बुधवार, ४ सप्टेंबर, २०१९

आमच्या आयुष्यातील अनमोल गुरु, भगत सर..!



मला प्रवासात भेटलेली माणसं..!

 " आमच्या आयुष्यातील अनमोल गुरु, भगत सर..! "
=====================================

आज दिनांक १६ जुलै २०१९ रोजी, गुरु पूर्णिमा आहे..!
आज ज्यांनी आपल्याला काहीतरी शिकवलं त्या सर्वांना विनम्र वंदन करण्याचा पवित्र दिवस असतो..!

आम्हा माध्यमिक शाळेतील काही मित्रांच्या आयुष्यात आज जे काही स्थैर्य आहे त्याला ज्या महान गुरूंचे ,शिक्षकाचे योगदान लाभले आहे..ते जर आम्हाला माध्यमिक शाळेतील वयोगटात लाभले नसते तर....
तर नक्कीच आम्ही आज  आम्ही जे काही आहोत,ते नक्कीच नसतो..!

माध्यमिक शाळेतील वयोगट हा अतिशय संवेदनशील अन् सतत काहीतरी ग्रहण करणारा वयोगट..! याच वयोगटात मुलं बिघडण्याची शक्यता खूप दाट असते.या वयोगटात जर विद्यार्थ्याचे पाऊल चुकीचे किंवा इतर फालतू उपक्रमात रममाण झाले तर त्या विद्यार्थांना त्यांचा भविष्यकाळ अंधकारमय होऊन जातो..! याच वयोगटात जर शिक्षणाची स्वप्न नाही दाखविल्या गेली तर ती मुलं आपल्या  भावी आयुष्यात देखील नको नको त्या फालतू उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवून आपल्या सगळ्यांचेच पारणे फेडत असतात..!

आम्ही काही मित्र नक्कीच खूप खूप नशीबवान होतो की, आम्हाला याच वयोगटात शिक्षणाची स्वप्न दाखविणारे गुरु,शिक्षक लाभले..अन् ते म्हणजे वंदनीय जी.एम. भगत सर..!

शैक्षणिक वर्ष १९८९ ते ९०
आमच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष..! माझी नुकतीच इ.७ वी उत्तीर्ण झाली होती अन् इ.८ वी मध्ये प्रवेश घ्यायचा होता..! आमच्या पालखेड गावात जिल्हा परिषद शाळेत इ.७ वी पर्यंत माझे शिक्षण पूर्ण झाले होते,आता याच गावातील एकमेव शिक्षण संस्था श्री.पारेश्वर विद्यालयात प्रवेश घ्यायचा होता.. ! या शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी मला माहित होते की याच शाळेत अतिशय शिस्तप्रिय शिक्षक होते त्यांचे नाव होते परम वंदनीय जी.एम. भगत सर...!

इ.८ वी ला प्रवेश घेतला. आमच्या आयुष्यात आदरणीय भगत सर यांचा प्रवेश झाला होता. मते कोणता शिक्षक,कोणता विषय शिकवतो याला अजिबात महत्त्व नाही,तर तो शिक्षक, विद्यार्थ्यांच्या किती जवळ जातो,त्या विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला किती समजून घेतो, विद्यार्थांना तो शिक्षक शिक्षणासाठी किती वेळ देतो, यातच त्या शिक्षकाचे त्याच्या शिक्षकी आयुष्याचे मूल्यमापन होत असते..! अगदी असेच शिक्षकी आयुष्याचे सार्थकी मूल्यमापन आदरणीय भगत सर यांचे निदान आम्हा काही मित्रांच्या आयुष्यात सदैव राहील..! आदरणीय भगत सर,सर्व विषय खूप छान,हृदयाला भिडेल असे शिकवायचे..!

आदरणीय भगत सर..!
एक अवलिया शिक्षक..! भगत सरांना काय येत नव्हते...? तर सर्व विषयांचे ज्ञान, लेखक,उत्तम ढोलकीपटू , गायक, उत्तम वक्ता, मोजक्या शब्दांत समयसूचक कसं बोलावं ते आदरणीय भगत सर यांनीच..! भगत सर,वैज्ञानिक होते, कोणत्याही विषयावर समर्पक शब्दांत व्यक्त व्हावं ते सुध्दा भगत सर यांनीच..! आदरयुक्त धाक असावा तो भगत सर यांच्या सारखाच..! भगत सर,उत्कृष्ट चित्रकार आहे,कलाकार आहे, दिग्दर्शक आहे..!,हजरजबाबी आहेत,विनोदी आहेत, बारा बलुतेदारांच्या सर्व कला आदरणीय भगत सर यांना अवगत होत्या..! थोडक्यात सबकुछ होते अन् आहेत आदरणीय भगत सर..!

आम्हा काही मित्रांच्या अंतर्मनात सामाजिक जाणिवा अन् संवेदना निर्माण केल्या ,आदरणीय भगत सर यांनीच..! परम वंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर परम श्रध्दा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतिशय जीवतोडून केलेल्या अभ्यासाची महती शिकविली ती सुध्दा आदरणीय भगत सर यांनीच...! स्वतः आदरणीय भगत सर,तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर श्रद्धा ठेवून होते..अन् आहेत..!

आमच्या श्री.पारेश्वर विद्यालयाचा आत्मा होते भगत सर..! माझ्या पौगडावस्थेतील काळात जेंव्हा पासून  भगत सर यांचा प्रवेश झाला होता तेंव्हा पासून माझ्यातील बराच न्यूनगंड दूर झाला होता..! विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड जो शिक्षक दूर करतो तोच सदा सर्वदा महान शिक्षक असतो असे मला माझ्या स्वानुभवावरून वाटते. सर्वच शिक्षक विषयात पारंगत असतात असे नव्हे, तर जो शिक्षक मुलांच्या भावविश्वात अन् त्याची न्यूनगंडता किती दूर करतो यावर त्या शिक्षकाची योग्यता ठरते असे मला वाटते..! जातीचा, सामाजिक स्तराचा,आर्थिक स्तराचा,भावनिक न्युनतेचा,बौध्दीक क्षमतेचा इ.अनेक प्रकारचा न्यूनगंड आदरणीय भगत सर यांनी आम्हा मित्रांच्या मनातून कायमचा दूर केला..! त्याचमुळे आज आम्ही काही मित्र  शिक्षण घेऊन  समाजात स्थैर्य प्राप्त केले आहे..!

२७ जानेवारी २०१८ रोजी आमचा प्रिय बालमित्र,वर्गमित्र शेख फारुख बागवान ( जि.प.शिक्षक) याच्या मुलीच्या लग्नाला औरंगाबाद येथे जमलो होतो.अचानक रिक्षातून आदरणीय भगत सर, उतरले. त्या लग्नाला मी अन् माझा जिवलग बालमित्र,वर्गमित्र आण्णासाहेब म्हस्के ,शाम शेळके पण उपस्थित होतो. भगत सर यांना रिक्षातून उतरतांना पाहिले अन् आम्ही घाई घाईने भगत सरांच्या पायाशी लोटांगण घातले..! आजूबाजूचे शहरातील माणसं आश्र्चर्यचकित होऊन आमच्याकडे पाहत होते.आयुष्यात पहिल्यांदा भगत सरांच्या खूप जवळ उभे राहून, खूप जवळ बसून आयुष्याच्या त्या आदरयुक्त आनंदाचा ,आनंद आम्ही मित्रांनी त्यावेळी घेतला..! त्यावेळी मी सरांना बोलून पण दाखवले की,
" सर, आज आयुष्यात पहिल्यांदा तुमच्या खूप जवळ उभे राहून, बसून आनंद घेतोय..! आज आम्ही सर्वजण आयुष्यात जे काही आहोत, त्याला, आमच्या आई वडीलांशिवाय फक्त तुम्हीच निमित्त आहात..! यावर सरांना खूप भरून आले होते..! मी त्यावेळी सरांना विनंती केली होती की,
" सर,आमच्या अंधारी प्रशालेतील माझ्या मुलामुलींना तुमचे बहुमोल मार्गदर्शन देण्यासाठी नक्की या..!"
यावर भगत सर म्हणाले होते की,
" आरं नंदू तात्या ( मला सर, लाडाने नंदू तात्या म्हणतात ) ,तू कधी पण बोलव, मी नक्की येईल..!"
मी माझ्या अंधारी प्रशालेतील काही मुलामुलींना माझ्या या महान गुरु बद्दल बऱ्याचदा सांगितलेले आहे..! आता फक्त प्रतीक्षा आहे,माझ्या गुरूची अन् माझ्या अंधारी प्रशालेतील मुलामुलींच्या भेटीची..!

आज गुरुपौर्णिमा उत्सव आहे..! त्यानिमित्त आमच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या महान गुरूला, अधिकृत शिक्षकी आयुष्यात निवृत्त झालेल्या गुरूंना, भगत सर यांना आम्हा विद्यार्थ्यांकडून विनम्र वंदन..!

लेखक व आदरणीय भगत सरांच्या आयुष्यभराचा शिष्य: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव 

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १६ जूलै २०१९, गुरुपौर्णिमा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा