** मला प्रवासात भेटलेली माणसं..! **
" आत्महत्येच्या मृतदेहाला पाहणारे विकृत प्रेक्षक..! "
==================================
आज दिनांक १८ जानेवारी २०१८ रोजी संध्याकाळी शाळेतून घरी औरंगाबाद शहरातुन येताना खूप रस्ता जाम झाला होता.जसजसा पुढे येऊ लागलो तसतसे रस्ता जाम का झाला याचे चित्र स्पष्ट होऊ लागले होते..!
कुणीतरी एका इसमाने रेल्वेच्या रुळावर रेल्वेखाली आत्महत्या केली होती..अन् ती झालेली आत्महत्या अन् त्याच आत्महत्याग्रस्त इसमाचा मृतदेह पाहणाऱ्यांची प्रचंड गर्दी जमली होती..!
बरं..जे अनेक जण तो रेल्वे रुळावरील मृतदेह पाहत होते त्यांना तो नीटपणे दिसत पण नव्हता..! तो मृतदेह पाहणाऱ्या लोकांपासून अंदाजे ३०० ते ४०० फूट अंतरावर होता..!मात्र जिवंत माणसांची त्या मृत देहाला पाहण्याची खूप उत्सुकता निर्माण झाली होती..!अक्षरशः रेटारेटी करून प्रत्येक जिवंत माणूस त्या मेलेल्या मृतदेहाला पाहण्याची विकृत हौस भागवून घेत होता..! पाहायला पाहत का नाही...पण जर पाहणाऱ्या माणसांकडून त्या मृतदेहाला किंवा अपघातग्रस्त इसमाला मदत झाली तर आपण समजू शकतो पण...इथे तर असे काहीही होत नव्हते..!
जिवंत माणसांच्या पाहण्याच्या हौसेमुळे रस्त्याच्या दुतर्फा जवळ जवळ ३ किलोमीटर पर्यंत वाहनांचा चक्का जाम झाला होता..!त्या पाहणाऱ्या विकृत प्रेक्षकांमध्ये सगळेच पाहण्याची विकृत हौस भागवून घेत होते..! मी आपला निमूटपणे एका वाहनात बसून त्या माणसांची गर्दी अन् त्यांची त्या मृतदेहाला पाहण्याची झुंबड पाहत होतो..!
माणूस मोठा विचित्र प्राणी आहे.ज्या मृतदेहाला पाहून त्याला खूप भीती वाटते त्याच मृतदेहाला पाहण्या साठी त्याची झुंबड उडाली होती..! झुंबड देखील अशी होती...की..जिच्यामुळे माझ्या सारख्या असंख्य सर्वसामान्य माणसाला नाहक चक्का जाम झाल्याचा मानसिक त्रास सहन करावा लागत होता..!ज्या ठिकाणाहून मला माझ्या घरी यायला फक्त तीन ते चार मिनिटे लागतात..आज या विकृत प्रेक्षकांमूळे त्याच ठिकाणाहून घरी यायला तब्बल ४५ मिनिटे लागले..! आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त ते मृतदेहाला पाहणारे माणसं..!
मुळात माणूस एक खूप चमत्कारिक प्राणी आहे. एखादी जखम होऊ नये यासाठी तो सतत खूप खूप काळजी घेत असतो..! पण जर स्वतःला जखम झालीच तर तीच जखम तो आलेल्यांना कौतुकाने दाखवत असतो..!!
असेच काहीसे स्वतः च्या मृत्यू,अपघात बाबतीत तो सतत घाबरून,भिऊन असतो,पण दुसऱ्याच्या अपघात,मृत्यू बाबतीत तो मोठ्या कौतुकाने ते पाहत असतो किंवा इतरांना दाखवत असतो..!अशी ही बऱ्याच माणसाची मनोवृत्ती आहे..!
ता.क.: एखादा जिवंत माणूस,रस्त्यात अडचणीत दिसलाच तर..आज जशी त्या आत्महत्येच्या मृतदेहाला पाहण्या साठी जिवंत माणसांची गर्दी जमली होती तेवढीच गर्दी जमेल का हो..?
वंदे मातरम्..!
लेखक व प्रत्यक्षदर्शी : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक : १८ जानेवारी २०१९
स्थळ: छावणी रेल्वे उड्डाण पूल, नगर रोड.
सदरील लेख माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: १८/०१/२०२०,शनिवार



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा