चिंतन
" एक आठवण..आमच्या बालपणीच्या दिवाळीची..!"
===================================
लहानपणी आम्ही काही बालमित्र...दिवाळीच्या सणाला लक्ष्मीपूजन झाले..की दुसऱ्या दिवशी आमच्या पालखेड गावातील काही श्रीमंतांच्या गल्लीत सकाळी सकाळीच उठून जायचो..!
कारण....
त्या श्रीमंतांनी काल लक्ष्मीपूजन झाल्यावर जे खूप सारे फटाके फोडलेले असायचे,त्यातील जे काही फटाके वात न शिलगल्यामूळे फुटलेले नसायचे..ते हुडकून हुडकून गोळा करायचो..! अन् मग मोठ्या फुशारिने तेच गोळा करून आणलेले फटाके फोडायचो..!☺ त्यात एक वेगळाच आनंद मिळायचा..जो आजच्या हजार रुपयांच्या खरेदी केलेल्या फटक्यात मिळत नाही..!
आज ह्या आठवणी माझ्या मुलांना सांगितल्या की,त्यांना खरं वाटत नाही..! ही परिस्थिती सर्वत्र आहे..! त्यात आजच्या माझ्या सारख्या अनेक पालकांच्या मुलांचा दोष नाही..! आज या मुलांना ते चटकेच माहीत नाही..! ते हुडकणं माहीत नाही..! आयुष्यात जीवन जगत असताना बसलेला चटकाच खूप काही शिकवून जातो..!
आमची पिढी फार काही जुनी नाही,आम्ही अजून बऱ्यापैकी तरुण आहोत..!☺ मात्र आज असे आमच्या पिढीला नक्कीच वाटते की,आमच्या काळातील बऱ्याच गोष्टी या म्हाताऱ्या होत चालल्या आहेत..! गेल्या तीस.. चाळीस वर्षांत समाजात खूप मोठ्या प्रमाणात स्थित्यंतरे आलेली आहेत..! माणसाने आधुनिक तंत्रज्ञांनांच्या साहाय्याने खूप प्रगती केली,मात्र ज्या गोष्टी तीस ..चाळीस वर्षांपूर्वी होत्या त्यातील ममत्व संपल्यात जमा झाले आहे..!
आज मला किंवा माझ्या सारख्या अनेक माझ्या खेड्यातील मित्रांना ,ज्यांचा मूळचा पिंड खेड्यातील आहे, पण ते शहरात स्थायिक झाले आहेत..! त्यांना शहरात राहायला अन् वागायला खूप मर्यादा येतात..! कारण आम्ही आमच्या खेड्यात सगळं कसं मोकळं..चाकळं वागून आलेलो आहे..! कोणत्याही गल्लीत कितीही वाजता फिरणे,कोणाच्याही ओट्यावर कधीही बसणे इत्यादी अनेक बाबी ह्या आमच्या काळात सहज होत्या..! त्यात कुणालाच अजिबात संशय येत नव्हता..! आज याच बाबी खेड्यात देखील सहजपणे होताना दिसत नाही..! कारण आजकाल खेड्यात देखील शहराने शिरकाव केला आहे..!☺ आमच्या काळातील खेडं ,आजच्या काळात खेड्यात देखील पाहायला मिळत नाही हे देखील खेड्यातील सामाजिक वास्तव आहे..!
आमचा भूतकाळ आमचा पिच्छा सोडत नाही..! आम्ही त्याच मोकळ्या चाकळ्या वर्तनाने वर्तन करायला गेलो की,आमच्या विषयी संशय निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते..! शहरात सगळं कसं...सिस्टॅमॅटीक..!☺ या अशा सिस्टॅमॅटीक वातावरणात मनाची कधी कधी कुचंबणा होते..! यातही मूळच्या शहरातील असणाऱ्या लोकांना पूर्णपणे दोष देता येणार नाही..! आज मुळात सगळा माणूसच बदलत चाललेल्या सामाजिक वातावरणामुळे गूढ होत चालला आहे,त्यामुळे मूळच्या शहरातील माणसांच्या मनात देखील सिस्टॅमॅटीकपणा येणारच..!
पण...यात आमच्या सारख्या मूळच्या खेड्यातील अनेकांना नाहक सिस्टॅमॅटीक राहावे लागू राहिले त्याचे काय...?☺
वंदे मातरम्..!
एक खेडूत लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक:२९/१०/१९,भाऊबीज..!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा