#मला प्रवासात भेटलेली माणसं.©️
" अभिष्टचिंतन ..आमची हिरो होंडा स्प्लेंडर..!😊🌹"
===================================
आज दिनांक २८ मे २०१७ रोजी माझ्या Hero Honda Splendor गाडीचा वाढदिवस...!
आज गाडीचे वय १८ वर्ष पूर्ण व १९ वे वर्ष प्रारंभ झाले.
निर्जीव वस्तू मध्ये देखील सजीवत्त्व देवपण शोधणारी आपली हिंदू संस्कृती..! ' हिंदू ' शब्दोच्चार केल्यामुळे काहीजण लगेच कामाला लागतील. माझ्या मते ' हिंदू ' हा शब्दोच्चार भौगोलिक अर्थाने काळाच्या ओघात विकसित होऊन तिथल्या भूप्रदेशातील वास्तव्य करणाऱ्या समस्त लोकांच्या ओळखीचा शब्दोच्चार आहे. काळाच्या ओघात त्याच्याशी अनेकानेक श्रद्धेय बाबी जुळत गेल्या. त्यात अनेकानेक बदल होत गेले, मात्र ' हिंदू ' शब्दोच्चाराचे मूळ भौगोलिक महत्त्व अबाधित राहिले. याच हिंदू संस्कृतीत अनेक पंथ उदयाला आलेत. सजीवांचे पूजन अथवा इतर श्रद्धेय कृती तर अनेकजण करतात, मात्र निर्जीव वस्तू त्यात मग मूर्ती , वाहन अथवा तत्सम इतर निर्जीव वस्तू आल्यात त्यांना श्रद्धेच्या देव्हाऱ्यात ठेवून पूजन करणारी एकमेव संस्कृती याच आपल्या भारतवर्षात बहरली , वृध्दिंगत होत गेली. त्याच श्रध्देचा भाग म्हणून आम्ही आमच्या हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी गाडीचा वाढदिवस अन् त्यानिमित्त पूजन नेहमी करत असतो.
अगदी बरोबर २८ मे १९९९ रोजी साई बाईक्स, साईं कॉर्नर, कोपरगांव येथून खरेदी केली होती. हिच्या बुकिंग करिता सोबत होता,माझा जिवलग बालमित्र विजय वैजिनाथ गायकवाड..! (ह.मु. वैजापूर) अन् हिला कोपरगाव इथून घरी आणण्यासाठी सोबत होता माझ्या जिवलग बालमित्र डॉ. संजय सखाराम राऊत याचा धाकटा भाऊ म्हणजेच माझाही धाकटा भाऊ प्रिय बबलू उपाख्य डॉ.प्रमोद सखाराम राऊत..! तब्बल १८ वर्षाच्या सेवेत गाडीने खूप सहकार्य केले आहे. या दीड तपाच्या कालावधीत माझ्या सरकारी सेवेत येणे-जाणे अथवा कुठे इतरत्र जाण्यायेण्यासाठी या गाडीने जीवापाड साथ आजतागायत दिली आहे. माझ्या आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण क्षणांची ही गाडी " मुक साक्षीदार " आहे. याच हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीचा माझ्या आई वडिलांची सेवा / शुश्रुषा करण्यासाठी एक प्रवासी माध्यम म्हणून उपयोग झाला. या अशा अनेकानेक भावूक आठवणी या दुचाकी वाहनाशी निगडित असल्यामुळे तिचं आमच्या कुटुंबात खूपच सन्मानाचे अन् मायेचे स्थान आहे. याचं कारणांमुळे आमच्या या दुचाकीला विकण्याचे आमच्या स्वप्नात देखील येत नाही.थोडक्यात सजीव अन् निर्जीव यांचे एकमेकांवर निस्सीम प्रेम असल्याने आमचे नाते संजीवन नात्यात घट्ट झाले आहे.
आजही Splendor गाडीची तब्येत ठणठणीत आहे. ती कधी मधी मुकहट्ट करते,पण मी तिच्या मुक भावना समजून घेऊन त्या वेळोवेळी पूर्ण करत आलेलो आहे. नवीन गाडी घेऊ शकलो असतो,परंतु ज्या वाहनाने आजतागायत कोणताही मोठा यांत्रीक त्रास (पंक्चर वगळता) दिलाय नाही तिला विकून नवीन गाडी खरेदी करणे म्हणजे एक प्रकारे या Splendor गाडी विषयी तो " कृतघ्नपणा " ठरला असता. माझ्या कित्येक मित्रांच्या गाड्या आल्या अन् गेल्या सुध्दा..! पण माझी हिरो होंडा स्प्लेंडर अजूनही माझ्या सहवासात सुखाने नांदत आहे. निर्जीव किंवा सजीव यांना निव्वळ माया लावली,तर प्रतुत्तर दाखल भेटणारे प्रेम चिरंजीव असते,हे माझ्या हिरो होंडा स्प्लेंडर गाडीवर असणाऱ्या माझ्या मायेचं फलित आहे.
ज्या तारूण्याने त्याच्या ऐन तरूणपणी आपली काळजी घेतली ते तारुण्य , वार्धक्यात आले म्हणजे त्यांना न विसरणे ही आपली भारतीय संस्कृती. मग ते तारुण्य व वार्धक्य सजीव असो अथवा निर्जीव..! त्यांच्याविषयी आपण " कृतज्ञपणा " दाखवायलाच हवा.
पुनश्च एकदा " Hero Honda Splendor " गाडीचे माझ्या कुटुंबाकडून खूप-खूप आभार, तिने दिलेल्या विनम्र सेवेबद्दल..! आज सकाळी गाडीचे हिंदू धर्मातील प्रथेनुसार आमचे तीर्थरूप वडील, माझी पत्नी, मूलं आणि मी स्वतः पूजन केले. आज त्या निमित्त माझ्या प्रेमळ गाडीला माझा आवडता गोड पदार्थ " गूळ " प्रसाद म्हणून दिला.
ता.क.: कृतार्थ जीवन जगायचे असेल तर कृतज्ञता बाळगायला हवी..छोटछोट्या गोष्टीत..!
|| वंदे मातरम् ||
हिरो होंडा स्प्लेंडर गाडीचा मालक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
स्थळ : लासूर स्टेशन येथील आमच्या घराच्या समोरील परिसर..!
दिनांक: २८ मे २०१७



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा