** मला प्रवासात भेटलेली माणसं..! **
" धुळीने माखलेला एक दैनिक प्रवासी..! "
=================================
सकाळी अंघोळ... पांघोळ झाली की..मोठ्या कौतुकाने आरशात पाहून अजिबात काहीही पुरुषी मेकअप न करता फक्त देवपुजेचा गंद कपाळी लावून मी दररोज शाळेत जाण्यासाठी घराच्या बाहेर पडतो..!लहानपणी आई गालावर काजळाचा ठिपका लावायची..! कुणाची नजर लागू नये म्हणून..! पण आता त्याच काजळाची जागा माझ्या चेहऱ्यावरील काळया-पांढऱ्या दाढीने घेतल्याने कुणा...दृष्टाची...दृष्ट लागण्याची शक्यता नैसर्गिकरित्या समाप्त झाली आहे..!
( " नजर लागणे " या उदाहरणावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नाहक माझ्यावर हल्ला चढवू नये..! त्याचे काय आहे..हे अ.नि.स.वाले फक्त हिंदू धर्मातील अशा बाबींवरच लई मोक्कार हल्ला चढवितात..! इतर धर्मातील अशाच बाबींच्या वेळी...मौन व्रत धारण करून बसतात..!एककल्ली कुठले..! )
सगळं..आवरून सावरून मस्तपैकी इन..बिन करून मी औरंगाबाद बस स्थानकावर पोहचतो..! तिथं पोहचल्या..पोहचल्या..सगळ्याच.. दर्पाच्या...सुगंधाने...माझे स्वागत होते..! आता त्याचीही सवय झाली आहे..!😂 मी लगेच अंधारी ला जाणारी बस कधी लागेल...अन् कधी नाही..या प्रतीक्षेत इकडं..तिकडं..कावरा बावरा होऊन पाहत असतो..! इतक्यात ती बस येते..! चालक..अन् वाहक दररोजच्या प्रवासामुळे चांगलेच परिचयाचे झाल्याने..आम्ही एकमेकांना पाहून कधी गालातल्या गालात तर..कधी.. मध्यम स्वरूपाचे विक्राळ हास्य करून..एकमेकांना साद घालतो..अन् बसतो..बस मध्ये..!
अंधारीला गडाकडे जाण्यासाठी..सिल्लोड रस्त्याने..!
माझ्या सकाळच्या पुरुषी सौंदर्याचा मला असातसा फार तर..हर्सूल सावंगी पर्यंतच निव्वळ पोकळ अभिमान वाटत असतो..!पण जर का..एकदा सावंगी पार केली...की मग..संपूर्ण बस मध्ये..अवकाशातील..विविध तारे सितारे चमकावे तश्याच स्वरूपात.. धुळींचे कण...जागा व्यापायला सुरुवात करतात..! मग मी माझ्या पुरुषी सौदर्याला झाकून...पाकून ठेवण्यासाठी माझ्या भात्यातील...एक संरक्षक शस्त्र बाहेर काढतो..! माझा रुमाल, टोपी यांनी माझ्या प्रौढ वयातील चेहऱ्याला एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या माणसासारखे झाकून घेतो..! माझ्या या कृती सोहळ्यात अजूनही इतर प्रवासी सामील होतात..!त्यात..सौंदर्याला..स्वतः च्या जिवापेक्षा जास्त जपणाऱ्या काही माता ,भगिनी पण जास्त प्रमाणात सक्रिय सहभाग नोंदवून धुळींच्या कणांबरोबर या..मोहिमेत सहभागी होऊन जातात..!
जेन्हा..थोडा फार चांगला रस्ता येतो..तेंव्हा मी माझे डोक्या..चेहऱ्यावरील सर्व शस्त्रे म्यान करून ठेवतो..! पण थोड्याच वेळात जेंव्हा...धुळीचा लोट आला रे आला की पुन्हा सर्व शस्त्रे चढवून..धुळीच्या साम्राज्यात विलीन होऊन जातो..!ही हातघाईची लढाई सुरू असतानाच फुलंब्री येते..! थोडासा सुटकेचा निःश्वास सोडतो..! तोही..धुळीने माखलेला..!😂 फुलंब्री बस स्थानकावर उतरून..माझे कपडे झटकून...घेऊन..स्वतः च्या मोबाईलला आरसा करून..चेहरा वाकडा तिकडा करून माझे धुळीने माखलेले चेहऱ्याचे सौदर्य निरखून पाहून घेतो..!😂
पुन्हा काही वेळ बस तिथं थांबून पुन्हा आम्ही अंधारी गडाकडे कूच करतो..! आता धुळीच्या लोटांचे प्रमाण जरा जास्तच वाढलेले असते..! धुळीच्या रूपातील गनीम आमच्यावर प्रखर हल्ला चढवीत असतो..! पण...मीही आता लई पक्का खेळाडू झाल्याने तिच्याबरोबर लढाईत माझे सर्व शस्त्रे पुन्हा अंगावर चढवतो..!माझ्या सोबत असलेले माझे दैनिक प्रवासी मित्र डॉ.घुगे साहेब( माझ्या बाजूला बसलेले, डॉ. गिरी साहेब, माझ्या पलीकडच्या सीटवर बसलेले) हे सुध्दा माझ्या या मोहिमेत थेट अंधारी गडापर्यंत सामील असतात..!
मित्र असावेत तर असे..! धुळीत एकमेकांना साथ देणारे..!😂 कधी मधी डॉ.योगेश राजपुत साहेब पण असतात..या मोहिमेत..सोबत..!
मजल दरमजल करत अखेर सर्व वस्रांवर धुळीचे कण घेऊन अंधारी गडावर पोहचतो.शाळेत गेल्या..गेल्या माझे मुलं अन् मुली माझ्याकडे पाहून आपले सर..धुळीच्या साम्राज्यात लढाई करून आल्याने मला सुहास्य वदनाने माझे स्वागत करतात..!😂
दिवसभर अंधारी गडावर धुळीचे कण घेऊन माझ्या लेकरांना शिकविल्या नंतर शाळा सुटली रे सुटली की,माझी पुन्हा मोहीम सुरू होते..औरंगाबाद गडाकडे..! आता मात्र सकाळी येताना जे धुळीचे कण माझ्यावर हल्ला करण्याचे बाकी राहिले आहेत..ते आता चौफेर हल्ला चढवून मला पार घायाळ करून सोडतात..! ज्यावेळी मी घरी पोहचतो त्यावेळी सकाळच्या अन् आताच्या माझ्या असलेल्या वर्णात,रंग रुपात बराच बदल झालेला असतो..!😂 यदा कदाचित...ज्या दिवशी माझ्या चेहऱ्यावर ,कपड्यांवर धूळ नसेल किंवा कमी असेल त्या रोजी माझी धर्मपत्नी मला म्हणते..
" का..हो.. आज तुम्ही अंधारीला गेले नव्हते वाटतं..!"
मी ,माझ्या धर्मपत्नीच्या या वाक्याने अजुन प्रफुल्लित होतो..! माझ्या पत्नीला सिल्लोड ते औरंगाबाद या महा मार्गावरील कामाच्या धुळीच्या कणांवर असलेल्या निष्ठावर, त्या धुळीच्या प्रामाणिकपणावर असलेल्या विश्वासावर नतमस्तक व्हावेसे वाटते..!😂
अखेर मी पुन्हा माझे पुरुषी सौदर्य पाण्याने धुवून..पुसून काढतो..पुन्हा दुसऱ्या दिवशी.. धुळी बरोबर युद्ध खेळायला..!😂
वंदे मातरम्..!
ता.क.: सध्याला औरंगाबाद ते सिल्लोड रस्त्याचे रुंदीकरण कॉंक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे.सध्या थोडाफार त्रास होईल पण भविष्यात हा रस्ता खूप सुंदर झालेला असेल..यात तिळमात्र शंका नाही..! वरील माझे लिखाण विनोदी लेखन पद्धतीने घ्यावे..! रस्त्याच्या कामावर टीका म्हणून नाही..!
या रस्त्यावरील धुळीने माखलेला एक दैनिक प्रवासी लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक:६ मार्च २०१९




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा