मला प्रवासात भेटलेली माणसं
" मन हरण करणारा प्रिय मित्र- मनोहर..! "
===================================
जि.प.शिक्षक म्हणून प्रथम नेमणूक आदेश जून १९९५ मध्ये हाती आला अन् पाहिलं नोकरीच गाव मिळालं जि.प.प्रा.शा. जळगाव, केंद्र - लासुरगाव,ता. वैजापूर...! जळगाव,आमच्या पालखेड गावाच्या शेजारचे गाव.त्यातल्या त्यात तिथं माझे काही वर्गमित्र अन् बरेच क्रिकेट खेळातील प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू मित्र देखील होते.त्यामुळं परिचय होताच..! मात्र आमच्या शाळेचे जे केंद्राचे गाव होते तिथं असे खूप जवळचे वाटावे असे मित्र नोकरी लागताना नव्हते.
इ. स.१९९५ ते जवळ जवळ इ. स.२००५ पर्यंत केंद्र पातळीवर व केंद्रांतर्गत गट संमेलने होत असायची. सर्व शिक्षकांच्या मासिक बैठका होत असल्याने सर्वांशी भेटीगाठी होत होत अनेक शिक्षक मित्रांचा माझ्या आयुष्यात मित्र म्हणून प्रवेश झाला होता. या कारणाने लासुरगाव केंद्रांतर्गत आम्ही सर्व शिक्षक एकमेकांना भेटायचो अन् मित्रत्वाचे नाते अजून गडद होत होत गेले. गट संमेलने असो किंवा सर्व शिक्षकांची मासिक बैठक, आमचा भेटीचा केंद्रबिंदू होते लासुरगाव..! या सगळ्या शिक्षक मित्रांमध्ये आई दाक्षायनी मातेच्या आशीर्वादाने असा एक बिगर शिक्षक मित्र लाभला जो नेहमी घरातला एक सदस्यच वाटत होता.हा असा आम्हा सर्व शिक्षकांचा दिलदार मित्र होता, त्याच्या गोड सहवासासाठी आम्ही सर्व शिक्षक प्रचंड आतुरलेले असायचो..!
तो गोड साखरी सारखा मित्र होता प्रिय मनोहर काळे..!
प्रिय मनोहर..!
याच्या नावातच मनोहर होते अन् या मित्राचा स्वभाव देखील सर्वांचे मन हरण करणारा असाच होता..! प्रिय मनोहर ,याचे लासुरगाव येथे चहाचे हॉटेल होते.आम्हा सर्व शिक्षकांचं बसण्याचं हक्काचं ठिकाण..! अर्थात मी चहा पीत नसलो तरी याच्या हॉटेल मधील एक कप दुधाचा हक्काचं गिऱ्हाईक..! आमच्या बहुतांशी शिक्षक मित्रांचे कोणतेही सरकारी कागदपत्रे असो,ते विश्वासाने ठेवण्याचे ठिकाण,याच मित्राचं हॉटेल..!आम्ही तत्कालीन लासुरगाव केंद्रांतर्गत सर्व शिक्षक मित्र, प्रिय मित्र मनोहरच्या कुटुंबातील सदस्यच होतो.त्याची गोंडस मुले व भाऊ आमच्या सहवासात मनमोकळ्या गप्पा मारत खेळत आपला आनंद व्यक्त करायची..!
मी आणि प्रिय मनोहर ,एकमेकांना एकेरी भाषेतच नामोल्लेख करून हाक मारायचो एवढी अनौपचारिक मित्रत्वाची नाती निर्माण झाली होती.कधी कधी प्रिय मनोहरच्या तोंडातून " सर " शब्द आला तर पुन्हा दुरुस्ती करून " नंदन " असा प्रेमळ नामोल्लेख यायचा..!
डिसेंबर २००० पर्यंत माझे लग्न झालेले नसल्याने मी त्याकाळी कधीमधी मुक्कामी लासुरगाव येथील नितिन पगार,दादा बच्छाव, प्रकाश त्रिभुवन, गणेश तायडे या प्रिय शिक्षक,ग्रामसेवक मित्रांच्या रुममध्ये मुक्कामी थांबायचो.त्यामुळं खूप उशिरा पर्यंत मनोहरच्या हॉटेल वर मैत्रीच्या गप्पा मारायची एक वेगळीच मज्जा यायची..! एकदा रात्री १० वाजेनंतर, भर पावसात मला मोटार सायकल वर लासुरगाव येथून पालखेड येथे सोडण्यासाठी हाच प्रिय मित्र मनोहर आला होता..!
ज्यावेळी माझे लग्न जमले,त्यावेळी लग्नाला येण्यासाठी जी वाहनं लागणार होती त्याची काही जबाबदारी याच माझ्या मित्राने घेतली होती. माझे लग्न कोपरगाव तालुक्यात ठरले होते.मला एक दिवस अगोदरच हळदी करिता जायचे असल्याने सर्व मित्रांना लग्नाच्या
पुढे घालून आणण्याची मित्रत्वाची जबाबदारी याच प्रिय मित्र मनोहरने घेतली होती.मला त्यावेळी प्रिय मित्र मनोहर म्हणाला होता..
" नंदन, तू काही टेंशन घेऊ नको,मी सगळ्यांना हाकून आणतो..!"
प्रिय मनोहरने माझ्या लग्नात सगळ्या शिक्षक मित्रांना पार दमूस्तर नाचायला भाग पाडले होते.लग्नाची घटिका जवळ येत होती अन् ही मित्र मंडळी अजून जोर जोरात नाचत होती..! अर्थात याचे संपूर्ण श्रेय प्रिय मित्र मनोहरच्या अती उत्साहाला होते..!😊
मी लासूर स्टेशन येथे राहत असताना देखील महिना,पंधरा दिवसाला घरी येऊन नक्की भेटून जायचा..! मात्र नाते तेच अनौपचारिक मैत्रीचे होते नंदन अन् मनोहरचे..! काळाच्या ओघात प्रिय मित्र मनोहर लासुरगाव ग्राम पंचायतचा सन्माननीय सदस्य झाला.काही दिवसानंतर याच आनंदाच्या भरात लासूर स्टेशन येथील माझ्या घरी तोच प्रिय मित्र मनोहर पेढे घेऊन आला होता. त्यावेळी त्याला झालेला आनंद हा सर्व सामान्य समाजातील,बहुजन समाजातील माणसांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे प्रतिनिधित्व करत होता..! भारतीय संविधानाने दिलेल्या राजकीय स्वातंत्र्याचा तो विजय दिवस होता असे मला राहून राहून वाटत होते..!
मात्र............
नियतीच्या मनात आमच्या या मित्राचे सुख व आनंद पहावला गेला नाही.आणि......
दुचाकी अपघातात आमच्या या खूप जिवलग मित्राला नियतीने हिरावून घेतले..! नियतीने एका प्रेमळ स्वभावाच्या मित्राला,माणसाला इतक्या लवकर का हिरावून घेतले हे अनाकलनीय आहे..! प्रिय मित्र मनोहर याच्या अंत्ययात्रेत सहभागी प्रत्येक माणूस हळहळ व्यक्त करत होता.
लासुरगावातील एक उभरते नेतृत्व नियतीने आपल्या कडे बोलावून घेतले होते..!
नियतीने एक सच्चा मित्र कायमचा आमच्यातून हिरावून घेतला होता..!
नियतीने सर्व सामान्य परिस्थितीतून वर आलेल्या एका सुस्वभावी माणसाला आपल्याकडे कायमचे हिरावून घेतले होते..!
नियतीने साखरेच्या पाकासारखा गोड मित्र ,मित्रत्वाच्या नात्यातून कायमचा हिरावून घेतला होता..!
लासुरगावातील एक अजातशत्रू माणूस ,नियतीने कायमचा आपल्यातील हिरावून घेतला होता..!
आणि माझ्या लग्नाचा साक्षीदार,माझ्या लग्नातील आनंदाचा साक्षीदार प्रिय मित्र मनोहरला ,त्याच नियतीने आपल्याकडे कायमचे हिरावून घेतले होते..!
नियती एखाद्या साध्या सरळ ,निगर्वी,प्रेमळ ,अजातशत्रू अशा नानाविध सद्गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या माणसाला का इतक्या लवकर हिरावून नेत असेल...?
नियती इतकी निष्ठूर का होत असावी..?
याची उत्तर त्याच जगाच्या नियंत्याला अन् त्याच नियतीला माहीत असावी..!
मात्र आज मला अन् माझ्या समकालीन शिक्षक मित्रांना जवळ जवळ २५ वर्ष सेवेला झाली आहे. आमच्यातील तत्कालीन प्रत्येक शिक्षक वेगवेगळ्या जिल्ह्यात ,तालुक्यात ,गावात शिक्षक म्हणून नोकरी करत आहेत. मात्र मी खात्रीने सांगतो की, प्रिय मित्र मनोहर काळे सारखा शिक्षक नसलेला एवढा अनौपचारिक मित्र आमच्या सर्वांच्या आयुष्यात होणारच नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे..!
आज प्रिय मित्र मनोहर काळे याचा मुलगा प्रिय गणेश मनोहर काळे,ग्राम पंचायत लासुरगावचा सदस्य आहे.माझी अन् गणेशची कधीही भेट झाली तर एक वडीलधाऱ्या व्यक्तीच्या नात्याने त्याची विचारपूस नक्कीच करतो.
वंदे मातरम्...!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक : १ एप्रिल २०२०, बुधवार



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा