सोमवार, ६ एप्रिल, २०२०

जय जिनेंद्र, बालमित्रा नितीन...!





आमचे गाव आमची माणसं

जय जिनेंद्र, बालमित्रा नितीन...!🙏😊
===================================

" परकीय आक्रमकांच्या आक्रमणांना व अत्याचारांना तोंड देत,
भारतव्यापी हिंदू धर्माशी कधीही वैरभाव न करता,
प्राचीन भारतीय इतिहास काळात बौद्ध धर्माशी कुठल्याही प्रकारे बरोबरी न करता,
संरक्षित वृत्तीच्या जैन धर्माने आपला संयम व शांतता ढळू न देता.....
भारतात आपले अस्तित्व टिकवून धरले...! "

असो,
आज वर्धमान महावीर जयंती..!
त्यानिमित्त सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
विशेष म्हणजे पालखेड येथील आमच्या गल्लीत जैन बांधव यांचे प्रेमळ सहजीवनाचे अमृतानुभव असल्याने वरील अनेक मूल्य खूप जवळून सहवासाने अनुभवता आले..!

माझा खूप जिवलग बालमित्र नितिन जैन ,हा माझ्या आयुष्यातील अनेक सुख- दुःखाचा साक्षीदार..! हा माझा प्रिय बालमित्र खूप समजूतदार आहे,आणि याचा स्वभाव खूपच हळवा,भावूक अन् निर्मळ स्वभाव  आहे..!याच्या सहवासाने  जैन धर्मातील एक मूल्य मी आत्मसात केले अन् ते म्हणजे ब्याळू..!
 ब्याळू याचा अर्थ असा आहे की,संध्याकाळी दिवस मावळतीच्या वेळी जेवण..!
अर्थात पाहुण्यांच्या घरी गेल्यावर, दूरच्या प्रवासात माझ्या जिवलग बालमित्राकडून , जैन संस्कृती मधील हे मूल्य अंगिकारता येत नाही..! मात्र स्वतच्या घरी आवर्जून पाळतो..!ज्याच्याकडे जे चांगलं आहे ते स्वीकारावं भले ते पूर्णतः किंवा  अंशत: जरी असेल तरी काहीच हरकत नाही यावर माझा खूप विश्वास आहे. आम्ही दोघेही जो पर्यंत पालखेड येथे राहत होतो तो पर्यंत श्री. पारेश्वर महादेवाच्या दर्शनाला सोबतच जायचो आणि सोबतच पालखेड गावातील जैन मंदिरात दर्शनालाही सोबतच जात असायचो..!

आम्ही दोघेही पालखेड येथे राहत असताना ,काहीवेळा प्रिय बालमित्र नितिन जैन बरोबर सुट्टीच्या दिवशी बाजारातील कापड दुकानात याला मदत म्हणून जात असायचो..! त्यावेळी नितीन, परिसरातील महत्त्वाच्या खेड्यातील साप्ताहिक बाजारात आपली छोटी कापड दुकान लावायचा..! विशेषकरून बोरसर ,ता. वैजापूर येथील बाजारात गेलेलो होतो. नंतर त्यानं बाजारातील कापड दुकान बंद केले अन् स्वतच्या अंगी असलेली कपडे शिवण्याच्या ( टेलर काम ) कलेच्या क्षेत्रात पदार्पण केले.पालखेड गावात आमच्या आळीत टेलर दुकान सुरू केले. मी शाळेतून आलो की याच्याच दुकानात तासनतास बसायचो.अनेक पुस्तकांचे वाचन याच माझ्या खूप जिवलग मित्राच्या दुकानात झालेले आहे. या मित्राला रेडिओ खूप जीव की प्राण..! कित्येक चित्रपटातील सुमधुर गाणी याच मित्राच्या दुकानात ऐकण्याचा श्रवणीय योग आला..!

मी काही दिवसापूर्वीच  एका परिचित व्यक्तीच्या  फेसबुकवरील बालपणीच्या फोटोवर एक प्रतिक्रिया व्यक्त केली होती.ती प्रतिक्रिया माझ्या या जिवलग बालमित्राच्या अन् माझ्या नात्याला खूप सार्थकपणे लागू पडते..! ती प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे होती...
" बालमैत्री अन् बालमित्र आपल्या आयुष्यातील असा ठेवा असतो,जिथं काहीही लपवून ठेवताच येत नाही..!
सर्वात पारदर्शक नातं,कोणतं असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त बालमित्र अन् त्यांची बालमैत्री...!" 😊

मी माझ्या आयुष्यात फक्त चारच खूप जिवलग बालमित्रांच्या सोबत एक कृती केलेली आहे,अन् ती कृती म्हणजे एकाच डब्ब्यात किंवा स्वतंत्रपणे घेतलेल्या डब्ब्यात  शौचाला उपाख्य परसाकडी   उपाख्य संडासला उपाख्य हागायला जाणे..! आणि ही कृती बालपणी ते तरुणपणा पर्यंत अगदी मोकळ्याचाकळ्या मनाने पालखेड येथे राहत असताना करत होतो. असे ते चार जिवलग बालमित्र म्हणजे विजय गायकवाड ( ह.मु. वैजापूर ),रमेश गायकवाड ( ह. मु. औरंगाबाद ) आणि सोमनाथ गायकवाड (ह.मु. बजाजनगर  ) आणि नितिन जैन..!😊 
अशी कृती तेंव्हाच होते जेंव्हा त्या नात्यात पारदर्शकता असते. मैत्री खूप खोलवर रुजलेली असते..!  माझ्या इतरही बालमित्रांशी पारदर्शक नातं होतं, आहे अन् तहहयात राहील,पण एकाच डब्ब्यात जाणं ,त्यांच्या सोबत कधी योग आला नाही किंवा तेवढी खोली निर्माण झाली नसावी बहुदा..! मी आमच्या नात्यातील निव्वळ बालमैत्री अन् त्यातील ,त्याकाळी आम्ही अनुभवलेला ठेवा व्यक्त केला आहे..! उगीचच तत्कालीन आमच्या कृतीचा आजच्या काळातील स्वच्छता अभियानवाल्यांनी किळस करू नये..! 😊🙏 असे केले तर तो आमच्या तत्कालीन बालमैत्रीचा तो घनघोर अपमान ठरेल..!😊
एकमात्र नक्की आज अशा मैत्री निर्माण होत नसेल का..? बहुदा आजकालच्या बालमित्रांच्या नात्यात मोबाईल अन् तत्सम यंत्रांनी प्रवेश केला असावा म्हणून यदा कदाचित अशी मैत्री निर्माण होत नसेल.अन् जर होत असेल तर ग्रेट..!
( आजकाल अशी बालमैत्री  निर्माण होत नाही याचा अर्थ फक्त एकाच डब्ब्यात शौचाला जाणे असाच एक अर्थ अपेक्षित नाही..! )

आज आमचा हा जिवलग बालमित्र लासूर स्टेशन येथे जितू भाऊ जैस्वाल यांच्या दुकानात एक खूप विश्वासू सहकारी म्हणून कापड शिवणकाम करत आहे.मी जो पर्यंत लासूर स्टेशन येथे राहत  होतो तो पर्यंत जितू भाऊ जैस्वाल यांच्या टेलर दुकानात याच मित्राकडे जाऊन बसलं की,आयुष्यातील अनेकानेक आठवणींना उजाळा मिळायचा..! एकमेकांच्या मानसिक संवेदनांना मनमोकळे करत तासनतास गप्पा मारत बसायचो..!

हिंदू संस्कृतीतील भारतीय मातीत उदयाला आलेल्या जैन पंथातील चोवीसावे तीर्थंकर वर्धमान महावीर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!🌹🙏🏻

वंदे मातरम्..!
जय जिनेंद्र...!

नितिनचा बालमित्र : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव ©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक : ६ एप्रिल २०२० सोमवार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा