" गावरान मैत्रीच्या आठवणी "
======================
मित्र...! त्याला वयाचे बंधन अजिबात नसावे. जर मित्राला व त्यातील मैत्रीला वयाचे बंधन आलेच तर..माणसाच्या भावविश्वातील निर्भेळ आनंदाचा अंत होऊन जातो.मी माझ्या या भावविश्वाचा अंत असा कसा होऊन देईन बरं..?
आमच्या लासूर स्टेशन येथील घराच्या शेजारी राहत असलेल्या शेजाऱ्यांकडे त्यांची नातवंडे मे २०१८ च्या उन्हाळ्यातील सुट्टीत आलेली आहेत ,त्यांच्या मामाच्या गावाला..! त्यातील एक आहे अनिकेत शिवाजीराव जगताप व दुसरा अतिशय गोंडस असलेला आर्यन उपाख्य स्वामी दीपक देशमुख पिंपळनेरकर...! हा स्वामी...खरोखर स्वामी आहे..!😊 खूपच चुणचुणीत..स्वामी..!😊 दररोज खेळल्या जाणाऱ्या यांच्या क्रिकेट सामन्यात हा बऱ्याच वेळा फक्त क्षेत्ररक्षकाच्याच भूमिकेत असतो. बहुदा...त्याचा वयोगट पाहून..हे त्याच्या पेक्षा वयाने मोठी असणारे दोन खेळाडू..स्वामीवर ...........
" तू, फक्त..आमचे काम ऐकायचे..! नसता..तुला खेळात घेणार नाही..!" असे प्रेमळपणे धमकावीत असतील..!😊
असे आपल्या काही प्रौढांमध्येही होते का..हो..? नक्कीच होत असेल..फक्त..असे होण्याचे क्षेत्रे भिन्न..भिन्न असतील. स्वानुभव आहे. बाकी काही नाही.
सकाळचे सहा...साडे सहा..सात.. होत नाही तर..ही मंडळी...किंवा..आमचा धाकटा मुलगा.. नयन..एकमेकांच्या दरात जाऊन..मोठमोठ्याने ओरडून..एकमेकांना उठवून..
"चल रे..खेळायला..!" असा पुन्हा..पुन्हा याच आर्त हाकेची पुनरावृत्ती करून..बहुदा "गूळ किंवा साखरझोपेत " असलेल्या अनेक, वयाने मोठी असलेल्या माणसांना उठवून देतात. आणि सुरू होते...अब्बास मस्तान दिग्दर्शित
" रेस " चित्रपटातील पात्रांसारख्या अनेक... रेस..! अर्थात यांच्या रेस ह्या अहिंसात्मक पद्घतीने असतात..!
या बालकांचे हे रम्य बालपण पाहून..मी या सुट्टीत दररोज माझ्या गतकाळातील रम्य बालपणातील आठवणीत जातो. मी पालखेडला असताना, बालपणी भल्या सकाळी एकमेकांच्या दारात जाणारे आम्ही मोजकेच होतो.स्वर्गीय आप्पासाहेब धोंडिराम सुराशे,विजय वैजिनाथ गायकवाड व गणेश जगन्नाथ वाणी..! आमचा जसजसा वयोगट वाढत गेला,तसतसे भल्या सकाळी एकमेकांच्या दारात जाणारी मित्र यादी वाढत गेली. त्यातल्या त्यात पौगंडावस्थेत आम्ही, मोठ्याने कुणाच्या दारात जाऊन आवाज दिला असेल तर तो फक्त आण्णासाहेब कारभारी म्हस्के याच्या दारी...! अर्थात मी अन् विजू गायकवाड, मुद्दामहून मोठमोठ्याने
" आण्णासाहेब ,हाये का घरात..?" असं आण्णाच्या दारात जाऊन ओरडायचो. विशेष म्हणजे आण्णासाहेब म्हस्के आम्हाला दिसायचा,पण मुद्दामहून ओरडून आवाज देण्यात आम्हाला आनंद वाटत असे. त्यात एक वेगळाच आनंद वाटायचा. आजही आमच्या या मित्राच्या बजाजनगर औरंगाबाद येथील घरी मी ,एकटा किंवा सह परिवार गेलो तरी त्याच पालखेड येथील खेडवळ पद्धतीने मोठमोठ्याने ओरडून....
" आण्णासाहेब हाये का घरात..? " असा आवाज देतो, कारण आम्हाला अभिमान वाटतो,एक खेडूत असल्याचा..!😊 प्रिय बालमित्र आण्णासाहेब म्हस्के याला त्याच्या आजच्या शहरातील घराच्या दारात गेल्यावर ज्यावेळी मी टिपिकल आवाज देतो तेंव्हा त्या गल्लीतील बरीच माणसं माझ्याकडे काहीसे विचित्र नजरेने बघत असतात. त्यांनाही वाटत असेल कोण हा माणूस..? म्हस्के साहेब दिसत आहे तरी देखील त्यांना मोठमोठ्याने आवाज देतो आहे. त्यांना काय माहित मी अन् आण्णासाहेब आम्ही आमचं बालपण जगत आहोत त्या गतकाळातील आठवणींच्या आवाजात..!
असाच दारात जाऊन मित्राला आवाज देऊन ओरडायचे काम आमचा खूप जिवलग बालमित्र विजू गायकवाड,हा आमचाच खूप जिवलग बालमित्र शेख फारुख सर, याच्या पालखेड येथील घरी गेल्यावर फारुख दिसत असायचा तरी देखील मुद्दामहून विचारायचे काम करायचा. अर्थात मीही सोबत असायचो. त्यावेळी विजू आमचा बालमित्र शेख फारुखचे वडील अन् त्याचे आजोबा यांना मुद्दामहून चौकशी करून विचारायचा. त्यात देखील आनंद वाटत असायचा.मी खात्रीने सांगतो, आमच्या पालखेड गावात एखाद्या बालमित्राच्या वडिलांशी अन् आजोबांशी जिवलग मैत्रीचे नाते बाळगून असलेला एकमेव व्यक्ती विजू गायकवाड हाच आहे. विजू गायकवाड , आदरणीय शेख गौस चाचा अन् तीर्थस्वरुप महमूद बाबा शेठ यांच्यातील मैत्रीच्या नात्यात वयाचे बंधन अजिबात आलेच नाही.मानवी समुदायाच्या जगरहाटी मधील हे अत्यंत दुर्मिळ आहे असे मला वाटते.
आजच्या शहरीकरणामुळे अशी एकमेकांच्या दारात सकाळी जाऊन भल्या मोठमोठ्याने ओरडून आवाज देणारी अतिशय गोड मैत्री नाहीशी होत चालली का..?
माझ्या किंवा पूर्वीच्या वयोगटातील मुलांच्या काळात, जो विश्वास, सुरक्षित असल्याची भावना समाजात वावरतांना जाणवत होती,ती आता नाही का..?
जर...याचे उत्तर होकारार्थी असेल...तर..माझ्या सारख्या अशी मैत्री अनुभवलेल्या असंख्य मित्रांना ते फार...फार क्लेशदायक आहे.
आम्ही काही बालमित्र पालखेड येथे किंवा जेंव्हा कधी भेट होते तेंव्हा अघळपघळ आयुष्य जगलेल्या आम्हा काही जिवलग बालमित्रांना आजचं औपचारिक सामाजिक जीवन मनाला कुठेतरी शून्यात घेऊन जाते.आजच्या सामाजिक जीवनात सगळं कसं संशयाचं सामाजिक वातावरण झाले आहे. निदान आम्हा काही जिवलग बालमित्रांचा या अशा संशयास्पद सामाजिक वातावरणात जीव गुदमरतो.
कुणी म्हणतं हा जातीने अल्पसंख्यांक, कुणी म्हणतं हा धर्मानं अल्पसंख्यांक..कुणी म्हणतं..हे लिंग गुणोत्तर मध्ये अल्पसंख्यांक..! मला तर आता त्यात अजुन एक होऊ पाहत असलेल्या अल्पसंख्यांक जमातीला सामील करावा वाटू लागला आहे..! आणि तो म्हणजे.......................
" बालपणातील एकमेकांच्या दारात जाऊन मोठमोठ्याने ओरडून आवाज देणारी मैत्री..!"
माझ्या पिढीचे फार काही मोठे वय नाही पण..आमच्या पिढीला आता पासूनच हे म्हणावे लागू राहिले की, ..........................
" आमच्या काळात...अमके..अमके..होते..!"
आपल्या पिढीचे हे दुर्दैव आहे का..?
मला तर नक्कीच हे दुर्दैव वाटते. हे दुर्दैव वाटत असताना ते स्वतः साठी न वाटता..आजच्या काळातील बालकांचे दुर्दैव वाटते आहे. कारण..मी वर उल्लेखिलेले एकमेकांच्या दारात जाऊन मोठमोठ्याने ओरडून आवाज देणारी मैत्री..यांच्या काळात..खरंच अल्पसंख्यांक नक्कीच होत चालली आहे.
कशामुळे............?
शहरीकरणामुळे..!
अवतीभोवती असणाऱ्या अविश्वासाच्या वातावरणामुळे..!
प्रौढांच्या एकमेकांवर नसणाऱ्या विश्र्वासामुळे..!
बालकांच्या ,पालकांच्या सततच्या धावपळीमुळे..!
कुटुंबात फक्त पैश्याला प्राधान्यक्रम दिल्यामुळे..!
हक्काने कुणाला तरी बाल मैत्रीचा त्रास न देण्याच्या वृत्तीमुळे..!
आजची बरीच लहान मुले बहुदा प्रौढ झाल्यामुळे..!
करमणुकीच्या विविध आभासी जगतात रममाण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या साधनांमुळे..!
इत्यादी...इत्यादी..!
मी अन् माझे बालमित्र एकमेकांच्या दारात जाऊन अन् ओरडून मित्राला आवाज देण्यात जास्तच नशीबवान ठरलो. काळाच्या ओघात कुटुंबाचे स्थलांतर झाले. गाव मागे राहिले.जबाबदाऱ्या अन् स्थलांतर यात मागे राहिले ते गाव..! गाव सुटले मात्र ती गावरान मैत्री आम्ही काही बालमित्र आजही भेटलो की त्याचं गावरान मैत्रीची भेट होत असते. मी किंवा माझ्या सारखे काहीजण ज्यांचं गाव सुटलं त्यांच्या आयुष्याच्या आजच्या प्रवासात गावाकडच्या गावरान मैत्रीच्या फक्त आठवणी तेवढ्या शिल्लक राहिल्या आहेत. आजच्या आयुष्यात एखाद दुसरा बालमित्र भेटला की त्या गावरान मैत्रीच्या नात्याला आपोआप पुन्हा उजाळा मिळतो.
ता.क.: ज्या ज्या बालकांना अशी मैत्री कुठेही मिळत असेल ते खूप सुदैवी आहेत..!
वंदे मातरम्
मूळचा एक खेडूत लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: १९ मे २०१८
स्थळ: लासूर स्टेशन.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा