मंगळवार, २४ मार्च, २०२०

" जिहाले मस्की मुकंब रंजीश , बहाले हिजरा बेचारा दिल हैं..!"



चिंतन

" जिहाले मस्की मुकंब रंजीश ,
 बहाले हिजरा  बेचारा दिल हैं..!"
====================================

माझा सर्वात आवडता हिंदी चित्रपट जे.पी.दत्ता दिग्दर्शित --            " गुलामी "..!

यात जे.पी दत्ता साहेब यांनी पूर्वीचे सामाजिक वास्तव खूप छान प्रकारे चित्रित केलेले आहे. तत्कालीन सरंजामशाहीवर  यात अतिशय प्रखरपणे चित्रण केलेले आहे. माझ्यामते महान हिंदी चित्रपट अभिनेते धर्मेंद्र  यांनी त्यांच्या कारकिर्दीतील  उत्कृष्ट  अभिनय यात केलेला आहे.

 जे.पी.दत्ता साहेब यांच्या बहुतांशी चित्रपटांचे वैशिष्ट्ये म्हणजे..राजस्थानच्या पवित्र भूमीचे यथार्थ दर्शन होय..! यांच्या बहुतेक चित्रपटात राजस्थानचे वाळवंट,तेथील संस्कृती,तेथील चालीरिती इ.अनेक बाबींचे अतिशय सुंदर व नेत्रदीपक चित्रण यांच्या चित्रपटात असायचे..! दत्ता साहेब यांनी चित्रपट दिग्दर्शन करणे बंद केले अन् राजस्थानचे अतिशय सुंदर दर्शन चित्रपटात दिसणे दुरापास्त झाले..!

 हिरव्या वनराईने नटलेल्या भूमीत चित्रीकरण करून वाहवा मिळविणारे अनेक जण आपल्या चित्रपट सृष्टीला लाभले..पण ज्या भूमीत असले काहीही नव्हते,अशा ठिकाणी अतिशय नेत्रदीपक चित्रीकरण करून, राजस्थानच्या वाळवंटाच्या प्रेमात पडायला भाग पाडले ते जे.पी.दत्ता साहेब यांनीच..!

हिंदी चित्रपटातील  माझे सर्वात आवडते हिंदी चित्रपट गीत हेच....!अप्रतिम,कर्णमधूर व अर्थपूर्ण गीत.....! गीतकार गूलजार साहेब....! वास्तविक या गीतातील पाहिले कडवे अरबी भाषेतील आहेत..! पण ते सादर करण्याची नजाकत फक्त आणि फक्त गुलजार साहेब हेच करू शकतात..!

माझ्या सकट बऱ्याच दर्दी रसिकांना या खूप श्रवणीय गीतातील

" जिहाले मस्की मुकंब रंजीश ,
 बहाले हिजरा  बेचारा दिल हैं..!"

 या ओळींचा अर्थही माहीत नाही,पण वंदनीय गुलजार साहेब यांच्या लेखन कौशल्याची अन् महान संगीतकार लक्ष्मीकांत ,प्यारेलाल यांच्या संगीताची कमाल,की हे गीत सर्व भारतीयांच्या ओठांना  गुणगुणायला भाग पाडते..!

मी ज्यावेळी पालखेड येथे राहत होतो त्यावेळी माझा प्रिय बालमित्र नितीन जैन याच्या टेलर कामाच्या दुकानात दररोज शाळेतून आल्यावर या गीताचा आवर्जून श्रवणीय आस्वाद  नक्कीच घ्यायचो..! बऱ्याच प्रकारचा थकवा निघून जायचा..! माझ्या या बालमित्राला सुध्दा हे गीत खूप खूप आवडायचे..! अर्थात आजही आमचे हे गीत सदा सर्वदा आवडते गीत आहे..!

प्रेमाच्या भाषेतील भाव समजण्यासाठी परिचयाचेच शब्द पाहिजे असं काहीही नाही..! त्यातील भाव,ते कसे आणि कोण सादर करते यावर खूप काही अवलंबून असते..! जसे की या गीतात आहे..!

ता.क.: कोणताही " भाव "  समजायला मुळात " भावना " असावी लागते..!☺

वंदे मातरम्..!

 विनम्र वंदन...जे.पी.दत्ता साहेब व गुलजार साहेब व लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना..!               

वंदन करणारा लेखक : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव,पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:२५ मार्च २०१७

1 टिप्पणी:

  1. Copy paste

    ( Kishor Alve यांची मूळ प्रतिक्रिया)

    याचा अर्थ आहे माझ्याकडे (मिस्कीन) या गरिबाकडे तक्रारभऱ्या नजरेने बघू नकोस. कारण माझं जे हृदय आहे ते आधीच विरहामुळे (हिजरा) दुःखी आहे. ज्या हृदयाची धडधड तू ऐकते आहेस हे धडकणार हृदय एकतर तुझं तरी आहे किंवा माझं तरी आहे.
    हे कडवं अमिर खुसरो यांच्या खालील शायरीवरून उचललेल आहे.

    ज़िहाल-ए मिस्कीं मकुन तगाफ़ुल,
    दुराये नैना बनाये बतियां।
    कि ताब-ए-हिजरां नदारम ऎ जान,
    न लेहो काहे लगाये छतियां। ।

    लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची कित्येक गाणी इतकी सुंदर आहेत की ती भारतीयांची राष्ट्रीय गाणी झालेली आहेत. त्यातले हे एक गाण. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या संगीताची कदर उच्चवर्गीयांनी केव्हाच केली नाही. जेवढी सामान्य वर्गाने केली. आज सामान्य वर्ग जास्तीत जास्त गाणी लक्ष्मीकांतप्यारेलाल यांचीच ऐकतो. केव्हाही रेडिओवरील आपकी पसंद ऐका. या गाण्याची चाल इतकी सुंदर आहे. गुलजार साहेबांनी आर डी बर्मन आणि इतर संगीतकारांबरोबर भरपूर गाणी केलेली आहेत. अतिशय सुंदर गाणी दिलेली आहेत. पण त्यांचे युट्युब वरचे सगळ्यात जास्त बघण्यात आलेल गाणं हेच आहे. त्यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल बरोबर खूप कमी काम केलं आहे. हे गाणं लतादीदी आणि शब्बीर कुमार यांनी गायलेल आहे. शब्बीर कुमार थोडं कमी वाटतात पण लतादीदींच्या कामगिरीमुळे ते लपून बसतात. जसे सुनील गावस्कर आणि चेतन चौहान यांची जोडी असल्यासारखे.या गाण्यामध्ये, या गाण्याच्या कडव्या मधले म्युझिक पीस फार सुंदर आहेत. ऐकत रहावेसे वाटतात. हे गाण ऐकल्यानंतर थोड भारीत झाल्यासारखे वाटते. असं वाटतं की आता काहीच नको ऐकायला, या गाण्याच्या धुंदीतच रहाव.

    उत्तर द्याहटवा