चिंतन ©️
" फेसबुक अन् मी..! "
=================================
मला पूर्वीपासून वाचनाची जाम आवड होतीच,पण वाचनाच्या नंतर जाणवणारे आत्मअभिव्यक्तीचे भाव व्यक्त करायचं हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होत नव्हते. अखेर मार्क झुकेरबर्ग नावाचा आधुनिक युगातील प्रसारमाध्यमांचा देव माणूस,पावला अन् एक सुंदर असं फेसबुक सारखं नितातसुंदर व्यासपीठ लिहिण्यासाठी उपलब्ध झाले.
मी माझे हेच एकमेव फेसबुक खाते २०१२ मध्ये सुरू केले.अर्थात हे फेसबुक खाते माझ्या साल्याने ऑनलाईन पद्धतीने सुरू करून दिले होते, तो पर्यंत मी याबाबतीत निव्वळ अक्षरशून्य. होतो. याबाबतीत माझ्या साल्याचे नितांत ऑनलाईन उपकार आहेत माझ्यावर..!
(आम्ही मराठवाड्याची माणसं " साला किंवा साले किंवा साली " हा शब्दप्रयोग नात्याच्या अनुषंगाने वापरत असतो.वाकड्यात घुसणाऱ्यांना हा शब्दप्रयोग शिवी वाटायचा नाहीतर..!😊 )
असो,
फेसबुक सारखं एवढं सुंदर अन् सुरेख व्यासपीठ तेही ऑनलाईन पद्धतीने आपल्या भावनांना, विचारांना व्यक्त करण्याचं मिळाल्याने मी जाम खुश झालो होतो.मात्र फेसबुकचा देव - मार्क झुकेरबर्ग यांच्या नावाला बट्टा लागणार नाही याबाबतीत स्वतः साठी काही फेसबुक आचारसंहिता स्वतः हुन आखून घेतली.
ती पुढीलप्रमाणे -
उदाहरणार्थ -
१) जेंव्हा शाळा सुरू असते तेंव्हा ' शालेय अध्यापनाच्या वेळात ' फेसबुक अजिबात न वापरणे,
२) माझ्या फेसबुक भिंतीवर माझ्याच जन्मदिनाच्या निमित्ताने इतरांच्या मार्फत होणारा शुभेच्छांचा वर्षाव न होऊ देणे. त्यामुळं माझ्या फेसबुक भिंतीवर शुभेच्छा संदेशांची ट्रॅफिक जाम होत नाही.
३) जास्तीत जास्त समाजप्रबोधनाचे भाष्य छोट्या स्वरूपात व्यक्त करणे,काही बौध्दीक वाचनीय उपक्रम घेणे आणि ज्यावर चिंतन,मनन करावं वाटतं त्यावर लेख लिहून
" चिंतन " या सदराखाली माझ्या ब्लॉगवर लिखाण करणे,
४) समाजातील जे सर्व सामान्य माणसं ,पण माझ्या दृष्टीने जे असामान्य आहेत त्यांच्या विषयी, प्रवासातील काही वैशिष्ट्यपूर्ण भेटलेली अपरिचित माणसं व ज्यांचा प्रत्यक्ष माझ्या आयुष्यात कोणत्यातरी निमित्ताने भावूक,प्रेमळ संबंध आलेला आहे फक्त अशाच माणसांच्या विषयी
" मला प्रवासात भेटलेली माणसं " या सदराखाली माझ्या ब्लॉगवर लिखाण करणे.
५) माझं माझ्या जन्मगावावर नितांत प्रेम आहे. आमच्या पालखेड गावातील काही माणसं माझ्या दृष्टीने जगाला हेवा वाटावा अशी ग्रेट आहेत. ही तीच सर्व सामान्य माणसं आहेत ज्यांना कधीही आत्मप्रसिध्दीची गरज वाटली नाही, त्यांना कोणत्याही प्रसारमाध्यमांनी प्रसिध्दी दिली नाही. यातील खूप ग्रेट असणारी अन् ज्यांचा प्रत्यक्ष माझ्या आयुष्यात कोणत्यातरी निमित्ताने भावूक प्रेमळ संबंध आलेला आहे अशा आमच्या पालखेड गावातील ग्रेट माणसांवर ,
" आमचे गाव आमची माणसं " या सदराखाली माझ्या ब्लॉगवर लिखाण करणे.
६) मी मुळातच रसिक..! आमच्या पालखेड गावातील प्रत्येक व्यक्ती रसिकमनाची असल्याने त्याच रसिकतेच्या वारसा हक्कामूळे कलेवर नितांत प्रेम करणारे आम्ही..! याच रसिकप्रेमापोटी अधून मधून गाणी, इत्यादी रसिक मनाला प्रफुल्लित करणारं काहीतरी छानसं पोस्ट करणे,
७) फेसबुक मित्रांची निवड खूप चोखंदळपणे करणे, आकस ठेवून टीका टिप्पणी करणारे,द्वेष निर्माण करणारे इत्यादींना एकतर अन्फ्रेंड करणे किंवा अशांच्या फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारणे, कदाचित यामुळेच माझी फेसबुक मित्र यादी मोजकी असेल..!
८) माझा फेसबुक प्रोफाइल फोटो शक्यतो एकच असू देणे. अपवाद फक्त काही दिनविशेष असेल, काही नैमित्तिक कारण असेल, काही प्रासंगिक असेल तरच तेवढ्या कालावधी पुरता फेसबुक प्रोफाईल फोटो काही काळासाठी बदल करणे. सदरील दिनविशेष, नैमित्तिक अन् प्रासंगिक कारण कालावधी संपला की, पुन्हा मूळ प्रोफाइल फोटो अपडेट करणे.
८ ) आणि सर्वात महत्वाचे -
मानसशास्त्रीय दृष्ट्या ,आपल्या मनाला प्रफुल्लित करणाऱ्या पोस्ट अधून मधून फेसबुकवर अपलोड करणे.सतत सतत एकाच भूमिकेत राहिल्याने ,समोरच्याला मानसिक थकवा,चिडचिड येणे साहजिक असते. त्यामुळं जिभेवरील लाळग्रंथींमधून स्राव टपकेल अशा खाद्य पदार्थांच्या पाककृती पोस्ट करणे..! माझ्या मते या संपूर्ण पृथ्वीवर शाकाहारी पदार्थच असे एकमेव घटक आहेत की,ज्यांच्यावर सगळी माणसं जीवतोडून प्रेम करतात.त्यामुळं सर्व लोकांना एकत्र आणण्याचा तो एक चवदार प्रयत्न असतो माझा..! शैक्षणिक मानसशास्त्रात यालाच
" चेतक बदल " असे म्हणतात..!
मी फेसबुक हाताळण्यासाठी वरील प्रमाणे स्वतः ला आचारसंहिता लावून घेतली आहे.
माझ्या सारख्यांवर मार्क झुकेरबर्ग भाऊचे लई ऑनलाईन उपकार आहेत.याच ऑनलाईन देव माणसामुळे माझ्या सारख्या खेड्यातील एका माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ऑनलाईन आनंद घेता आला अन् बऱ्याच प्रमाणात इतरांनाही देता आला. माझ्या मते फेसबुक जर आपण अतिशय सुरेख अन् संयमीत पध्दतीने हाताळले तर ऑनलाईन स्वर्गात गेल्याचा आनंद नक्कीच मिळतो. हा माझा स्वानुभव आहे..!🙏😊🌹
वंदे मातरम्..!
फेसबुक स्वतच्या विशिष्ट आचारसंहितेत हाताळणारा : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : १९ एप्रिल २०२०, रविवार



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा