शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०

" मंदिर अन् मी...!"













चिंतन

" मंदिर अन् मी...!"
================================

माझ्या आयुष्यातील खूप मोठा कालखंड आमच्या गावातील मंदिराच्या सानिध्यात गेला.

त्यातल्या त्यात आम्ही काही बालमित्र ज्यांच्या गल्लीतच, आमच्या घराच्या दारासमोरच  ग्राम दैवत श्री.पारेश्वर महादेव  मंदिर असल्याने.....
मंदिर अन् आम्ही एकमेकांशी घट्ट  बांधल्या गेलो. मग  मंदिर  कुठेही दिसू दे..! ते दिसलं की आपल्या आयुष्यातील गतकाळातील आठवणी लगेच जाग्या होतात अन् आपसूकच त्या मंदिराकडे पाय ओढल्या जातात.

पालखेड येथे माझ्या लहानपणी थेट इ.७ वी पर्यंत आमचे घर म्हणजे निव्वळ मातीच्या धाब्याचे होते.आमच्या घराचा आकार अंदाजे रुंदी ८ फूट अन् लांबी १५ फूट..! अशा एवढ्या जेमतेम आकाराच्या घरात,एक पलंग,वडिलांची सायकल,माझ्या स्वर्गीय आईचा स्वर्गाहून सर्वश्रेष्ठ संसार, चूल अन् आम्ही भावंड..! सगळं कसं दाटीवाटी करून एकंदरीत आनंदात दिवस होते. माझा भाऊ त्याच्या मित्राच्या घरी शिवाजी भाऊ गायकवाड यांच्या घरी झोपायला जायचा.नाहीतर गल्लीतच असणाऱ्या अभ्यासाच्या खोलीत झोपायला जायचा.मी देखील इ.६ वी ,७ वी पर्यंत बऱ्याचदा वेशी जवळ असणाऱ्या मारोती मंदिरात किंवा श्री.पारेश्वर महादेवाच्या मंदिरात मित्रांच्या सोबत झोपायला जात असे.माझ्या सोबत सोमनाथ गायकवाड, रमेश गायकवाड,नाना गायकवाड, ( सर्वजण हल्ली मुक्काम औरंगाबाद) राजू निकम इत्यादी बालमित्र असायचे. त्यामुळं मंदिर अन् आम्ही मित्र , आमचं नातं घरासारखे निर्माण झाले होते.

आजही कोणतेही मंदिर दिसले की,आमच्या गतकाळातील आठवणी जाग्या होतात अन् आपसूकच त्या घराकडे म्हणजेच मंदिराकडे पाय ओढल्या जातात. कारण माझ्या दृष्टीने ते मंदिर नव्हतेच कधी..! आम्हा मित्रांच्या दृष्टीने मंदिर म्हणजे आमचे घरच होते..! अर्थात आजही कोणतेही मंदिर,मला स्वतचं घरच वाटते.

मी अन् सोमनाथ गायकवाड ( ह. मू.बजाजनगर ) स्वयंपाक कलेत पारंगत झालो ते सुद्धा मंदिरातच..!  जवळ जवळ इयत्ता ८ वी पर्यंत आम्ही आमच्या घरासमोर असणाऱ्या संत जनार्दन स्वामी आश्रमातील साधू महाराजांचा स्वयंपाक  करून द्यायचो. तो स्वयंपाक करता..करता त्यातही पारंगत झालो. ज्यावेळी डी. एड ला शिकायला कन्नड येथे होतो तेंव्हा ,याच मंदिरात शिकलेली स्वयंपाक कला कामी आली.😊 पहाटे  उठायची सवय देखील याच मंदिराने लावली.

याच मंदिराने दुसऱ्याचा सन्मान करायची सवय देखील लावली.त्याचं उदाहरण म्हणजे......
आमच्या पालखेड गावात असणाऱ्या श्री.पारेश्वर मंदिरात  साधारणतः बावीस तेवीस वर्षापूर्वी बरेच दिवस पुजारी साधू नव्हते.महादेवाची पूजा,स्नान करण्याची सेवा बाबत आमच्याच गावातील आदरणीय सदाशिव आण्णा जगताप पाटील ( कृषी सहायक अधिकारी) यांनी ठरवले की, आपण पहाटेची पूजा अन् विधी मंत्र सेवा करू,सोबत गावातीलच प्रभू महाराज सोबतीला असतील. संध्याकाळी मात्र सर्व पूजा ,विधी प्रभू महाराज यांनीच करायचे ठरले. संध्याकाळी आमच्या नोकरीच्या वेळेमुळे शक्य नव्हते.

दररोज पहाटे मी अन् सदाशिव आण्णा जगताप पाटील (कृषी सहायक अधिकारी) संत जनार्दन स्वामी महाराजांची विधी पूजा घेऊ लागलो.काही दिवसानंतर आमच्या असे लक्षात आले की,आमची विधी मंत्र सुरू झाले की,काही वेळानंतर आमच्याच बांधवांची मशिदीतील पहाटेची नमाज पठण सुरू व्हायची. बऱ्याचदा आमच्याच गल्लीतील अश्रफ चाचा नमाज पठण करायचे..! एक दिवस सदाशिव आण्णा जगताप अन् मी आम्ही असे ठरवले की, ज्यावेळी मशिदीत नमाज पठण सुरू होईल,तेवढ्या दोन तीन मिनिटात आम्ही मौन पाळायचे. मंत्रोच्चार करायचा नाही. नमाज पठण संपले की,पुन्हा आपली विधी मंत्र सुरू करायचे. आमचा तो नित्यक्रम सुरू झाला होता. आम्ही आमच्याच गल्लीतील,गावातील बांधवाचा ,त्यांच्या धार्मिक मूल्यांचा सन्मान कुठेही गाजावाजा न करता नित्य नियमाने पाळू लागलो होतो. अखेर काही दिवसांनी महंतांची नेमणूक आश्रमात केल्या गेली अन् आम्ही आमच्या घरी आमची देवपूजा करू लागलो. मात्र यातून एक खूप चांगला संस्कार श्री.पारेश्वर महादेवाने आमच्यावर केला की, दुसऱ्याचा सन्मान करा.तेही आपल्याच घरातील,गावातील आहेत..! हे मानवी मूल्य देखील मंदिरानेच दिले.

एकंदरीत मंदिराचे माझ्या आयुष्यात स्वतच्या घरा सारखे स्थान आहे..! आता पर्यंत नोकरीच्या गावातील मंदिरे देखील स्वतच्या गावातील मंदिरासारखीच जाणवली..!

वंदे मातरम्

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव .

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: ३१ जानेवारी २०२०, शुक्रवार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा