सोमवार, ९ मार्च, २०२०

" चुना सापडला रे..! "





आमचे गाव आमची माणसं

                      " चुना सापडला रे..! "
=====================================

 आम्ही  लहानपणी  ऐंशीच्या दशकात  पालखेड येथे निव्वळ मातीच्या घरात  राहत होतो.माझी स्व.आई जरी मूळची धुळे या शहरातली होती तरी ती तिच्या सासरी पालखेड येथे आल्यापासून दारिद्र्य अवस्थेतील खेड्यातील सगळी कामे शिकून गेली होती..! परिस्थिती अन् परिसर माणसाला सगळं शिकवतो हे ब्रीद वाक्य मला नेहमी माझ्या स्वर्गीय आईकडे बघून नेहमी वाटते..अन् तेच माझ्या अंगी उतरवत गेलो..!

माझ्या बालपणी आमचे जे घर निव्वळ मातीचे होते..त्याला दरवर्षी दिवाळीच्या सणाला रंगरंगोटी करण्यासाठी निव्वळ मातीचा रंग विकत आणावा लागत असे..! गावातील स्व.विठ्ठल काका जैन यांच्या दुकानातून तर कधी स्व.संपत शेठ छाजेड यांच्या दुकानातून आणायचो.माझी आई खूप धार्मिक होती.तिची अशी इच्छा असायची की,घरात सगळीकडे रंग फिका दिला तरी चालेल पण देवघरात रंग कसा उठून दिसला पाहिजे..! मग काय..देवघरात मातीचा विकत आणलेला रंग उठून दिसावा म्हणून त्याखाली पांढरा शुभ्र चुना द्यावा लागे..!

आमच्या पालखेड गावाच्या पश्चिम दिशेला ज्या परिसराला आम्ही तेंव्हा  " तळ्यापाळी " असे  म्हणयचो. आता म्हणतात की नाही ते पक्के माहीत नाही..कारण सध्या माझे जन्मगाव आधुनिकतेकडे जात आहे..! सध्याची पिढी सुशिक्षित झाली  आहे म्हणून वाटते बाकी काही नाही..! तर त्या तळ्यापाळी असलेल्या मोकळ्या मैदानावर थोडे जरी खणले तरी पांढरा शुभ्र चुना सापडायचा..!माझी आई मला दिवाळी आली की म्हणायची..
" नंदन,तू अन् आप्पा तळ्यापाळी जा..अन् चुना खणून घेऊन ये..! देवघरात द्यायचा आहे..!"
मी लगेच घमेले घेऊन माझा आयुष्यातील सर्वात पहिला बालमित्र स्व.आप्पा सूराशे याच्या घरी  जाऊन त्याला सोबत घेऊन तळ्यापाळी जायचो.  इकडं..तिकडं शोधून झाल्यावर जिथं चुना सापडला की आम्ही लगेच मोठ्ठयाने ओरडायचाे.....
" चुना सापडला रे...!"
चुना सापडलेल्या जमिनीत खुरप्याने खणून..खणून चुना काढायचो..! तिथं त्यावेळी गावातील अजूनही काही मुलं यायची..चुना खणून काढायला..! चुना काढून झाला की, तो घमेल्यात घेऊन घरी यायचो. फक्त जिथं देवघर होते तिथंच पांढरा शुभ्र चुना लावला की मग त्यावर विकत आणलेला मातीचा रंग द्यायचो..!
माझी आई जाम खुश होऊन जायची..!

आज दिनांक १० मार्च २०१९ रोजी तसाच पांढरा शुभ्र चुना आम्ही " जन सहयोग सामाजिक संस्था,औरंगाबाद "  चे सदस्य  विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यासाठी जे खड्डे , ठिकाण गोलवाडी फाटा, वाळूज,अहमदनगर रोड, सैनिकी क्षेत्र औरंगाबाद येथे  खंदत होतो तेंव्हा  माझ्याच खड्ड्यात सापडला..! आमचे प्रमुख प्रशांत भाऊ गिरे‌ यांना लगेच बोलावून या मातीत सापडल्या जाणाऱ्या पांढऱ्या शुभ्र चुन्याची अन् माझी भूतकाळातील एक भावूक आठवण सांगितली..!

 माझ्या गत आयुष्यात बालपणी  आमच्या मातीच्या घरातील देवघराला देण्यासाठी पांढरा शुभ्र चुना खूप खणून काढला पण कधी आयुष्यात कुणालाही चुना लावलाच नाही.. आणि लावणारही नाही...! कारण त्या मातीतल्या पांढऱ्या शुभ्र चुन्याची अन् माझ्या स्वर्गीय आईची रम्य अन् भावूक स्मृती आयुष्यभर हृदयात कोरलेली आहे..!

ता.क.: एक ना एक दिवस मलाही याच मातीत मिसळून माझ्याही शरीराचा चुनाच होणारा आहे..याची सदैव जाणीव ठेवून जगणे माहीत आहे मला..!

वंदे मातरम्..!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १० मार्च २०१९,रविवार
स्थळ: सैनिकी जागा, गोलवाडी फाटा,औरंगाबाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा