शनिवार, ३० मे, २०२०

" जागतिक तंबाखू_सेवन विरोधी दिन..! "








चिंतन

" जागतिक तंबाखू_सेवन विरोधी दिन..! "

====================================
आज दिनांक ३१ मे २०१७

जागतिक तंबाखू_सेवन विरोधी दिन..!
त्यानिमित्त तंबाखू न खाणाऱ्या माणसांना शुभेच्छा...व अभिनंदन..! आणि तंबाखू आवडीने खाणाऱ्या माणसांना सावधगिरीचा मैत्रीपूर्ण धोक्याचा इशारा..!

तंबाखू...!
काळानुरूप ,नावात व चवीत  नेहमी " कात "  टाकणारा धूम्रपान श्रेणीतील बहुसंख्य व सुरुवातीला खातांना कमी आर्थिक  झळ पोहचविणारा  पदार्थ..! मात्र तंबाखू खाणारे जसजसे बहुसंख्य होत जातात,तसतसे तंबाखूप्रेमींना प्रचंड आर्थिक व शारीरिक झळ देणारा पदार्थ..! काळानुरूप हिच्या नावात " तंबाखु खवय्यांनी " भर टाकली..! कुणी,हिला खर्डा नावाने ओळखते ,कुणी मावा , तर ..कुणी सांख्यिकीय भाषेत  देखील हिला ओळखते..!पान टपरीवर ही सांख्यिकीय भाषा बऱ्याचदा ऐकायला मिळते..!

२१व्या शतकात हीचे " गुटखा " हे नामकरण झालेले आहे..! हिचा व्यापार करणारे काही व्यापारी सुरुवातीला हिला ,हिच्या खवय्यांपर्यंत सायकलवर घेवून पोहोच करायचे..! बघता-बघता सायकलवर गुटख्याचा व्यापार करणारे विमानातून प्रवास करू लागले,अन् " तंबाखू खवय्ये " फक्त स्वतचे हात चोळीत बसले..! तंबाखूचा देखील विशिष्ट लोकांना विशिष्ट Brand आवडतो..! मात्र सर्रास आढळणारा व अर्थिक झळ (खरेदी करतांना) कमी असणारा .....छाप हा पदार्थ..! विशेष म्हणजे तंबाखू खाण्याच्या बाबतीत स्री अन् पुरुष असा तथाकथित लिंगभेद समाजात अजिबात मान्य नाही..! तंबाखू खाणारे स्री अन् पुरुष , ' एकमेका साहाय्य करू अवघे धरू कुपंथ ' या उक्तीनुसार आपली विकृत मानसिकता वाढविण्यास मोलाचे योगदान देत राहिलेले आहेत..!

या तंबाखू खवय्यांची गंमतच लई भारी..! " तंबाखू खवय्ये " मंडळी एकमेकांना अनोळखी ठिकाणी पटकन ओळखतात..!  हळूच हाताने किंवा हाताच्या कोपा-याने तंबाखू खवय्यांना डूळका मारून स्वतच्या डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताची तर्जनी घासून मागे-पुढे करून सांकेतिक मागणी करतात..! मग काय... तंबाखू चोळीत-चोळीत मस्त गप्पांचा फड रंगतो..! वर्णद्वेषाचा कूणी आरोप करू नये म्हणून काळ्या-तपकिरी रंगाच्या तंबाखूत " पांढरा शुभ्र चुना " मिसळतात..! " हम सब एक है " या सामाजिक  वैचारिक सिद्धांतानुसार  चोळून झाल्यावर उजव्या हाताची थाप मळलेल्या पदार्थावर मारून उजव्या हाताच्या अंगठा व तरजीमध्ये कुणी-कूणी मध्यमाचा देखील उपयोग करून तो मलिदा उचलून अलगदपणे तोंडात ,लहान बाळाला झोळीत अलगदपणे टाकावे अगदी तसे ठेवतात...! हा मलिदा तोंडात गेल्यावर या मंडळींना मोठमोठ्याने बोलण्यासाठी व फिदीफिदी हसण्यावर प्रचंड मर्यादा येतात..! यानंतर या मंडळींचे  बोलणे,हसणे एखाद्या जूण्या हिंदी/मराठी चित्रपटातील नट,नटींच्या संभाषण कौशल्यासारखे ,सगळंच जपून-जपून होत..! यांनी जर मनमुरादपणे हसणे,बोलणे केलेच तर....." तंबाखू मिश्रित दुर्गंधीयुक्त थुंकी " समोर असणा-यावर पडून एक प्रकारचा धूम्रपान जलाचा शिडकावाच होतो..!

कालांतराने या मंडळींचे दात  उर्जाचे प्रतीक असलेल्या पिवळ्या रंगासारखे  पडतात..! दिवसामागून दिवस जातात.. पिवळ्या रंगाचं प्राबल्य वाढत जाते.हळूहळू हसणे,बोलणे ,आहार यावर मर्यादा येत जातात..!  " घरची मंडळीही " यांना ❤️  तोंडाजवळ घेत नाही.😊  बळजबरीने ही माणसं जर जवळ गेलीच तर  यांना तिथून हाकलून दिल्यासारखे झिडकारल्या सारखे केल्या जाते..! माझे तर स्पष्ट मत असे आहे की, जे कुणी पुरुष तंबाखूजन्य पदार्थ खातात, किंवा तत्सम द्रवयुक्त धुम्रपानाच्या पदार्थांचे सेवन करतात अशी माणसं एक प्रकारे त्यांच्या निर्व्यसनी पत्नीवर मौखिक स्वरूपातील बलात्कारच करतात..! त्या बिचाऱ्या माऊली, सगळा मौखिक दुर्गंध निमूटपणे सहन करतात..नाईलाजाने..! हा एक प्रकारचा मौखिक बलात्कारच असतो..!

तोंडाचा नको,नको तो रोग निर्माण व्हायला सुरुवात होते..! तो पर्यंत बरीच वेळ निघून गेलेली असते..! तंबाखू खवय्ये मंडळी दीर्घ अनुभव संपन्न झाल्यावर तोंडात तंबाखू नसली तरी तंबाखूचा दर्प ,कास्तुरिमृगाच्या पोटातील सुगंधी कस्तुरी सारखा सतत सोबत असतो..! असतो फक्त दुर्गंधीयुक्त दर्पाच्या रूपात...!

तर ... मित्रांनो,असे आहे तंबाखू खवय्या व्यक्तीविशेषांचे व्यक्तीनिरीक्षण..! आता ज्याने-त्याने ठरवावे की,आजचा दिनविशेष " जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन " निमित्त शुभेच्छा घेऊन अभिनंदन स्वीकारायचे ...की  सावधपूर्ण धोक्याचा इशारा समजुन वेळीच सावध व्हायचे..!!

ता.क. - मृत्यू व आजार तर, माझ्यासह प्रत्येकालाच आहे,फक्त आपल्या मृत्यूच्या व आजाराच्या कारणाला स्वत:हून निमंत्रण दिलेली धुम्रपानांनी युक्त कारणे चिकटलेली नकोत अशी प्रेमळ अपेक्षा..! 🙏😊                       
 

वंदे मातरम् ...!🙏🇮🇳🙏
                                     
कोणत्याही प्रकारच्या धूम्रपानाचा प्रखर विरोध करणारा लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: ३१ मे २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा