आमचे गाव ,आमची माणसं
" यांकू पप्पा...! अत्युत्कृष्ट वादक..! "
________________________________________________
कोण होते कुठले होते माहीत नाही पण आमच्या पालखेड गावात दरवर्षी यात्रेला यायचे..! ग्रेट होते..!
आम्ही पालखेड ता.वैजापूर येथे लहानपणी गावातील विविध मिरवणुका पहिल्या..! त्या सर्व मिरवणुकांवर जीव ओवाळून टाकावा असा त्यांचा थाट असायचा..!विशेष म्हणजे त्या सर्व मिरवणुकांमध्ये नाचनाऱ्यांचे ,शरीराचे सर्व अवयव थिरकण्यापेक्षा पायांची विशिष्ट लयबध्द हालचाल मस्तपैकी व्हायची..!
आजही त्या गतकाळातील त्या लयबध्द ,मस्तपैकी हालचाली आठवल्या तरी आपोआप स्वतः चे पाय थिरकायला लागतात..!
असं काय होत, त्या मिरवणुकीमध्ये की,ज्याच्या वाजण्याने गावातील माझ्या सकट सर्व जे कुणी " लयबध्द नाचणे " या नाद संस्कृतीवर अद्याप विश्वास ठेवून आहेत,त्यांचे पाय थिरकायला लागायचे..?
त्या वादकांचे नाव होते.." यांकु पप्पा..!"
आता त्यांचे नाव यांकू पप्पा का होते हे मला त्यावेळी ही माहीत नव्हते अन् अजुन पर्यंत हे नाव माझ्या साठी कुतुहलाचा विषय आहे..!त्या सर्व वादकांच्या प्रमुखाचे नांव यांकू पप्पा होते की..अजुन काही...हे अजूनही मला माहित नाही..! पण एक मात्र नक्की खरे की, या यांकू पप्पांनी आमच्या तत्कालीन पालखेडकरांना वेड लावले होते...नाचायचे..!
यांकू पप्पा व त्यांच्या संचात दोन, तीन जण पिपाणी वाजायला व दोघं जण संबळ वाद्य वाजवणारे असायचे..! ते आमच्या पालखेड गावातील ग्राम दैवत असलेल्या श्री.पारेश्र्वर महादेव कार्तिकी यात्रेला हमखास असायचे..! महादेवाच्या मिरवणुकीत सहभागी बहुतांशी लोक,यांकू पप्पांच्या ठेक्यावर ताल धरून नाचायचे..! खूप मज्जा यायची..! त्या नृत्यात जुने हिंदी चित्रपट अभिनेते भगवान दादा यांच्या हळुवार,सूक्ष्म हालचाली, पायांचे मोजक्या अंतरावर चाल करून नाचणे, ते नाचत असताना मधूनच गोल गिरकी घेऊन पुन्हा ठेका धरून नाचणे..मध्येच एखादी किंकाळी फोडणे..यांचे पदोपदी दर्शन व्हायचे..!
व्वा... काय अप्रतिम होते ते सर्व..!
पण............
काळाच्या ओघात यांक्कू पप्पा व त्यांचा संच आमच्या गावातूनच काय तर या जगातून हद्दपार झाला की काय असे वाटू लागले आहे..! कुठेच हा ठेका व त्याच्या तालावर नाचणारे आधुनिक युगातील तरुण नाचताना दिसत नाही..! जे थोडेफार शिल्लक आहेत ते खान्देश मध्ये विशेष करून धुळे जिल्ह्यात ही वाद्य संस्कृती व तिच्या तालावर नाचणारे सर्व वयोगटातील नर्तक पाहायला मिळतात..! मी याचा जवळून अनुभव घेतला आहे.माझ्या मित्रांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या लग्न समारंभात..! उर्वरित महाराष्ट्रात यदा कदाचित हा प्रकार दिसलाच तर त्या नाचणाऱ्या तरुणांना मरगळ आल्या सारखे त्यांचे नृत्यकाम सुरू असते..!
मात्र जर का तो DJ भाऊ आला तर यांच्या अंगात आल्या सारखं होतं..! हा DJ भाऊ ,वाजायला लागल्यावर नाचनाऱ्यांच्या शरीराचा नेमका कोणता अवयव हालचाल करू राहिला हे समजतच नाही..! ना त्यात नाद माधुर्य असते ना भगवान दादांच्या लयबध्द नृत्याचा ठेका त्यात धरता येतो..!
अलीकडच्या काळात " जोगवा " मराठी चित्रपटातील
" ललाटी भंडार..!" या गीतावर तोच ठेका आहे,जो यांकू पप्पांच्या ठेक्याची आठवण करून देतो..ते गीत ऐकून मला माझ्या लहानपणी पाहिलेल्या, ऐकलेल्या यांकू पप्पाची ठेका धरून आठवण आली..! या गीतात साक्षात भगवान दादाच नृत्य करत असल्याचा मला भास होतो.शेवटी लयबध्द वाद्य संस्कृती कधीही लुप्त होत नसते हे असे काही उत्कृष्ट लोकगीत नृत्य प्रकार पाहताना मनोमन पटते..!
ता.क.: आपल्या भागात कुठे हा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला यांकू पप्पांच्या वाद्य संस्कृतीतील वाद्य प्रकार व त्यात सहभागी भगवान दादा नृत्य शैली जोपासणारे नर्तक आढळल्यास नक्की कळवा..!😂
वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: २३ सप्टेंबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा