रविवार, १२ एप्रिल, २०२०

" बेटा अक्षय...! "





मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" बेटा अक्षय...! "
=============================

लासूर स्टेशन येथील माझ्या तब्बल १६ वर्षाच्या प्रदीर्घ वास्तव्यात   ऐन तारुण्यातील मुलांपैकी ज्या मुलाचा खूप भावूक अन् शांत स्वभाव मला भावून गेला तो हाच अक्षय जगन्नाथ बारसे...!
मला हा प्रिय अक्षय बेटा खूप खूप आवडतो..तो त्याच्यातील निगर्वी, निर्व्यसनी अन्  नम्र  स्वभावामुळे..! लासूर स्टेशन येथील माझ्या वास्तव्याच्या कालावधीत असताना किंवा आता जरी कधी भेटला ...माझे लक्ष असो अथवा नसो त्याचे एक काम हा न चुकता करत आलेला आहे अन् ते म्हणजे..मला पाहून आवर्जून
" वंदे मातरम् सर...!" अशी नम्रपूर्वक साद घालणे..!त्यात एक त्याचे प्रेम जाणवते..आपुलकी जाणवते.. संस्कार जाणवतात..!

 विश्वनाथ फूट वेअर , लासूर स्टेशन हे दुकान हा खूप छान प्रकारे चालवतो. कधी कधी याच्या प्रेमळ हट्टामुळे मला हा आधुनिक पादत्राणे हक्काने देतो...! त्यात त्याचे प्रेम अन् प्रेमाचा हक्क जाणवतो..! अशावेळी त्याचे एकच बोलणे असते ..
" सर, थोडी मॉडर्न स्टाईल वापरा हो...!"
त्याच्या या मॉडर्न स्टाईल च्या आग्रहाने मलाही चिरतरुण झाल्यासारखे वाटते अन् घेतो..त्याच्या प्रेमळ आग्रहाच्या वस्तू..मॉडर्न होण्यासाठी..! माझ्या लासूर स्टेशन येथील तब्बल सोळा वर्षांच्या वास्तव्याच्या काळात ,प्रिय अक्षयची दुकान सोडून इतर कोणत्याही दुकानात कधीही , माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी चप्पल, बूट खरेदी केले नाही,अपवाद फक्त एकदाच..! फक्त एकदाच दुसऱ्या एका फूट वेयर दुकानातून चप्पल घ्यावी लागली होती..! त्याचं कारण त्या दुसऱ्या एका प्रिय दुकानदाराने मला खूप खूप विनंती केली होती की,
" सर,एकदा तरी,आमच्या दुकानातून नवीन चप्पल विकत घेऊन पहा..!"
त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रिय अक्षयला भेटलो अन् त्याला सांगितले की, मी एकदाच संबंधितांकडून नवीन चप्पल विकत घेणार आहे, तू नाराज होऊ नको..!
यावर प्रिय अक्षय म्हणाला होता..
" नाही हो सर..! तुम्ही घरची माणसं आहात..! बिलकुल घ्या..!"
 तब्बल १६ वर्षाच्या माझ्या लासूर स्टेशन येथील वास्तव्याच्या काळात तीच एकमेव अन् एकदाच नवीन चप्पल प्रिय अक्षयची दुकान सोडून इतरत्र विकत घेतली होती..! बाकी याच्याशी व याच्या दुकानाशी निस्सीम प्रामाणिक राहिलो..!

याची जेंव्हा जेंव्हा भेट होते..तेंव्हा तेंव्हा याच्यातील माणुसकीचे अन् नम्र स्वभावाचे दर्शन मला नक्कीच जाणवते..!हा तसा स्वभावाने खूप हळवा आहे. त्याच्या अंतर्मनात खूप गहिवर आहे. त्याचे अंतर्मन आतून खूप ओलसर आहे याची मला जाणीव आहे.बऱ्याचदा त्याच्या बोलण्यातून तसे जाणवते..अन् अशी माणसं मनाने खूप सच्ची असतात..! मला अशी माणस खूप भावतात..! मी मागे याच्या समक्ष त्याचे काका,विश्वनाथ भाऊ बारसे यांना नम्रपुर्वक सांगितले होते की,
" आमच्या अक्षय  बेटाची खूप काळजी घ्या..खूप गोड ,नम्र स्वभाव आहे त्याचा..!"
यावर विश्वनाथ भाऊ म्हणाले होते की,
" सर, तुमची मुलं आहेत ही...! यांच्यासाठी हे सगळं काही आहे..! कधीच प्रेमात अंतर पडणार नाही..!"
विश्वनाथ भाऊ बारसे यांनी आपल्या या दोन्ही पुतण्यांना सख्ख्या मुलांपेक्षा  जास्त जीव  लावला आहे..! खूप चांगल्या स्वभावाचे व्यक्तिमत्त्व आदरणीय विश्वनाथ भाऊ..!
प्रिय अक्षयला अजुन एक मोठा, पण याच्याच वयासारखा दिसणारा मोठा भाऊ आहे..त्याचे नाव गौरव..!  (वरील छायाचित्रात प्रिय अक्षयच्या डाव्या बाजूला बसलेला आहे ) तोही खूप नम्र स्वभावाचा आहे ..! हे दोघे भाऊ, भाऊ या नात्यापेक्षा  मित्र म्हणूनच जास्त सदैव असतात..!

माझा अक्षय बेटा...!

तू सदैव माझ्या सोबत असतो...आठवणीतून...अन् तुझ्यातील चांगुलपणातून..! आज दिनांक २५/१२/२०१८ रोजी तू हक्काने फोन करून मला दुकानावर बोलून घेतले अन् मायेचे दोन शब्द बोललास खूप बरे वाटले..! वास्तविक मी आज लासूर स्टेशन येथे ज्या वेळी मी जितू भाऊ  जैस्वाल टेलर  यांच्याकडे बसलेलो होतो मला तुझ्याकडे यायचेच होते पण तुझाच फोन आला.ज्या प्रमाणे माझ्या माजी विद्यार्थ्यावर मी लिहिलेल्या लेखात वर्णन केलेल्या बबन च्या  फक्त आठवणीने त्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले अगदी तसेच आजही तुझ्याकडे मी येणार तितक्यात तुझाच फोन आला..! नियती मनाची भाषा  प्रेमाच्या माणसांना एकमेकांना ऐकवत असते ती अशी...!

आपलं माणुसकीचं प्रेम हे कुणावरही नाही येत..!ते अशाच ठिकाणी अगदी अंतर्मनातून येते, जिथं सर्व प्रकारच्या संवेदना सहजपणे जाणवतात..! प्रिय अक्षय खूप हळवा आहे..! याच जाणिवेतून प्रिय अक्षय ,हा मला अगदी मनापासून भावतो..!

काळजी  घे बेटा अक्षय..!

वंदे मातरम्...!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन: दिनांक २५ डिसेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा