र  मुलमुले मामींना द्यायचो.


आमच्याच गल्लीत आमच्या घराच्या समोर एक विद्युत खांब होता.माझे वडील त्या खांबाच्या खालील बाजूला घरातून वायर घेऊन एक बल्प लावायचे.गावातील ग्रामपंचायत गल्लीतील खंब्यावर बल्प सहसा लावतच नसे, त्यामुळं घरातून लाईट आणून वायर द्वारे तो गल्लीत उजेड पडेल या हेतूने बल्प लावल्या जायचा. आमच्याच गल्लीत कोपऱ्यावर माझे चुलत्याचे घर होते. माझे चुलते तत्कालीन पालखेड गावचे पोलीस पाटील होते.माझे चुलते त्यांच्या घराच्या समोरच राहणाऱ्या पोपटराव ऋषीपाठक गुरू यांच्या घरातून लाईट, वायर घेऊन गुरूंच्या घराच्या कोपऱ्यावर बल्प लावायचे.


आम्हा मित्रांच्या अभ्यासिका मधील कुणाच्याही खोलीतील बल्प शॉट झाला की, शाम शेळके याची लगेच आठवण आम्हा मित्रांना यायची.अर्थात आम्हीही त्यात सहभागी असायचो,पण शाम शेळके हा खूप धाडसी असल्याने त्याची आठवण यायची अन् पुढील नियोजनाला सुरुवात व्हायची. सहसा पुढील नियोजन बैठक रात्री व्हायची ती प्रिय वर्गमित्र नंदकिशोर भाऊसाहेब जाधव याच्या घरी किंवा शाम शेळके यांच्या अभ्यासाच्या खोलीत व्हायची..! ज्याच्या अभ्यासाच्या खोलीतील बल्प शॉट झाला आहे त्याच्या खोलीसाठी बल्प कसा मिळवायचा याचं बैठकीत चिंतन, मनन अन् नियोजन व्हायचे. असेच एकदा शाम शेळके यांच्या अभ्यासाच्या खोलीतील बल्प शॉट झाल्यामुळे त्याच्याच खोलीत नियोजन सुरू झाले.मी, गणेश वाणी, आण्णासाहेब म्हस्के, बाळू माळी, बाळू घोडके इत्यादी आम्ही तिथं रात्री एकत्र जमलो. शाम शेळके म्हणाला..

" का, रे..नंद्या ,दादा ( माझे वडील) तुमच्या घराच्या बाहेरील लाईटच्या खांब्यावर बल्प लावत्या ना..रे..!"

मी " हो..!" म्हणालो. पुढे काय होणार याचा मला अंदाज आला होता.लगेच शाम शेळके म्हणाला..

" मंग, तुमचाच बल्प मध्यरात्री काढून आणु..!"

मी म्हणालो - " अरे शाम्या,  मी नियोजन करायच्या बैठकीत हाये अन् तू आमचाच बल्प रात्री काढून आणायचा म्हणतो, बावळट हाये का तू..?"

शाम म्हणाला - " चूप रे , नको शहाणपणा शिकू, चूप बैस..! फक्त दादांना ( माझ्या वडिलांना ) जाग यायला नको.नाहीतर तुझं म्हातारं लई डेंजर हाये भो, आपली लई धुलाई करील..!"  बाकीच्या मित्रांनी शामला सहकार्य करायचे ठरवले त्यामुळे मी चिडीचूप झालो.शाम शेळके म्हणाला..

" ठरलं तर मग, हे पहाय नंद्या, बरोबर रात्री बारा ते एकच्या सुमारास मी, म्हस्क्या ( आण्णासाहेब म्हस्के ) बाळ्या ( बाळू माळी ) अन् हा बाळ्या ( बाळू घोडके ) तुमच्या खोलीकडे येतो. गण्या ( गणेश वाणी ) तू खोलीतच थांब, तू बाहेर येऊ नको. बाळ्या ( बाळू माळी) अन् म्हस्क्या तूम्ही पोपट गुरूच्या घराच्या कोपऱ्यावर थांबा..! बाळ्या ( बाळू घोडके ) अन् नंद्या तुम्ही दोघेजण सुंदर शेठ जैन यांच्या घराच्या कोपऱ्यावर थांबा. नंद्या, मी तुझ्या घराच्या समोरील खांबावर  हळूच चढत चढत वर जाईल. तुम्ही जिथं आहात, तिकडून कुणी येताना दिसलं रे  दिसलं की, तुमच्या हातातील लाल बॅटरीचा उजेड माझ्याकडे करा.मी लगेच खाली उतरून नंद्याच्या खोलीत पळून जाईल..!"


शाम शेळके याने केलेलं नियोजन ऐंकुन मी पार थिजून गेलो होतो,कारण मी माझ्याच घरी बल्प चोरणाऱ्या मोहिमेत सहभागी होणार होतो.स्वतः ,स्वतच्या घरी चोरी  करणाऱ्या अतिशय दुर्मिळ माणसांच्या पंक्तीत मी स्वतः ला सुशोभित होताना बघत होतो. मला सगळ्यात मोठा धाक पडला होता तो दादांचा, म्हणजेच माझ्या वडिलांचा..! माझ्या वडिलांचा स्वभाव अतिशय शिस्तप्रिय अन् करारी होता. पण मित्रांच्या पुढे माझी कोणतीच दाळ शिजली नाही. जसे नियोजन केले होते त्यानुसार आम्ही आपापल्या नेमून दिलेल्या ठिकाणी मध्यरात्री जाऊन उभा राहिलो होतो.


मध्यरात्री सुराशे यांच्या दगडी जोत्यावर बसलेला शाम हळूच दबक्या पावलांनी आमच्या घराच्या समोरील खांबावर हळूच चढला अन् हळूच बल्प काढला.गल्लीत पूर्ण अंधार झाला होता.आम्ही सर्वजण आपापल्या ठिकाणावरून आमच्या अभ्यासाच्या खोलीत जमा झालो होतो.मला पार घाम फुटला होता.माझ्याच साक्षीने, मीच पहारा देऊन , माझ्याच डोळ्यासमोर आमच्याच बल्पची चोरी झाली होती.


दुसऱ्या दिवशी, दादांच्या लक्षात आले की, आपल्या घरासमोरील खांबावरील बल्प कुणीतरी चोरून नेला आहे म्हणून. माझे वडील बल्प चोरी गेलेल्या होल्डर कडे बघत होते अन् मी मुकाट्याने त्यांच्या बाजूला उभा राहून त्यांच्याकडे बघत होतो.


असाच पुन्हा दुसऱ्यांदा प्रिय बालमित्र आण्णासाहेब म्हस्के याच्या खोलीतील बल्प शॉट झाला होता.त्यावेळी जो बल्प मध्यरात्री गुपचूप काढून घेतला होता तो होता माझ्या चुलत्याने, पोपट गुरूंच्या घराच्या कोपऱ्यावर लावलेला तो..! तिथला बल्प चोरीला गेला की, माझे चुलते विचारात पडायचे की, आपला बल्प कोण चोरून नेत असेल..? असेच  बल्प आम्ही ज्या ज्यावेळी आमच्या खोलीतील शॉट झाले होते त्या त्यावेळी काढून आणलेले होते. सर्वात जास्त बल्प आम्ही काढले होते ते स्व.सुभाष शेठ छाजेड यांच्या दुकानाच्या बाहेर लावलेले. अर्थात या मोहिमेचे नेतृत्व असायचे ते आमचा प्रिय बालमित्र शाम शेळके याच्याकडे.


बल्पची चोरी आम्ही केली होती, ती कृती चूकच होती. या गोष्टी चुकीच्या आहेत ,हे त्या वयोगटात  आमच्या लक्षात येत नव्हतं, किंबहुना तो आमच्याकडून होणारा तो खोडसाळपणाच होता. आम्हा मित्रांच्या अभ्यासिका मधील काही मित्रांची आर्थिक परिस्तिथी मध्यम ते बिकट असायची ,त्यामुळं आम्हाला असे वाटायचे की, आपण अभ्यास करण्यासाठीच बल्पची चोरी करतोय, त्यात चुकीचे काहीच नाही अशी आमच्या त्या काळातील पौगंडावस्थेतील हळुवार वयोगटाची धारणा होती.


काळाच्या ओघात मी शिक्षक म्हणून नोकरीला लागलो.शाम शेळके हा छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) येथे महानगरपालिका अंतर्गत पाणी पुरवठा करायला लागला.बाळू माळी हा शिक्षक झाला.गणेश वाणी हा डॉक्टर झाला.आण्णासाहेब म्हस्के हा एमआयडीसी बजाजनगर ( औरंगाबाद ) येथे सुपरवायझर म्हणून नोकरीला लागला.विजू गायकवाड हा वैजापूर येथे नामांकित पत्रकार झाला.बाळू कचरू घोडके हा वाळूज - पंढरपूर येथील भाजी मंडई भाजीपाला संघटनेचा अध्यक्ष झाला. नंदकिशोर जाधव हा राजकीय क्षेत्रात आपलं करियर करू लागला.मी नोकरीला लागल्यावर  असेच एकदा मी पालखेड येथे स्थायिक असताना  शाम शेळके माझ्या घरी आला होता.माझे स्व. वडील बाहेरील ओट्यावर बसलेले होते. मीही बाजूलाच बसलेलो होतो. कित्येक वेळ त्यांचा गप्पांचा फड रंगला होता.ओघाओघात शामने माझ्या स्व.वडिलांना सांगून टाकले की, आम्ही मित्रांनी तुम्ही लावलेला बल्प चोरला होता म्हणून..! माझे वडील रागावले नाही. फक्त त्यांना याचे नवल वाटले की, एवढ्या बेमालूमपणे तुम्ही बल्पची चोरी केली ते ऐकून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते.माझे वडील त्यावेळी एक वाक्य शाम शेळके अन् मला  म्हणाले होते  की, " जाऊ द्या, तुम्ही अभ्यासासाठी बल्पची चोरी केली, पण इथून पुढं असं काहीही करू नका..! चूक ती चूकच असते..! " माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी माझ्या सर्व वर्गमित्रांना, बालमित्रांना कधीच परकं समजलं नाही.माझे सर्व बालमित्र माझ्या स्व.वडिलांचे मित्रच होते.वास्तविक माझे स्व.वडील अतिशय शिस्तप्रिय अन् करारी व्यक्तिमत्व होते,पण माझ्या मित्रांच्या बाबतीत ते नेहमी हळुवार मायेनं वर्तन करणारे नाते निभायचे. विशेषतः शाम शेळके, विजू गायकवाड,डॉ.गणेश वाणी आण्णासाहेब म्हस्के यांच्या बाबतीत..!


आमच्या पौगंडावस्थेतील हळुवार वयोगटातील या खोडकर आठवणी आठवल्या की, आमच्या धाडसी मित्राची म्हणजेच स्वर्गीय शामकांत मुरलीधर शेळके याची खूप खूप आठवण येते.शाम शिवाय आम्हा सर्व वर्गमित्रांचे वृंदावन सूने सुने झाले आहे.शाम शेळके हा आम्हा सर्व मित्रांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक होता. नियतीने याच आमच्या जिवलग वर्गमित्राला दिनांक ८/७/२०२२, शुक्रवार रोजी आमच्यातून कायमचे हिरावून घेतले.मात्र या जिवलग मित्राच्या आठवणी आम्हा सर्व मित्रांच्या आयुष्यात आम्ही जो पर्यंत हयात आहोत तो पर्यंत त्या सर्व आठवणी संजीवन असतील यात तिळमात्र शंका नाही..!


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २४/०७/२०२२, रविवार


क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा