शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

" लग्न पत्रिका आणि श्रध्येयांचा होणारा अपमान..!"




चिंतन

" लग्न पत्रिका आणि श्रध्येयांचा होणारा अपमान..!"
___________________________________________

 बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की, आपल्या भारत देशात.. कुणाच्या देवदेवतांच्या विटंबनेवरुन किंवा राष्ट्र पुरुषांचा पुतळ्यांच्या किंवा धार्मिक प्रतिकांच्या विटंबनेवरून एकमेकांची डोकी फोडली जातात..!  पण लग्न पत्रिकेतील देवदेवतांचा ,राष्ट्रपुरुषांचा,धार्मिक प्रतिकांचा आपल्या डोळ्या समोर होणाऱ्या अतिशय गलिच्छ अपमानाच्या वेळी सगळे कसे शांतपणे सहन करतात..आपल्या आराध्यांचा होणारा अपमान..!

आपण ज्या लग्न पत्रिकेत,किंवा त्यावर आपल्या अनेक देवदेवतांची किंवा थोर राष्ट्रपुरुषांचे फोटो, प्रतिकं छापतो.. फार..फार.तर लग्न होई पर्यंत त्या लग्न पत्रिकेचा सन्मान राखला जातो.मात्र एकदा का लग्न झाले...की मग त्याच लग्न पत्रिकेची झालेली अवहेलना पहावल्या जात नाही.परिणामी त्या पत्रिकेतील देवदेवतांचा, राष्टपुरूषांचा नको..नको..तो..झालेला अपमान प्रत्येक जण आपल्या उघड्या डोळ्यांनी  मूकपणे पाहत असतो..!बऱ्याच वेळा या लग्न पत्रिका खूप गलिच्छ ठिकाणी पाहायला मिळतात..!आपण मोठ्या कौतुकाने त्याच लग्न पत्रिकेवर आपल्या इष्ट देवदेवतांचे, राष्ट्रपुरुषांचे फोटो छापलेले असतात..!

माझे तर  प्रामाणिक मत असे आहे की,लग्न कोणत्याही जाती धर्माचे असो,त्यांनी आपापल्या लग्न पत्रिकेवर फक्त आणि फक्त मजकुरच छापायला हवा..!जेणेकरून जरी पत्रिकेची अवहेलना झालीच..( अवहेलना नक्कीच होते..!) तर त्यामुळे कुणाच्या उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या आपापल्या इष्ट देवदेवतांच्या ,राष्ट्रपुरुषांच्या होणाऱ्या अपमानामुळे भावना नक्कीच दुखावणार नाहीत..!

लग्न पत्रिका व मोठ्या तसबिरी मधील देवदेवतांच्या किंवा राष्ट्रपुरुषांच्या  किंवा प्रतिकांविषयी माणसांच्या असलेल्या श्रद्धेच्या भावना भिन्न..भिन्न दिसून येतात..!
एकातील श्रद्धेय पायंदळी तुडविल्या जातात,बहुतेक वेळा अतिशय गलिच्छ ठिकाणी अस्ताव्यस्त पसरलेल्या आढळून येतात..!
तर तसबीरितील श्रध्देयांना सन्मानाचे स्थान बैठकीत,देवघरात दिल्या जाते..!

देवदेवता किंवा राष्ट्रपुरुष तेच असतात..फक्त..माणसांच्या आपल्या सोयीनुसार , स्वार्थानुसार त्यांना उपयोगात आणण्याच्या पद्धती बदलतात..!श्रद्धेच्या नावाखाली  माणसांचे असणारे दुहेरी रूप यापेक्षा कदाचित दुसरे कोणतेच नसावे..! बहुदा..माणसाने  आपल्या श्रद्धा, प्रतिकं,अभिमान,या सर्वांचा होणारा अपमान,आपापल्या श्रध्देयांची डोळ्यासमोर जगजाहीरपणे होणारी परवड इत्यादी अनेक बाबी वापरण्याचे  आपल्या सोयीनुसार नक्की केले आहे..!

पुतळा,फोटो , प्रतिकं यांची विटंबना कुणी केलीच तर सर्वत्र हाहाकार माजला जातो अन् लग्नपत्रिका मधील त्याच राष्ट्रपुरुषांचा,देवदेवतांचा होणारा डोळ्यासमोरील अपमान,विटंबना माणूस निमुटपणे पाहत असतो...! यापेक्षा माणसाचे ढोंगी दुसरे रूप असूच शकत नाही..! विशेष म्हणजे हे सगळं ,सगळ्याच जाती धर्मातील माणसं करतात..!☺

माणूस फार विचित्र प्राणी आहे का हो..?
त्याला सगळं त्याच्या मनाप्रमाणं हवं असतं..! मग ते काहीही असो..! जसं आपल्या भारताच्या महान संविधानातील कर्तव्यांपेक्षा त्याला अधिकार हवे असतात...! त्यासाठी तो काहीही करायला तयार होतो..! पण कर्तव्य आलं की...समोरच्याला म्हणतो ,
" तू , हो ना पुढे..! मी येतो मागून..!!"

मात्र  आपापल्या श्रध्देयांची अशी होणारी परवड,अपमान ,लग्न पत्रिका सोडून इतर ठिकाणी,उदा.पुतळा,फोटो इ.ठिकाणी झालीच  तर..........
बाप रे...पुढे काय काय..होईल..किंबहुना..बऱ्याचदा झालेले सुध्दा आहे..अशी सर्व समाजाची वाताहत होते..दंगली होतात..! परिणामतः  राष्ट्राचे अपरिमित नुकसान होते..!

चला तर मग एक प्रयत्न करुया..आपापल्या श्रद्धेयांचा ,आपल्याच संमतीने ,आपल्याच डोळ्या समोर होणारा अपमान थांबविण्याचा..! लग्न पत्रिका छापुया...फक्त मजकुराने..!

वंदे मातरम्..!

माझ्या मुलांनी  जर मला विचारून लग्न केले तर भविष्यात स्वतच्या मुलांची ( इतरांची हमी घेत नाही..!)  लग्न पत्रिका फक्त मजकूराने छापू इच्छिणारा  लेखक :
नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

लेखन दिनांक: ९ मे २०१८ व,
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: ९/११/२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा