मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" सोज्वळ दातृत्व....संतोष भाऊ औसरमल पा. "
==================================
दिनांक २६ जानेवारी २०१८ ची सकाळ..!
स्थळ: जि.प.प्रा.शा.एकलहेरा,कें.: अंबेलोहळ,ता. गंगापूर, जि.औरंगाबाद...!
सकाळी शाळेत विद्यार्थी व आम्ही सर्व शिक्षक प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या तयारीत मग्न होतो. शाळेतील एका वर्गखोलीत मोठमोठाल्या आकाराच्या बसायच्या बऱ्याच चटया ठेवलेल्या होत्या.गावातील एक अतिशय प्रेमळ पालक आदरणीय संतोष भाऊ औसरमल पा.यांनी आपल्या शाळेला सप्रेम भेट दिल्या आहेत हे समजले.मुख्य ध्वजारोहण आटोपले होते.उर्वरित कार्यक्रमाला सुरुवात झाली होती.
मी आमच्या शाळेच्या कार्यालयाच्या समोरील व्हरांड्यात उभा होतो.विद्यार्थ्यांचे कोडकौतुक सुरू होते.कार्यक्रम आता समाप्तीकडे चालला होता. माझ्या बाजूलाच कोपऱ्यात ज्यांनी एवढ्या महागड्या चटया शाळेतील गोर गरिबांच्या विद्यार्थांना बसण्यासाठी दान दिल्या होत्या ते संतोष भाऊ औसरमल दूर बाजूला उभे होते.मला राहवलं नाही,मी त्यांच्याकडे गेलो अन् त्यांना हळु आवाजात म्हणालो...
" संतोष भाऊ,तुम्ही खूप मोठ्या मनाने एवढ्या महागड्या चटया शाळेतील गोर गरीब विद्यार्थ्यांना सप्रेम भेट दिल्या आहेत,त्याबद्दल तुमचा सत्कार करायचा आहे..!"
यावर आदरणीय संतोष भाऊ यांनी नम्रपणे नकार दिला.मी त्यांना म्हणालो...
" अहो, असं काय करताय,तुमच्या सारख्यांचाच खरा सत्कार व्हायला हवा..! आजकाल कुणी एखादी वस्तु कुणा एखाद्याला भेट दिली तर पार इकडून तिकडून फोटो काढून आत्मप्रसिध्दी देतात,अन् तुम्ही तर कोणताही स्वार्थ न बाळगता एवढ्या महागड्या चटया भेट दिल्या आहेत..!"
तरी पण संतोष भाऊ सत्कार स्विकारण्याच्या मनःस्थितीत नव्हते. शेवटी मी ठरवले की,संतोष भाऊंचे माईक मध्ये जर नाव पुकारले तर..मग त्यांना सत्कार स्विकारण्यासाठी यावेच लागेल. समोर शाळेतील सहशिक्षक श्री.सलामपूरे सर उभे होते.मी त्यांच्याकडे गेलो अन् त्यांच्या कानावर सर्व माहिती सांगितली अन्
श्रीनेवार सरांना ,संतोष भाऊंचे नाव ,योग्य त्या वर्णनासह पुकारण्यास सांगितले.सरांनी नाव पुकारले अन् संतोष भाऊ यांना मुख्य ठिकाणी सत्कार घ्यायला जावे लागले..!
आपल्यातील खूप भारतीय ,भारतीयांसाठी खूप काही देतात..तेही कोणत्याही अहंकाराचा लवलेशही अंगाला न चिकटू देता..!
आमच्या प्रा.शा.एकलहेरा, ता.गंगापूर शाळेला गावातील एक सद्गृहस्थ आदरणीय संतोषराव पाटील औसरमल(काळी पँट,पांढरा सदरा) यांनी खूप मोठ्या आकाराच्या ८ चटया स्वेच्छेने भेट दिल्या..! सदरील चटई भेट देताना फोटोही काढू नका असा आग्रह संतोष भाऊंनी धरला होता..!पण खूप आग्रहाने त्यांना फोटो काढण्यासाठी तयार केले..समाजात चांगला संदेश जाण्यासाठी..!
खूप भला माणूस..!
आदरणीय संतोषभाऊंचा स्वतःची चटई तयार करण्याचा वाळूज एमआयडीसी परिसरात कारखाना आहे. हे तेच संतोषभाऊ आहेत,ज्यांचा गोड मुलगा चि.भावेश संतोष औसरमल ,याच्यावर एक लेख मी लिहिलेला आहे..! खाण तशी माती या उक्तीप्रमाणे संतोष भाऊ सारखाच त्यांचा चिरंजीव भावेश याचे वर्तन होते..! आज समाजात कुणी एखाद्याने एवढसं काही कुणाला दिलं तर अख्ख्या जगाला पार बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारी बहुसंख्य माणसांची जमात..! अन् त्याच माणसातील लुप्त होत चाललेल्या अन् आज अल्पसंख्यांक होत चाललेल्या आदरणीय संतोष भाऊ सारखी भली माणसं..! ज्यांना ना ...सन्मानाची अपेक्षा ...ना....कुणाकडून कौतुकाची अपेक्षा..!
ता.क.: एका भारतीयाची अनेक भारतीयांना दिलेली कृतार्थ भेट..!
वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
प्रसंग दिनांक: २६ जानेवारी २०१८
लिखान दिनांक: ३० जानेवारी २०२०

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा