" स्री ही भावनेची शक्ती देवता आहे..! "
=====================
पूरूषांची पूरूषी अहंकाराची मानसिकता धोकादायक आहे.फक्त स्री नेच पूरूषांची सर्व कामे करावीत ही एककल्ली मानसिकता आहे.पूरूषांनीही आपली स्रीयांप्रती असणारी जबाबदारीही ओळखायला हवी.सेवा काय फक्त तीनेच करायची का? ही दोन चाके आहेत. एकमेकांना समजून,सहकार्य करणारी..!परंतू बऱ्याच पूरूषांचे पूरूषी अहंकाराचे एककल्ली धोरण या धोरणाला बाधक ठरू शकते.नव्हे नव्हे कित्येक पिढ्यांपासून पूरूषी अहंकारी मानसिकता आपल्या समाजात किड करून पोखरत आहे.आपल्या भारतातील ज्या..ज्या समाजाने सर्व क्षेत्रात प्रगती केलेली आहे त्यांनी त्यांच्या स्त्रीयांना बरोबरीची अन् सन्मानाची वागणूक दिली आहे.
जर एखाद्या स्रीने पूरूषाच्या आई वडिलांची सेवा,आदर केला तर अशा स्रिया सदासर्वकाळ वंदनीय आहेत.मात्र पूरूषांनीही त्या स्रीच्या आई वडीलांची काळजी,सेवा,आदर करायवाच हवा.
काहीजण मी असेही पाहिलेले आहे,जे मोठ्या अभिमानाने सांगतात की,
" मी इतक्या...इतक्या वर्षापासून सासुरवाडीला गेलो नाही..!"
" मी काहीही करायचं असलं की, माझ्या बायकोला अजिबात विचारत नाही..!"
इत्यादी....इत्यादी ..
मला हे कळत नाही की ,अशा पुरुषी अहंकाराच्या गप्पांमध्ये कुठला आला पुरुषार्थ..?
स्री म्हणजे काय फक्त भोग वस्तू आहे का..?
ह्या त्याच पुरुषी मानसिकता आहेत,ज्यांनी वर्षानुवर्षे महिलांना आपले बटिक करून ठेवलेले आहे.आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांच्या सिद्धांतानुसार आपण जेवढं एखाद्या तत्त्वाला दमन करू, तेवढा तिचा उद्रेक हमखास होत असतो. फक्त तो उद्रेक होण्याची माध्यम भिन्न..भिन्न असतात इतकेच..!आज आपण पाहिलं तर असे सहज लक्षात येईल की,अंधश्रद्धेच्या आहारी जाण्याचे प्रमाण महिलांचे जास्त आहे.त्याचे कारण हेच की,त्यांना आपल्या भावना व्यक्त करायला या पुरुषी अहंकाराच्या मानसिकता अडसर ठरतात.काही धर्मात तर महिलांना इतकं काही नखशिखांत आचरणाच्या बाबतीत बंधनात ठेवलं आहे की किळस येते त्या धर्मांध मानसिकतेची..! त्यांना आपलं दुःख व्यक्त करायला अंधश्रध्दांचा सहारा देखील घेता येत नाही. किती मानसिक कुचंबणा होत असेल त्या माता भगिनींची..? निष्णात मानसशास्त्रज्ञाला देखील अशा अतिशय बंदिस्त स्त्रीयांवर उपचार करणे म्हणजे खूप मोठे आव्हान आहे.
काही कमावत्या महिलांना तर त्यांच्या स्व कष्टाच्या कमाईवर सुध्दा अधिकार नसतो. आली कमाई...घेतली नवऱ्यानं ताब्यात..!त्या कमवित्या माता भगिनींचा अंडी देणारी कोंबडी म्हणूनच वापर होतो. प्रचंड घुसमट होत असते अशा कमवित्या महिलांची..!
भारतीय राजकारणात वेगवेगळ्या क्षेत्रातही महिलांना विविध पदांचे आरक्षण दिल्या गेले आहे.पण ज्या महिलांना ते विविध पदे जनतेने दिले आहेत,त्याच पदावर त्याच महिलांचे बहुतांशी पती किंवा इतर पुरुष नातेवाईक सतत लुडबुड करून त्या अधिकृत पदाधिकारी असलेल्या महिलांचे खच्चीकरण करत असतात. हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही..तर बऱ्याचदा त्या महिलांचे अधिकृत राजकीय पद त्यांचे पती महाशय स्वतः च्या नावाच्या मागे पुढे लावायला सुध्दा स्वतः चा पुरुषार्थ समजून घेतात. काहीवेळा त्यांचे कार्यकर्ते देखील अशी महिलांची पदे त्याच महिलांच्या पतीच्या नावापुढे किंवा मागे लावून काय दाखवू इच्छितात हा मोठा प्रश्न आहे. ही आपल्या भारतीय राजकारणातील पुरुषांच्या अहंकाराची विकृती आहे. अन् यात नाहक मानसिक बळी ठरते महिला..! विशेष गंमत म्हणजे ज्या महिलांचे राजकीय पदे जे त्यांचे पती अनधिकृतरित्या ताब्यात घेतात तेच महिलांच्या स्वातंत्र्याच्या अन् त्यांच्या गौरवाच्या गप्पा मारतात. किती प्रचंड विरोधाभास आहे हा..! जे याला अपवाद आहेत ते वंदनीय आहेत.
किती पती या नात्यातील पुरुष आपल्या पत्नीला आपल्या जवळ मायेनं बसवून,तिच्याशी प्रेमानं,शृंगारिक शब्दात बोलतात..हा खूप चिंतनाचा विषय आहे. विधात्याने स्री असा एकमेव सजीव बनवलेला आहे की,ज्याला या भूतलावरील सर्व प्राण्यांमध्ये आपल्या कौतुकाची प्रचंड आस असते. लग्नापूर्वी किंवा फार तर पाहिलं लेकरू होई पर्यंत बहुतांशी पती ,आपल्या पत्नीचं पोटभरून कौतुक करत असतात. मात्र नंतर तो कौतुकाचा झरा आटत जातो. तो जसजसा आटत जातो तसतसा..दोघांमधील प्रेमळ नात्यात उरत राहतात ते फक्त आणि फक्त शुष्क नात्याच्या आटून गेलेल्या झऱ्यांचे अवशेष..! कधी..कधी हे भग्नावशेष इतकं भयानक रुप धारण करतात की, दोघांना विभक्त होण्यापर्यंत मजल मारावीच लागते.याला जे अपवाद आहेत ते वंदनीय आहेत.
माझ्या मते लग्न जुळताना एकमेकांची सहमती फार फार आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात कौटुंबिक अपघात होत नाहीत किंवा रोखता येतात. स्री आणि पुरुष यांच्या नात्यात काही बाबतीत पारदर्शकता असायलाच हवी.जसे की लग्नापूर्वी स्थळ जुळविण्यापूर्वी..! पण नेमके आपल्या बऱ्याचश्या भागात अजूनही फक्त पुरुषांचा होकार यालाच महत्त्व दिले जाते अन् मग त्या दोघांच्या लग्नानंतरच्या आयुष्यात मराठी चित्रपट
" दुनियादारी " मधील एका प्रसंगाची वास्तविकता सहजपणे लक्षात येते. समाजमान्य व आपापल्या इष्ट धार्मिक आराध्यांच्या साक्षीने झालेल्या लग्नानंतर नवऱ्याकडून त्याच्या पत्नीवर बलात्कार होत असतात. एका पतीचा...त्याच्या पत्नीवर...!एका स्त्रीच्या अनिच्छेने दुसऱ्या पुरुषाशी झालेल्या लग्नानंतर होणारे शारीरिक संबंध हे समाजमान्य बलात्कारच ठरतात. येथे बलात्काराची व्याख्या समजून घेणे गरजेचे आहे. बलात्कार म्हणजे मनाच्या अनिच्छेने होणारा शारीरिक संबंध होय.मन येथे सर्वोच्च ठरते. थोड परखड पण हे कटू सामाजिक सत्य आहे..काहींच्या बाबतीत..! या आशयाचा दुनियादारी चित्रपटात खूप सुंदर अन् भावूक संवाद वर्षा उसगावकर यांच्या तोंडी आहे,त्या जेंव्हा त्यांच्या मुलासमोर स्वप्नील जोशी समोर असेच काहीतरी व्यक्त करतात.त्यावेळी पुरुषांच्या अहंकाराची अन् स्री ला दुय्यम स्थान दिल्याची नकळतपणे जाणीव अन् तिची होणारी घुसमट जाणवते.थोर लेखक सुहास शिरवळकर लिखित दुनियादारी कादंबरीवर आधारित दुनियादारी हा चित्रपट बऱ्याच प्रसंगात स्री जातीच्या व्यथा व्यक्त करतो.
कोणत्याही स्री.. ला फक्त नोकरी करणारा किंवा खूप पैसेवाला पती असून चालत नाही,तर तो कोणत्याही प्रकारचा बलात्कार करणारा नसावा यावर ती स्री अपेक्षा ठेवून असते. बलात्कार हा फक्त शारीरिक संबंधानेच होतो असे कदापि नसते.तर.... बलात्काराच्या व्याख्या व त्यांचे स्वरूप खूप व्यापक आहे.जेंव्हा एखादा पुरुष ,त्याच्या पत्नीवर त्रास ठरणारा प्रकार करतो,त्यावेळी ती महिला ,केवळ आपला पती आहे म्हणून ते निमूटपणे सहन करत आलेली आहे अन् भविष्यात देखील हेच होत राहणार. उदाहरणार्थ विविध प्रकारचे भयंकर धूम्रपान करून स्री शी संपर्क ठेवणे इत्यादी.
स्री..ही भावनेची शक्ती देवता आहे. मग ती कोणत्याही नात्यात असो..! तिला फक्त हवी असती भावना अन् शक्ती..! अशा कित्येक माता,भगिनींनी आपल्या मुलांबरोबर , पती बरोबर अजुन इतर नात्यांबरोबर खूप आत्मियतेनं पवित्र भावनिक नाते निर्माण करून इतिहासात शक्तीरुपाने अजरामर झालेल्या आहेत.
राजेश खन्ना व स्मिता पाटील अभिनित " अमृत " नावाचा एक माझा आवडता नितांतसुंदर हिंदी चित्रपट आहे.ज्यात दोघेही वयोवृध्द असतात.दोघांचे वेगवेगळे कुटुंब असते. दोघांमध्ये कोणतेही नाते नसते.दोघांनाही त्यांच्या घरातील मुलांकडून , सूनांकडून हीन वागणूक दिली जाते.आणि...मग तेच दोन वयोवृध्द एक स्त्री अन् एक पुरुष एकत्र येतात,जेंव्हा..जेंव्हा भेट होईल तेंव्हा तेंव्हा आपल्या होणाऱ्या मानसिक कुचंबणांच्या भावनांना वाट मोकळी करून देतात.दोघांमध्ये कोणतेच नाते नसते. असतो फक्त भावनिक ऋणानुबंध..! जो त्यांना आपल्या घरातून मिळत नाही,आणि मग जिथे हा मायेचा भावनिक ऋणानुबंध मिळतो, तिथे बहरते...एका पुरुषाने एका स्रीला समजून घेण्याच्या नात्यातील सर्वांगसुंदर संजीवन नात्याची कथा..!
थोडक्यात जिथं मन हलकं करून कुणीतरी आपल्या मनातील भावना व्यक्त करत तेच खरं नातं..! याच आशयाचा अमृत हा खूप सुंदर चित्रपट आहे. वास्तविक जीवनात देखील अशी बरीच नाती असतात. चित्रपट हे समाजप्रबोधनाचे अन् समाजातील वास्तविकता दाखविणारे सर्वात प्रभावी प्रसार मध्यम आहे.
वरील उल्लेखित नात्यातील मर्म भावनिक दृष्ट्या समजून घ्यायची कुणाची इच्छा असेल तर " अमृत " हा चित्रपट पहा.
विधात्याने ज्यावेळी पुरुष आणि स्त्रीला निर्माण केले त्यावेळी नैसर्गिकरीत्या जबाबदारीची जाणीव अन् भावनिक ओलावा पुरुषाच्या तुलनेत स्रीच्या पारड्यात जास्त प्रमाणात दिला.त्यातल्या त्यात ज्यावेळी माणसांच्या नात्यांची गुंफण सुरू झाली त्यावेळी जी नाती निर्माण झाली त्यात सर्वोच्च नाते ठरले आईचे..! विवाहित पुरुष अन् स्री ज्यावेळी भावी आयुष्यासाठी शारीरिक संबंधाने एकत्र येतात त्यावेळी पुरुष हा बऱ्याच प्रमाणात वासनेच्या डोहात बुडून गेलेला असतो, मात्र त्याचवेळी स्री आपल्या गर्भात भविष्यात वाढणाऱ्या नवीन जीवाच्या स्वागतासाठी आतुरलेली असते. वासना आणि शारीरिक समर्पण यात बळाचा जन्म झाल्यावर विजय होतो तो मातृत्वाचा..! आपल्या गर्भात वाढविलेल्या आपल्याच रक्ताच्या गोळ्याला भावनिक आकार अन् उद्धार करण्याची ईश्वरीय जबाबदारी बाळाच्या जन्मानंतर मातृत्व लाभलेली स्री पूर्णार्थाने पूर्ण करते.
बहुतांशी स्रीयांच्या आयुष्याचा देव्हारा खूप मोठा आहे. काही पुरुष त्या देव्हाऱ्याचे भक्त आहेत.
ता.क: स्री ही भावनेची शक्ती देवता आहे..!
वंदे मातरम्
लेखक - नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक: १३ सप्टेंबर २०१६

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा