मला प्रवासात भेटलेली माणसं..!
"माझी झालेली आदरयुक्त ग्रेट भेट "
===================================
वेळ,संध्याकाळची..!
दिनांक ,८ एप्रिल २०१८, वार रविवार,
ठिकाण - समर्थनगर,वरद गणेश मंदिर रोड..औरंगाबाद.
मी व माझा थोरला मुलगा चिरंजीव नमन बाबा पेट्रोल पंप कडे लासूर स्टेशनला जाण्यासाठी दुचाकीवर निघालो होतो.मी गाडीवर पुढे गेल्यावर माझ्या नकळतपने पाहण्यात आले आणि माझ्या मनात लगेच प्रश्न आला की
" सर इकडं कुणीकडे चालले आहे..तेही परिवारासोबत..?"
मी पटकन बाजूला गाडी थांबवली.आणि खूप घाई घाईने सरांकडे जाण्यासाठी निघालो.
नमन मला म्हणाला " दादा ,काय झाले..?"
मी उत्तर न देता सरांकडे निघालो. नमन माझ्याकडे आश्चर्यकारक नजरेने पाहत होता.अखेर मी सरांच्या जवळ आलो अन् म्हणालो...
" सर,इकडे कुणीकडे जात आहात तुम्ही..?"
अचानक कुणीतरी आपली आपुलकीने विचारपूस करत असलेले पाहून सरांनी ,माझ्याकडे खूप आनंदित होऊन पाहिले अन् म्हणाले..
" अरे नंदू..! "
" नंदू ..!" अशी हाक कित्येक दिवसानंतर माझ्या कानी पडली होती..! " नंदू " ही हाक ऐकल्यावर कृतार्थतेचे ,आत्मिक समाधानाचे भाव माझ्या मनात उमटले. आपल्या आयुष्यात आपल्याला उद्देशून काहींनी केलेली काही संबोधने आपल्या ह्रदयात कोरून ठेवलेली असतात..! जसे आज सरांकडून ऐकायला मिळाले " नंदू..!"
माझ्या समोर माझ्या आयुष्याला विशेषकरून प्राथमिक शाळेत असताना ज्या महान शिक्षकाने कलाटणी दिली होती,ते सदा सर्वदा वंदनीय आदरणीय गोमलाडू (राजपूत) सर उभे होते.
नमन त्याच पूर्वीच्या मुद्रेने पाहत होता.मी त्याला सरांचा परिचय करून दिला..
" नमन,हे आमचे सदा सर्वदा वंदनीय सर.. गोमलाडू सर..! सरांनी आम्हाला ,पालखेड येथे इ.५ वी ते ७ वी पर्यंत इंग्रजी विषय शिकविलेला आहे..!"
आदरणीय सरांसोबत त्यांच्या धर्मपत्नी , माझी गुरु माता देखील होत्या.मी व नमन ने सरांचे व गुरु माताचे दर्शन घेतले.
सुरुवातीला सरांनी नकार दिला,पण मी सरांना म्हणालो की,
" सर,आजकाल दर्शन घ्यावे असे खूपच कमी पाय शिल्लक राहिले आहेत..! आणि जे शिल्लक आहेत ,त्यांनी जर नकार दिला तर मग माझ्या सारख्यांनी दर्शन घ्यावे कुणाचे..?"
माझा दर्शनाचा हट्ट सरांनी व गुरु माता यांनी पुरविला. मी सरांना म्हणालो, " सर,तुमच्यासारखे गुरु लाभणे माझे व माझ्या सारख्या,तुमच्या अनेक विद्यार्थ्यांचे नशीबच म्हणावे..!"
यावर आदरणीय गोमालाडू सर लगेच म्हणाले की,
" अरे नंदू,माझ्यासारखे शिक्षक ,बऱ्याच जणांना आवडत नव्हते..!"
मी म्हणालो, " अहो,सर ते खूप दुर्दैवी असतील,त्यांना तुमची प्रखर शिस्त आवडली नसेल..आणि सर तुम्ही जी प्रखर शिस्त आम्हाला शिकवली,त्याचाच हा परिणाम आहे की,आम्ही स्वतच्या आयुष्यात काहीतरी शिस्तीत करू शकलो..!"
हे ऐकुन सरांना खूप आत्मिक समाधान झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवले.
आदरणीय गोमलाडू सर...! एक अतिशय शिस्तीचे थोर व्यक्तिमत्त्व. असे व्यक्तिमत्त्व,ज्यांनी उभ्या आयुष्यात शिस्त व मुलांना शिकविण्याप्रती प्रामाणिकपणा जपला. सरांच्या समकाळात आमच्या संपूर्ण वैजापूर तालुक्यात शिस्त व प्रामाणिकपणा यात दोन वंदनीय व्यक्तिमत्त्वांचा आवर्जून उल्लेख व्हायचा..एक आदरणीय गोमालाडू सर..व दुसरे माझे वडील तीर्थरूप व्ही.सी.जाधव सर..! या दोन महान शिक्षकांनी आपली शाळा, विद्यार्थ्यां करिता स्वतःला पार झोकून दिले होते. यांनी कधीच कोणत्या पुरस्काराची ,कुणाच्या बेगडी कौतुकाची तिळमात्र अपेक्षा बाळगली नव्हती. आपल्या सेवेलाच " पुरस्कार " मानून यांनी समर्पण वृत्तीने सेवा केली होती.
जी माणसं,शिस्तीची असतात,प्रामाणिक असतात,ती बऱ्याचदा बऱ्याच जनसमूहात लोकप्रिय नसतात. मुळात अशा शिस्तीच्या थोर माणसांना ,आपले कुणीतरी कौतुक करावे. किंवा आपले कुणीतरी कौतुक सोहळे करावे हेच मुळी मान्य नसते. आपल्याकडून होणारी सेवा ,समर्पण यालाच सर्वोच्च पुरस्कार मानून व्रतस्थ आयुष्य जगणारी ही थोर माणसं.
आदरणीय गोमलाडू सर,आमच्या पालखेड गावाजवळच असलेल्या बेंदवाडी येथून सायकलवर यायचे. शाळेत आल्या..आल्या वर्गात..! लगेच आम्हाला काल दिलेल्या इंग्रजी शब्दांचे पाठांतर घ्यायचे. जो ,चुकला,त्याला हमखास शिक्षा व्हायचीच. त्या आदरयुक्त धाकापोटी मी किंवा काही मित्र १०० च्या आसपास शब्द पाठ करायचो.
शिक्षणात ,शिक्षा आवश्यक.. का.. नावश्यक हा आजच्या बुद्धिवंतांचा चर्चेचा विषय होऊ शकतो..!पण मी मात्र खात्रीने सांगतो की,आदरणीय गोमलाडू सर ,यांनी आम्हाला,त्याकाळी शिक्षा केली,धाक दिला,म्हणून मी किंवा सरांचे अनेक माजी विद्यार्थी स्वतच्या आयुष्यात स्थिर झालो आहे..हे नक्कीच मान्य करतील.
म्हणतात ना.." मुलांना कुणाचा तरी आदरयुक्त धाक असावा.. मग तो शिक्षेचा का असेना तो जर असला तर ती शिस्तीत राहतात..!तो जर नसेल तर ती सैरभैर होऊ शकतात..!" माझ्या वैयक्तिक आयुष्यात माझ्या तीर्थरूप वडिलांचा खूप धाक होता म्हणून मी माझ्या आयुष्यात सर्व बाबतीत स्थिर राहिलो हे मात्र स्वच्छ पाण्यासारखे खरे आहे.
आदरणीय गोमलाडू सरांच्या आदरयुक्त धाकाने,शिस्तीने आम्ही सर्व त्यांचे माजी विद्यार्थी घडलो..!आज मला सरांच्या शिस्तीचे महत्त्व पदोपदी जाणवते. आज मी सरांच्या जवळ उभा राहून फोटो काढला खरा...पण तो ही भित..भित..! सरांची तीच आदरयुक्त भीती वाटत होती. फोटो काढण्यापूर्वी सरांना म्हणालो होतो,
" सर,तुमच्या सोबत फोटो काढू का..?"
सरांचा होकार आल्यानंतरच मी हा फोटो काढला.
आदरणीय सरांच्या व्रतस्थ सेवेचे फळ ,सरांना मिळाले आहे,त्यांचे चिरंजीव श्री. डॉ.जीवन राजपुत , हे औरंगाबाद येथील नामांकित मेंदुविकार तज्ज्ञ आहेत..! त्यांच्या दवाखान्याचे नाव J J PLUS Hospital आहे. आदरणीय गोमलाडू सर,आता औरंगाबाद येथे राहतात.
शेवटी मी निरोप घेऊन निघालो,सरांनी माझ्या वडिलांची विचारपूस केली..आणि म्हणाले..
" तुझ्या वडिलांचे आणि माझे खूप चांगले जमायचे. काळजी घे, त्यांची..!"
त्यांची काळजी घेण्याविषयी पुन्हा..पुन्हा मला आवर्जून सांगितले.
अशी झाली माझी ग्रेट भेट..!
आदरयुक्त भेट..!
माझ्या गुरूची..!
वंदे मातरम्..!
ता.क.: आजही कोणतीही शिस्त लावायची म्हंटली, की अशा शिस्त लावणाऱ्या अनेक थोर माणसांना विरोध होतोच.ती शिस्त लावतांना,बेशिस्तांना अडचणीची ठरू पाहते..! पण जेंव्हा त्याच शिस्तीला काही काळ लोटू दिल्यावर मग सगळेच त्या शिस्तीचे कौतुक करत असतात.मग ती शिस्त,घरातली असो,शाळेतली असो किंवा देश पातळीवरील असो..!
आदरणीय गोमलाडू (राजपूत) सरांचा माजी विद्यार्थी:
नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव,
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: ११ एप्रिल २०१८, बुधवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा