" आमचे गाव, आमची माणसं..! "
" आम्ही अन् होळी...! "😊
=================================
कोणे एकेकाळी मी ज्यावेळी पालखेड येथे राहत होतो तेंव्हा..एक महिना अगोदरच वाटायचे की...एक महिन्यानंतर होळी येणार..!
त्यानंतर..
कोणे एकेकाळी मी ज्यावेळी लासूर स्टेशन येथे राहत होतो तेंव्हा एक दिवस अगोदरच वाटायचे की...उद्या होळी येणार..!
आणि आज....
मी औरंगाबाद शहरात राहतोय तर.....होळी आली कधी अन् चालली कधी...कळेना पण...!
असे मला आज वाटण्याचे कारण की, मी आज मोठ्या शहरात राहतोय..!
आपले गाव..अन् गावाकडच्या आठवणी.. शहरात पोरक्या होऊन जातात..! शहरात सर्व काही विकत मिळतं..पण.. आपलं गाव कुठंही सापडत नाही..! मी, शाम शेळके,विजू, फैयाज, फारुख, खाजा, डॉ.संजय राऊत,डॉ.गणेश वाणी, आण्णासाहेब म्हस्के, नंदू जाधव इ. अजूनही बरेच जण..आम्ही वर्गमित्र खूप जगलो..आमच्या पालखेड गावात..! तेथील वास्तव्याचा तृप्तीचा ढेकर सदा सर्वदा आनंद देऊन जातो..!
आमच्या अभ्यासाच्या ज्या अभ्यासिका पालखेड येथे होत्या..त्या एक जिवंत सत्य दंतकथा आहेत..! त्यांच्या विषयी मी कधीतरी नक्कीच व्यक्त होईलच..! मात्र एक नक्की आमच्या सारख्या अभ्यासाच्या अभ्यासिका कुठेही होणार नाहीत या विषयी आम्हाला खूप खूप अभिमान आहे..! कारण त्या फक्त अभ्यासिका नव्हत्या तर..ते आमचे घर होते..!
आमच्या वर्गाच्या अभ्यासिका नंतर कोणत्याच वर्गाच्या मुलांनी पालखेड येथे अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका केल्याच नाही..! यदा कदाचित जरी कुणी केल्या असतील तरी त्यात आम्ही नव्हतो..म्हणजेच आम्ही जे जगलो ते आयुष्यावर भरभरून प्रेम करणारे क्षण नव्हते हे मी खात्रीने सांगतो..!
रात्री खूप उशिरा पर्यंत आम्ही आमच्या अभ्यासाच्या खोलीत अभ्यास करायचो.होळीच्या दिवशी मात्र रात्रीचा अभ्यास करायला खूप जीवावर यायचे..! त्यांचं मुख्य कारण असायचं होळी..!😊 तो कालखंड होता इ.स.१९९० ते १९९२ चा..! होळीच्या नावाखाली रात्री खूप उशिरा गावात भुतासारखा फिरायचा आनंद काही औरच होता..! आमच्या मित्रांच्या टोळीचा म्होरक्या असायचा आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत शाम मुरलीधर शेळके..!😊 आता हा शाम म्हणजे आमचा जीव की प्राण..!😊 फक्त एका वाक्यात सांगतो, जर यदा कदाचित हा शाम आमच्या आयुष्यात नसता तर आम्ही कधीच तरुण झालो नसतो ..! 😀
आम्ही आमच्या आयुष्यात लहानपण ते डायरेक्ट म्हातारे झालो असतो...!😀 प्रिय बालमित्र शाम वर स्वतंत्र लेख लिहावा लागेल..!
होळीच्या दिवशी लाकडं चोरणं बहुदा इ. स.१९९०-९२ साली गुन्हा नव्हता..! 😊 मात्र आज कुणीही आम्ही त्याकाळी केल तसं अजिबात करू नये.नाहीतर उगीचच एखादा आजकालचा तरुण आमचा त्याकाळचा रेफ्रन्स द्यायचा अन् आज होळीत लाकडं जाळायचे उद्योग करायचा..!😊
होळीच्या दिवशी रात्री आमच्या पालखेड गावातील बहुतांशी म्हातारे आपापल्या खळ्यात झोपायला असायची..! खळ्यातील लाकडांना राखण करायला..! एवढ्यांच्या म्हाताऱ्या नजरा चुकवून होळीत जाळायला लाकडं आणायची म्हणजे लंकेतून अशोकाचे झाड आणल्या सारखे असायचे..! पण तो पराक्रम आम्ही करून दाखवत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली की,गावातील म्हातारी माणसं,श्री.पारेश्वर मंदिराच्या समोर, रात्रीच्या अज्ञात लाकूड चोरांना शिव्या हासाडायचे..! आम्ही सगळे मित्र सभ्यपणाचा आव आणून कोडग्या सारखं ऐकत असायचो..!😊
आम्ही सर्व मित्र खूप खूप नशीबवान आहोत, असं आठवणीत राहणार आयुष्य,आमच्या पालखेड गावात आम्हाला मिळाले..! त्यावेळी आम्ही खूप खूप आनंद घेतला आयुष्याचा..! बहुदा आमच्या जाती अन् आमचे धर्म त्याकाळी झोपलेले असावेत म्हणून आम्ही तो आयुष्याचा निर्भेळ आनंद घेऊ शकलो..!आज आमच्या मुलांच्या काळात प्रत्येकाची जात अन् धर्म भूतासारखा जागी आहे..! त्यामुळं आमच्या मुलांची झोप पार उडून गेली आहे..!
दुर्दैव आजच्या पिढीचे...!
ता.क.: आम्ही सर्वजण आज जरी बाहेरगावी स्थायिक असलो तरी..गावाकडची लाकडं अन् आठवणी त्या पेटलेल्या होळी सारख्या सदैव आमच्या अंतर्मनात पेटलेल्या असतात.. !
वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: २० मार्च २०१९, होळी सण..!
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: ९ मार्च २०२०,सोमवार,होळी



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा