मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" हमारे प्यारे प्रदीप भैय्याजी ...! "
===================================
माणसाच्या आयुष्यात भेटलेली काही माणसं,त्याला अजुन प्रगल्भ करत असतात. अशा मोजक्याच पण गोड माणसांमुळे आपल्याही आयुष्यात जगण्यात , आपोआप प्रगल्भता येत असते.
मी जेंव्हा जून २०१८ मध्ये औरंगाबाद येथे स्थायिक झालो तेंव्हा जन सहयोग सामाजिक संस्था औरंगाबाद बरोबर जोडल्या गेलो.अगदी अनौपचारिक नात्यातील प्रेमळ माणसं इथ लाभली..! कुठेही श्रीमंतीचा गर्व नाही,कुठेही जातीचा अहंकार व न्यूनगंड नाही, थोडक्यात सर्वच बाबतीत मोकळी चाकळी मित्र मंडळी भेटली..! या सर्वांमध्ये माझ्या वैयक्तिक आयुष्याला जगण्यासाठी अजुन प्रगल्भ करणारे एक ज्येष्ठ आदरणीय व्यक्तिमत्व भेटले अन् ते म्हणजे आदरणीय प्रदीप भैय्या यादवजी...!🌹
आमच्या जन सहयोग परिवाराला जसे प्रशांत भाऊ गिरे यांच्या रूपाने धाडसी नेतृत्व लाभले अगदी त्यांच्याच तोडीस तोड त्यांना खंबीरपणे साथ देणारे ' खंबीरखुट ' साथीदार देखील लाभले..! असं असण्याचे एकमेव कारण होते, आमच्या परिवाराचे कृतीतून आदर्श होते सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज..! थोरल्या महाराजांच्या सर्वांना सोबत घेऊन जगण्याच्या अद्वितीय मूल्यांचे अनुकरणीय आदर्श, आम्ही जन सहयोग परिवारातील सर्व सदस्यांनी अंगीकारले होते..! त्याच मूल्यांना अनुकरण करून प्रशांत भाऊ गिरे व जन सहयोग सामाजिक संस्थेला अजुन प्रगल्भ करणारे आहेत हमारे प्यारे प्रदीप भैय्याजी...!🌹🙏
हमारे प्यारे प्रदीप भैय्याजी...!
एल.आय.सी. मध्ये सरकारी सेवेत नोकरी सांभाळून आदरणीय प्रदीप भैय्या यादवजी यांनी जन सहयोग सामाजिक संस्थेसाठी जी तांत्रिक कौशल्याची मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावली आहे ती ग्रेट आहे..! आम्ही ज्यावेळी मेंढी शेळी प्रक्षेत्र पडेगाव, दौलताबाद रोड औरंगाबाद येथील खूप मोठ्या भूभागावर तब्बल जवळ जवळ वीस हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याचे स्वप्नं पाहिले होते त्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर मार्क आऊट टाकण्याचे महत्त्वाचे काम करायचे होते.त्यावेळी जन सहयोग परिवार मधील प्रत्येक सदस्यांचे योगदान अमूल्य होते. मात्र त्यात शीर्ष स्थानी होते प्रदीप भैय्या यादवजी..! यादवजींनी ,आम्हाला सर्वांना सोबत घेऊन मेंढी शेळी प्रक्षेत्र पडेगाव येथील जमिनीवर योग्य असे मार्क आऊट आखले..!
गोलवाडी फाटा, छावणी डंपिंग ग्राऊंडवर आम्ही तब्बल जवळ जवळ सात हजार देशी झाडे लावलीआहेत. काही तांत्रिक समस्या निर्माण झाली तर प्रदीप भैय्या यादवजी नेहमी अग्रेसर राहतात.
प्रदीप भैय्या यादवजी, एक कुटुंब वत्सल माणूस आहे.त्यांच्या घरी मी जेंव्हा जातो तेंव्हा त्यांच्या घरातील त्यांच्या तिर्थस्वरूप वडिलांना पाहून मन प्रसन्न होते..! आज त्यांचे वडील शरीराने पूर्णपणे थकलेले आहेत. त्या थकलेल्या शरीराने ,त्यांच्या तारुण्यात जे कष्ट सोसले आहेत,त्याच कष्टांना ,आज त्यांचा सुपुत्र प्रदीप भैय्या यादवजी जो प्रेमरूपी सेवा देऊन आराम देत आहेत हे प्रत्यक्ष पाहून प्रदीप भैय्या यादवजी यांना मी नेहमी दर्शन घेऊन वंदन करत असतो..!प्रदीप भैय्या यादवजी, अतिशय समंजस माणूस..! नेहमी वडिलकीच्या नात्याने आम्हा सर्वांना प्रेमाने समजावून सांगत असतात..! प्रदीप भैय्या यादवजी यांनी त्यांच्या गतकाळातील आयुष्यात अतिशय गरीब अवस्थेत जे दिवस व्यतीत केलेले आहेत, त्या सर्व दिवसांचे फलित आज हे आहे की, प्रदीप भैय्या यादवजी आज खूप सुखी आहे..! प्रदीप भैय्या यादवजी खूप धार्मिक देखील आहेत.वाळूज - औरंगाबाद रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाच्या जवळ रस्त्यालगत जे लक्ष्मी मातेचे मंदिर आहे,त्याची पूजा अर्चा , देखभाल, साफसफाई इत्यादी कामे मनोभावे करत आहेत..! विशेष म्हणजे दररोज पहाटे प्रदीप भैय्या यादवजी सदरील मंदिरात साफसफाई करिता न चुकता जातात..! त्यांच्या या सेवेला साष्टांग दंडवत..!🙏
आमच्या जन सहयोग परिवार मधील आम्ही इतर सर्वजण ज्या ज्येष्ठांच्या सानिध्यात वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य करत आहोत,त्यात शाम आण्णा,अमजद भाऊ आणि प्रदीप भैय्या यादवजी आहेत..! कोणत्याही कामात ज्येष्ठ हवेत ,जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा उपयोग तारुण्याला होत असतो..हेच प्रशांत भाऊ गिरे यांनी ओळखले अन् सर्व ज्येष्ठांना यथोचित सन्मान देऊन जन सहयोग सामाजिक संस्थेचे कार्य सुरू आहे..!
वंदे मातरम्..!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक : १ जून २०२०, सोमवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा