*** मला प्रवासात भेटलेली माणसं..! ***
" उबाळे मामा, राम.. राम..! "
_______________________________________________
माझ्या सध्याच्या अंधारी प्रशालेतील खूप मायाळू व्यक्तिमत्त्व..आदरणीय उबाळे मामा..!
मी या शाळेत उपस्थित झालो अन् अनेकानेक मानवी घटकांना खूप जवळून पाहण्याचा योग येत गेला..अन् येत आहे..!
वास्तविक मी बदली प्रक्रियेत अंधारी गाव मागितले नव्हते..पण
शासनाच्या बदली धोरणाने दिले अन् स्विकारले..! दररोज जेंव्हा मी शाळेत सकाळी पहिल्यांदा प्रवेश करतो,तेंव्हा आदरणीय मामांना माझी नजर पहिल्यांदा शोधत असते.मामा दिसल्या बरोबर...मामांचा हात हातात घेऊन म्हणतो....
" उबाळे मामा..राम..राम...! "
अशी प्रेमाची साद घालून मामांचा हात,हातात घेऊन माझ्या अंधारी शाळेतील दिवसाला सुरुवात होते. ज्या दिवसापासून मी या शाळेत हजर झालो आहे तेंव्हा पासून ते आजतागायत असा एकही दिवस नसेल की ज्या दिवशी माझा मामांना हातात हात घेऊन
" राम..राम " झाला नाही..! यदाकदाचित सकाळी मामा दिसले नाहीच तर शाळा सुरू झाल्यावर वर्गातून पुन्हा बाहेर येऊन मामांना शोधून
" राम..राम...मामा.." असे म्हणतोच..!
मामांचे बोलणे खूप भावते मला..! मामांचेच नाही तर ग्रामीण भागातील सगळ्याचा भारतीयांचे बोलणे खूप जवळचे वाटते,कारण माणूस जिथून आलेला असतो,तो त्याचा भूतकाळ त्याला सतत भेटत असतो वर्तमानात..! फक्त त्या भेटणाऱ्या वर्तमानातील भूतकाळाला ओळखले की खूप हलकं...हलकं वाटतं..! माझा प्रारंभ खेड्यातून झाला आहे.त्यामुळं खेडेगाव अन् त्या गावातील माणसं आपल्या घरातीलच वाटतात.त्यांना कुठेतरी आपल्याच आळीत ,मंदिरात,शेतात,गावातील चावडीत पाहिल्यासारखे वाटत असतात.अन् त्यांच्याशी बोलण्याचा ,आपलंस करण्याचा मोह आवरत नाही.
उबाळे मामा असेच मला माझा माझ्या जन्मभूमी पालखेड येथील भूतकाळ रूपाने पुन्हा वर्तमानात भेटले.अशीच माणसं माझ्या गावात माझ्या बालपणी आम्ही पाहिलेली आहेत. कधी आमच्या आळीत,कधी पारेश्वर महादेवाच्या मंदिरात,कधी गावाच्या चावडीत, तळ्यापाळी तर कधी शाळेच्या परिसरात..! सारख्या वर्तनाची माणसं भेटली की माणसाच्या अनेकानेक स्मृती जाग्या होऊन जातात..! जशा आदरणीय उबाळे मामा यांना पाहिल्यावर मला जाणवते.
उबाळे मामा काथ्याचे विणकाम करायला खूप हुशार माणूस.. मी खास मामांची आठवण म्हणून एक काथ्याची पाय पुसनी देखील बनवून घेतली. इतकं सुंदर व मापात विणकाम आहे ...की.. पाहतच राहावे. मामांचे खूप कौतुक वाटते. उबाळे मामांचे अजुन वैशिष्टये आहे अन् ते म्हणजे शाळेतील प्रत्येक वर्गाच्या चाव्या अचूक ओळखायचे कौशल्य..! उबाळे मामा यांना दिसायला फार फार कमी आहे. खूपच अल्प दृष्टी असूनही मामा ,शाळेच्या इमारतीतील वर्गखोल्यांच्या कुलूप,आपल्या किल्ल्यांच्या गुच्छातून अचूक किल्ली फक्त हाताने स्पर्शून ,ओळखून त्या कुलूपा उघडतात. मी हे प्रत्यक्ष पाहिले आहे.खूप आचंबित होण्यासारखं कौशल्य आहे हे...!
असे आमचे मामा अन् त्यांचे अजब कौशल्य..!
वंदे मातरम्..!
ता.क.: आपली माणसं..!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: २६ ऑक्टोबर २०१८



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा