शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९

"शेम टु शेम...! "



***  मला प्रवासात भेटलेली माणसं  ***

                         " शेम टु शेम...! "
_______________________________________________

मी आपला सावरून, सवरून , नेहमी प्रमाणे सर्वात पाठीमागे शिस्तीत बसलो होतो. हे माझे सर्वात पाठीमागे बसणे थेट माझ्या इयत्ता १ ली पासून ते आजतागायत आहे.. बरं का..!😂
असो,
 समोर एक साहेब ,
" आम्ही असं काम करावं, तसं काम करावं..!"
अशा अनेकानेक उपदेशपर ,मार्गदर्शनपर दोन,चार गोष्टी समजावून सांगत होते..! इतक्यात..माझ्या नेमकं थोडेसे पुढे एक चांगला ओळखीचा चेहरा,देहयष्टी असलेला माझ्याच वयाचा पण , माझ्या व त्याच्या कपाळावरील भागात अमुलाग्र फरक असलेला एक इसम येऊन बसला..!
मी मनात म्हटलं," अरे,हा विजू इकडं काय करू राहिला..?"
माझं,त्या मार्गदर्शन करणाऱ्या साहेबांच्या अमृत वाणीकडे अजिबात लक्ष नव्हते..! अगदी तसेच,जसे वर्गातील ,शिक्षण विभागाच्या दृष्टीने "अप्रगत विद्यार्थ्यासारखे..! आता सरकारला काय माहीत,जगातील सर्वात सुपीक मेंदू हे वर्गातील मागील रांगेतच सापडतात..!😂 बहुदा माहीत सुध्दा असेल..!😂😂

 भल्या मोठ्या हॉल मध्ये स्वयंपाक घरातील सांडशी पडल्यावर,त्याच सांडशीचा मस्त आवाज ऐकू येऊ शकेल इतकी निरव शांतता होती..!  माझी आपली चुळबुळ सुरूच होती, मनात म्हणत होतो, " याला आवाज कसा देऊ...?"
अखेर अंदाजे १९७० पूर्वीच्या नवविवाहित दांपत्यासारखा हळूच आवाजात त्याला आवाज दिलाच..
" विजू, ऐ....विजू...!"
त्याचं काही लक्ष जाईना..! मग मी त्याच्या आडनावाने वरील प्रमाणेच १९७० पूर्वीचा आवाज दिला...
" ऐ, पाताळयंत्री...!"
असे म्हंटल्यावर त्याने पटकन माझ्याकडे मागे वळून पाहिले..!
पण,त्याची नजर ,माझ्याकडे अनोळखी नजरेनं पाहत होती.मी मनात म्हटलं, " अरे,हा विज्या..स्वतः ला लई शहाणा समजू राहिला की काय..? ओळख पण देईना..!"
त्याने हाताने इशारा करून,नंतर बोलू असे मला करपल्लवी करून सांगितले. तेंव्हा कुठं मी चौकसपणाची तात्पुरती माघार घेतली..!

अखेर साहेबांची बैठक सुखरूप समाप्त झाली.त्याची नजर माझ्याकडे पाहताना अनोळखी असल्यानं मी औपचारिक भाषेत विचारले , " तुम्ही , पानवडोदचे ना..?"
" हो,मी तिथेच शिक्षक आहे..! तुम्ही कोण..?"
आता मला पक्की खात्री झाली की ," हा तो नव्हेच..! जो मी समजत आहे..!"
मी- " तुमचा एखादा भाऊ, डी.एड ला कन्नड येथे होता का हो..?"
" हो..विजय त्याचे नाव आहे,तो तेथे होता..! तुम्ही पण तिथे होता वाटतं..! म्हणूनच तुमची गफलत होऊ राहिली..!तो अन् मी जुळे भाऊ आहोत..!
मी- " काय शेम टु शेम आहात राव तुम्ही दोघे..! बरं झालं मी तुम्हाला डायरेक्ट विज्या नाही म्हणालो...! तुमचा नाहक गैरसमज झाला असता..!"
" नाही हो..! याच आवाजाच्या हाकेच्या मैत्रीत खरी मजा असते..!"
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या अन् आम्ही एकमेकांचा निरोप घेतला..!

ता.क.: खरचं, ही शेम टु शेम दिसणारी माणसं बऱ्याचदा ,बऱ्याच जणांना चांगलीच अडचणीत आणतात..त्यांच्या दिसण्याच्या सांधर्म्यामूळे...!😂

वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

घडलेला प्रसंग दिनांक: २१ सप्टेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा