मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" योगीजी अन् दाशरथे सर - असाही संयोग..! "
==================================
माझ्या सर्व वाचक मित्रांना प्रश्न पडला असेल की,
" मला प्रवासात भेटलेली माणसं " या सदरात अचानक उत्तरप्रदेश राज्याचे वंदनीय मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ अन् आदरणीय तीर्थस्वरुप दाशरथे सरांची आणि माझी अशी कुठे प्रवासात भेट झाली की,मी त्यांच्यावर व्यक्त होत आहे..! "
वाचकांच्या मनातील प्रश्न अगदी बरोबर आहे.मात्र आमच्या तीर्थरूप वडिलांच्या आयुष्यात आदरणीय तीर्थस्वरुप दाशरथे सरांचे शिस्तीच्या बाबतीत खूप मोठे योगदान राहिलेले आहे. कालच मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या आयुष्यातील अतिशय भावूक अन् सेवा हाच धर्म या ब्रीद वाक्याला अनुसरून एक कौटुंबिक प्रसंग घडला..! माझ्या वडिलांनी ती बातमी वडिलांच्या जवळ असणाऱ्या रेडिओ वर बातम्यात ऐकली. आम्हाला त्यांच्या तत्कालीन काळातील आदरणीय मुख्याध्यापक श्री. दाशरथे सरांच्या आयुष्यातील अशीच एक अतिशय शिस्तीची आठवण पुन्हा आवर्जून सांगितली. यापूर्वी सुध्दा तो प्रसंग वडिलांनी मला बऱ्याचदा सांगितलेला आहे. योगीजी व दाशरथे सर, या दोन्ही महान विभुतींच्या आयुष्यातील समान धागा जुळणाऱ्या " सेवा हाच परमोधर्म " या उच्च कोटीच्या मूल्यांवर आधारित सत्य घडलेली घटना आहे. माझे तीर्थरूप वडील श्री.विष्णुपंत चंपतराव जाधव ( वय वर्ष ८३) त्या प्रसंगाचे साक्षीदार असल्याने मला माझ्या वडिलांच्या अनुभवातून ...
मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" योगीजी अन् दाशरथे सर - असाही संयोग..!"
हा लेख एक सद्य परिस्थितीत एक सत्य प्रासंगिक घटना म्हणून लिहिणे आवश्यक वाटले..!
म्हणून सदरील लेख वाचकांच्या सेवेत नम्रपूर्वक सादर करत आहे...!🙏
इ.स.१९६३-६४
स्थळ -जि.प.माध्यमिक शाळा नाचनवेल,ता. कन्नड,जि. औरंगाबाद.
माझ्या वडिलांना शिक्षक म्हणून पहिली नेमणूक जि.प.माध्यमिक शाळा नाचनवेल,ता. कन्नड,जि. औरंगाबाद हे गाव मिळाले होते.आयुष्यातील पहिली नेमणूक अन् तीही जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत, त्यामुळे माझे वडील खुश होते. अतिशय बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन माझे वडील शिक्षक झाले होते.त्यामुळे भविष्यात तिथल्या विद्यार्थांना जाणिवेतून शिक्षण देण्याचा निर्धार माझ्या वडिलांनी मनाशी पक्का केला होता. नाचनवेल या शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक होते श्रीनिवास किशनराव दाशरथे सर..!
श्रीनिवास किशनराव दाशरथे सर..!
रा.वाकद
अतिशय स्वयंशिस्तीचे मुख्याध्यापक..! माझे वडील सांगतात की,त्यावेळी संपूर्ण शाळेत दाशरथे सरांचे अतिशय बारकाईने लक्ष असे.अगदी, प्रत्येक शिक्षक वर्गात शिकवत आहे की नाही या बाबत दाशरथे सर,संबंधित शिक्षकांच्या वर्गाच्या बाहेरून गुपचूप पाहत असे..! जो शिक्षक असे करताना आढळत नसे,त्यांना कार्यालयात बोलावून कडक शब्दांत तंबी देत असे.तत्कालीन नाचनवेल,ता. कन्नड या संपूर्ण गावात देखील आदरणीय दाशरथे सरांच्या विषयी एक आदरयुक्त धाक होता.माझ्या वडिलांशी दाशरथे सरांचे विशेष सौख्य होते,कारण माझे वडील देखील खूप स्वयंशिस्तीचे पाईक होते.याच प्रेमापोटी दाशरथे सरांनी त्यांच्या कार्यकाळात एकमेव फक्त माझ्याच वडिलांचे सर्व्हिस बुक स्वतच्या हस्ताक्षरात लिहून दिले होते.आजही माझे वडील ही आठवण आवर्जून सांगतात.त्या सर्व्हिस बुक चे झेरॉक्स पाने आजही एक आठवण म्हणून आम्ही जपून ठेवले आहेत.
असेच एके दिवशी जि.प.माध्यमिक शाळा नाचनवेल,ता. कन्नड शाळेतील प्रत्येक शिक्षक आपापल्या वर्गात अध्यापनात मग्न होते.आदरणीय दाशरथे सर,आपल्या मुख्याध्यापक कार्यालयात ,कार्यालयीन कामकाज पाहत बसले होते.इतक्यात......
शाळेतील शिपाई धावत धावत दाशरथे सरांच्या कार्यालयात गेला अन् दुःखद स्वरात म्हणाला...
" गुरुजी, एक दुःखद बातमी आहे..!"
आदरणीय दाशरथे सरांनी त्या शिपायाला विचारले..
" काय बातमी आहे..?"
शिपाई - " गुरुजी, तुमच्या पत्नीचे निधन झाले आहे; तुम्हाला लगेच घरी बोलावले आहे..!"
दाशरथे सरांनी मोठा दीर्घ श्वास घेतला अन् आपल्या हातातील घड्याळाकडे पाहत करारी अन् नेहमीच्या शिस्तीच्या आवाजात शिपायाला म्हणाले..
" शाळा सुरू आहे अजुन..! शाळा सुटायला अजुन तीन मिनिटे बाकी आहेत..! आणि मी लगेच शाळेतून नियमबाह्यपणे घरी जाणे योग्य नाही.मी लगेच घरी आलो म्हणजे माझी पत्नी लगेच काही जिवंत होणार देखील नाही..! माझी सेवा अजुन शाळेत सुरू आहे, शाळा सुटली की,मी घरी येतो..! तू ,तसा निरोप दे..!"
शिपाई स्तब्ध होऊन पाहतच होता.
अखेर शिपाई कार्यालयाच्या बाहेर आला अन् हा संपूर्ण प्रसंग माझ्या वडिलांना सांगितला..!अखेर शिपाई ,घरी निरोप देण्यासाठी निघून गेला.
अखेर शाळा तीन मिनिटांच्या नंतर सुटली.आदरणीय दाशरथे सरांनी दुसऱ्या शिपायाच्या उपस्थितीत संपूर्ण शाळेतील सर्व वर्गांना कुलूप लावले अन् मग आपल्या घरी ,आपल्या धर्मपत्नीच्या अंत्यविधीसाठी गेले.
त्याकाळी आदरणीय दाशरथे सरांच्या या प्रसंगाची संपूर्ण कन्नड तालुक्यात उच्च कोटीच्या मूल्यांची आदराने सर्वत्र चर्चा झाली होती..! " सेवा हाच परमोधर्म " मानणारी माणसं ही..!
असाच काहीसा सांधर्म्य असणारा भावूक प्रसंग उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री वंदनीय योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यात काल घडला.योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. ही बातमी योगीजी यांच्या कानावर गेली.त्यांनी सध्याच्या कोरोना आजारामूळे आपल्यावर असलेल्या उत्तरप्रदेश मधील जनतेच्या सेवेच्या जबाबदारीमूळे ,वडिलांच्या अंत्यविधीला जाऊ शकले नाही..! योगीजी यांनी आप्तस्वकीयांच्या सेवा पेक्षा जनता जनार्दनाच्या सेवेला प्रथम प्राधान्य दिले..!
" सेवा हाच परमोधर्म " हे ब्रीद मानून आयुष्य व्यतीत करणारी माणसं याच भारतमातेच्या भूमीवर जन्माला आलेली आहेत..! अशा अनेकानेक महान भारतीयांमूळे
आपल्या भारतीय संस्कृतीची पताका तिच्यातील मुल्यांमूळे सदैव फडकत आलेली आहे..!
वंदे मातरम्..!
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक : २१ एप्रिल २०२०, मंगळवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा