चिंतन
" महाभारत : एक पथदर्शक सांस्कृतिक ठेवा..!"
==================================
परवा दिनांक ७/४/२०२० रोजी दुपारी १२ वाजता दूरदर्शन DD भारती चँनेलवर सुरू झालेली महाभारत ही लोकप्रिय मालिका आम्ही सहपरिवार पाहत होतो.इतक्यात लाईट गेली,अन् मालिका पाहण्यात खंड पडला.मात्र लगेच मुकेश भाऊ अंबानी मदतीला धावून आले अन् मोबाईल वर जियो टीव्ही सुरू केली अन् पुन्हा महाभारत पाहण्याचा आनंद घेऊ लागलो.
महाभारत
" यात जे जे आहे तेच अन्यत्र आढळेल, यात जे नाही ते अन्यत्र मिळणार नाही..!" महर्षी व्यास
( संदर्भ - प्राचीन भारत, ले. डॉ.धनंजय आचार्य)
या वरील एकाच वाक्यावरून महाभारत या आपल्या प्राचीन भारतातील आर्षकालीन सांस्कृतिक ठेव्याचे महत्त्व सहजपणे लक्षात येते.
समस्त मानवजातीला उपयुक्त ठरेल असे प्रत्येक पात्र यातून आपल्याला बोध देत असते.
महाभारतात क्षत्रियांचा वंशवाद अन् त्यातून व्यक्त होणारा विकृत अभिमान आहे..!
महाभारतात जातीयवाद अन् त्याला बळी पडलेले सर्वोत्कृष्ट उपजत गुण आहेत..!
महाभारतात स्री सौंदर्याकडे पाहून भ्रमित अन् उध्वस्त होणारी पुरुषप्रधान संस्कृती आहे..!
महाभारतात स्वतच्या तत्वनिष्ठांपायी ,उघड्या डोळ्यांसमोर उध्वस्त होणारं कुटुंब आहे..!
अंधप्रेम व त्यातून निर्माण होत जाणारी संकुचित प्रवृत्ती आहे..!
महाभारतात मोह, त्याग,प्रेम,वात्सल्य,क्रौर्य, वासना,सेवा, समर्पनवृत्ती, एकनिष्ठा,एकाग्रता,मानसिक कुचंबणा,कर्तव्यपरायणता इत्यादी सर्व गुण अवगुण यात आहेत..!
महाभारतात स्री जातीची होणारी घुसमट,व्यथा,सौंदर्याचा अहंकार देखील आहे..!
महाभारतात संपूर्ण सृष्टीतील पहिला सर्वार्थाने विद्वान पुरुष अन् आपल्या मानवी आयुष्याचे खरे विवेचन करणारा युगपुरुष युगंधर देखील आहे..!
याच युगपुरुषाच्या , युगंधराच्या सिद्धांतावर तिथून पुढे अनेकानेक तत्त्वचिंतक, धर्म,धर्म संस्थापक, पंथ, पंथ संस्थापक इत्यादी जन्माला आले..!
फक्त या सर्वांची नावे भिन्न भिन्न होती,मात्र वरील उल्लेखित तत्त्वचिंतक, धर्म,धर्म संस्थापक,पंथ,पंथ संस्थापक इत्यादींचा मुख्य वैचारिक प्रेरणास्रोत प्रत्यक्षपणे/ अप्रत्यक्षपणे युगपुरुष युगंधरच होता..!
भले आज कुणीही मान्य करो अथवा न करो..! मात्र सूर्य प्रकाश जसा स्वच्छ आणि सत्यता दर्शवितो, अगदी तसेच युगपुरुष युगंधराचे बौध्दीक तत्वविवेचन येणाऱ्या पुढील मानवी पिढ्यांना अनेकजण भिन्न भिन्न धर्म,पंथ स्थापून देत राहिले..! काळाच्या ओघात त्यात भर पडत गेली मात्र,या सर्वांचा प्रारंभबिंदू युगपुरुष युगंधरच होता..!
महाभारत हे भारतीय धर्म,नीती, सदाचार,विविध मानवी घटकांचे सूक्ष्म मानवी स्वभावांचे विवेचन आणि सर्वांना
जिव्हाळ्याचा वाटणारा विषय म्हणजे राजकारण याचा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक ठेवा आहे..!
आम्ही बालमित्रांनी बालपणी दुसऱ्याच्या घरी पालखेड येथे टीव्ही वरील बी.आर.चोप्रा व रवी चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेलं महाभारत पाहिलं अन् कलाक्षेत्रातील याच मालिकेच्या प्रेमात पडलो.चोप्रा साहेबांच्या महाभारत मालिकेला डॉ. राही मासुम रझा
यांच्या संवादाने अन् उत्कृष्ट पटकथेमूळे चार चांद लागले..! या मालिकेची सर्वात उजवी बाजू माझ्या मते यातील संवाद आहेत अन् ती किमया साधली डॉ.राही मासुम रझा साहेब यांच्या लेखणीतून..!
एक मात्र नक्की की,सर्व मानवजातीसाठी आपल्या प्राचीन भारतातील आर्षकालीन सांस्कृतिक ठेव्यातील
महाभारत , एक पथदर्शक सांस्कृतिक ठेवा आहे..! फक्त आपण त्यातून काय बोध घेतो हे प्रत्येक माणसाच्या बौध्दीक,मानसिक,भावनिक कुवतीनुसार आहे..!😊🙏
वंदे मातरम्..!
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक - ९ एप्रिल २०२०, गुरुवार.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा